लाईफस्टाईल

‘एक होतं पाणी’ असं म्हणण्याची वेळ आली तर

Aaditi Datar  |  Mar 6, 2019
‘एक होतं पाणी’ असं म्हणण्याची वेळ आली तर

 

एक होता राजा, एक होती राणी, उद्या म्हणू नका… ‘एक होतं पाणी’ पण खरंच अशी वेळ उद्या आली तर? दैनंदिन जीवनातील पाणी हा प्रमुख घटक आहे. पण पाणी पुरवठ्याची समस्या दिवसेंदिवस ज्वलंत होत आहे. याच समस्येवर आधारित ‘एक होतं पाणी’ या आगामी मराठी चित्रपटाचं टीझर नुकतंच रिलीज करण्यात आलं.

या चित्रपटातील बालकलाकार चैत्रा भुजबळ हिच्या वाढदिवसाच्या औचित्याने हे टीझर रिलीज करण्यात आलं. व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज, प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ, विजय तिवारी निर्मित आणि रोहन सातघरे दिग्दर्शित ‘एक होतं पाणी’ हा चित्रपट पाण्यासारख्या ज्वलंत सामाजिक विषयावर भाष्य करतो.  

अलीकडेच या चित्रपटाने ‘अंबरनाथ चित्रपट महोत्सवा’मध्ये ६ नामांकनं मिळवली त्यातील २ पुरस्कारांवर म्हणजेच ‘सर्वोत्कृष्ट कथा-आशिष निनगुरकर’ आणि ‘सर्वोत्कृष्ट बालकलाकार चैत्रा भुजबळ’ या पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवण्यात यशस्वी झाले.

तसंच नोएडामधील संपन्न झालेल्या 6 व्या नोएडा इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हलमध्ये ‘दखलपात्र ज्युरी पुरस्कार’ ही मिळाला. दर्जेदार निर्मितीमूल्य, उत्तम कथानक आणि प्रतिभावान कलाकार यांचं समीकरण एकदा जुळून आलं की, सुजाण रसिक-प्रेक्षकांच्या कौतुकाची थाप ही ठरलेलीच. ‘एक होत पाणी’च्या बाबतीत नेमकी हीच बाब विशेष उल्लेखनीय ठरतंय. आशिष निनगुरकर यांच्या लेखणीतून साकारलेला हा विषय समाजाच्या डोळ्यांत जळजळीत अंजन घालणारा असून सद्यस्थितीला धरून आहे.

‘एक होतं पाणी’ या चित्रपटात हंसराज जगताप, उपेंद्र दाते, अनंत जोग, जयराज नायर, गणेश मयेकर, रणजित जोग, श्रिया मस्तेकर, रणजित कांबळे, त्रिशा पाटील, शीतल कल्हापुरे, शीतल शिंगारे, आनंद वाघ, नाना शिंदे, अनुराधा भावसार, डॉ राजू पाटोदकर, राधाकृष्ण कराळे, दिपज्योती नाईक, बालकलाकार चैत्रा भुजबळ आदि कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका पाहायला मिळतील. या चित्रपटाचे छायाचित्रण योगेश अंधारे यांनी केलं असून हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

एका दुष्काळग्रस्त गावाची गोष्ट सांगणारा ‘एक होतं पाणी’ हा चित्रपट आहे. प्रत्येकाने पाण्याचा प्रश्न गंभीर होईपर्यंत वाट न पाहता पाणी वाचवलं पाहिजे, असा मौलिक संदेश हा चित्रपट देतो.

हेही वाचा –

2018 मधले दर्जेदार मराठी चित्रपट – जाणून घ्या कोणते चित्रपट ठरले अप्रतिम

मराठी चित्रपटसृष्टीतल्या ‘10’ हॉट (Hot) आणि बोल्ड अभिनेत्री

छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपट लवकर प्रेक्षकांच्या भेटीला

Read More From लाईफस्टाईल