पर्यावरणात होणारे सततचे बदल आणि वाढतं प्रदुषण सतत धोक्याची घंटा देत आहे. अशा काळात पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत. कारण आताच जर याची सुरुवात केली नाही तर भविष्यात या समस्या आक्राळविक्राळ रूप धारण करतील. याची सुरुवात तुम्ही तुमच्या स्वयंपाक घरापासून करू शकता. कारण सर्वात जास्त घनकचरा हा प्रत्येकाच्या स्वयंपाकातून निर्माण होत असतो. त्यामुळे आपलं स्वयंपाक घरच जर इको फ्रेंडली असेल तर पर्यावरण आपोआप राखले जाईल
कसं कराल तुमचे स्वयंपाक घर इको फ्रेंडली
परिवर्तन अथवा बदल हा निसर्गाचा एक नियम आहे. निसर्ग परिस्थितीनुसार सतत बदलत असतो. तसंच चांगल्या जीवनशैलीसाठी माणसानेही स्वतःच्या जीवनात सकारात्मक बदल सतत करायला हवेत. इको फ्रेंडली अथवा पर्यावरणाला पूरक आणि पोषक जीवनशैली आत्मसात करण्याची सुरुवात तुम्ही तुमच्या स्वयंपाक घरापासून नक्कीच करू शकता. सवय नसल्यामुळे सुरुवातीचे काही दिवस तुम्हाला त्रासदायक वाटतील. पण एकदा तुम्हाला या जीवनशैलीची सवय लागली की तुमचं आणि पर्यायाने विश्वातील प्रत्येकाचं जीवन सुखकर आणि सोयीचं होईल. यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमच्या घरातून त्या सर्व गोष्टी काढून टाकायच्या आहेत ज्या पर्यावरणासाठी हानिकारक आहेत.
पर्यावरण पूरक पोषक स्वयंपाक घरासाठी काय करावे
जर तुम्हाला तुमचे स्वयंपाक घर पूर्णपणे इको फ्रेंडली करायचे असेल तर या टिप्स तुमच्या नक्कीच उपयोगी पडतील.
घरात प्लास्टिकचा वापर कमी करा
घरात आजकाल आधुनिक काळानुसार सोयीचे आणि हलके असणारे प्लास्टिकच्या वस्तू जास्त प्रमाणात असतात. मात्र पर्यावरणासाठी प्लास्टिक मुळीच हिताचे नाही. यासाठी स्वयंपाकघरातील प्लास्टिकचा वापर आधी कमी करा. घरातील बरण्या, बाटल्या, डब्बे प्लास्टिकचे असतील तर काढून पर्यावरणाला पूरक अशी स्टील, पितळ, तांबे अथवा काचेची भांडी वापरण्यास सुरूवात करा.
स्वयंपाक घराच्या कचऱ्याचे नियोजन
स्वयंपाक घरात आपण अनेक गोष्टी सोलतो, कापतो, चिरतो. त्यातुन मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण होतो. मात्र हा सर्व कचरा आपण एकाच डब्यात भरतो आणि सफाई कामगारांना देतो. मात्र तसं न करता आतापासून तुमच्या घरातील कचऱ्याचे नियोजन करा. ओला आणि सुका कचरा वेगवेगळ्या डब्यात ठेवा. शक्य असल्यास ओला कचऱ्यातून सेंद्रिय खत निर्माण करून तुमच्याच बागेतील झाडांसाठी वापरा. कचऱ्याच्या डब्यासाठी बायोडिग्रेबल पिशवी वापरा.
पाण्याची बचत करा
स्वयंपाक करताना आपण खूप मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर करतो. मात्र जर पाण्याचे नीट नियोजन केले तर स्वयंपाकासाठी वापरलेले पाणी तुम्ही पुन्हा झाडांसाठी अथवा स्वच्छतेसाठी वापरू शकता. ज्यामुळे पाणी वाया जाणार नाही. शिवाय फळं, भाज्या धुतलेले पाणी झाडांसाठी उत्तम असते.
स्वयंपाक घर करा हरित
आजकाल मुंबईसारख्या ठिकाणी स्वयंपाक घराजवळ बाग करणं नक्कीच शक्य नाही. मात्र तुम्ही स्वयंपाकघराच्या बाल्कनी अथवा खिडकीत झाडं लावू शकता. स्वयंपाकाला उपयुक्त अशी लसूण, कांद्याची पात, कोथिंबीर, पुदिना, मिरची अशी छोटी रोपे कुंडीत छान वाढतात. शिवाय असं केल्यामुळे तुम्हाला घरच्या घरी सेंद्रिय भाज्या मिळू शकतात. अशा झाडांमुळे घरात ताजे आणि सकारात्मक ऊर्जेचे वातावरण निर्माण होईल.
फोटोसौजन्य –
अधिक वाचा –
पावसाळ्यात स्वयंपाक घर असं ठेवा स्वच्छ आणि सुरक्षित
किचनमधली लाकडी भांडी अशी करा स्वच्छ, वापरा या सोप्या टिप्स
तुमच्या किचन गार्डनमध्ये सोप्या पद्धतीने लावा लसूण, बाजारातून आणायची गरज नाही