घर आणि बगीचा

किचनसाठी हॉब खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

Trupti Paradkar  |  Jun 28, 2021
किचनसाठी हॉब खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

नवीन घरातील स्वयंपाक घर अत्याधुनिक असावं असं प्रत्येकाला वाटत असतं. बऱ्याचदा आपण आपल्या घरातील फक्त स्वयंपाक घर रिनोव्हेट करतो अशा वेळी किचनमध्ये सर्व सोयीसुविधा असतील याची काळजी घेतली जाते. किचनमध्ये सर्वात महत्त्वाची असते गॅस शेगडी. आजकाल किचनमध्ये अत्याधुनिक किचन हॉब बसवण्याची पद्धत आहे. फॅन्सी पद्धतीची आणि स्मार्ट फिचर्स असलेली ही अत्याधुनिक शेगडी बसवताना काही गोष्टी तुम्हाला माहीत असायला हव्या. कारण यामुळे तुमचा किचनमधला वेळ वाचेल आणि तुमचे  किचन अतिशय आकर्षक दिसेल.

किचन हॉब विकत घेताना कोणत्या गोष्टी तुम्हाला माहीत असायला हव्या –

सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचे किचन हे भारतीय स्वयंपाकासाठी आहे हे लक्षात ठेवा. कारण जरी तुम्ही निरनिराळ्या अभारतीय डिश बनवल्या तरी जास्तीत जास्त पदार्थ हे भारतीय पद्धतीचे असणार त्यामुळे किचन हॉबवर फोडणी देणे, तळणे, पोळ्या अथवा भाकरी शेकवणे या पद्धतीचा स्वयंपाक केला जाणार आहे. यानुसार तुमचा हॉब निवडा 

हॉबचे मटेरिअल –

बाजारात सध्या विविध ब्रॅंडचे आणि विविध मटेरिअलचे  हॉब विकत मिळतात. टेपर्ड ग्लासमध्ये असलेल्या काळ्या आणि पांढऱ्या काचेचे हॉब अतिशय आकर्षक आणि सुंदर दिसतात. मात्र या हॉबवर जर तुम्ही भारतीय स्वयंपाक केला तर ते लवकर खराब होतात. त्यामुळे जर तुम्ही या मटेरिअलचा हॉब निवडला तर त्याची स्वच्छता तुम्हाला फक्त मायक्रोफायबर कापडाने करावी लागेल. काचेवर स्क्रॅच येईल असं कोणतंही साधन तुम्ही स्वच्छतेसाठी वापरू शकत नाही. शिवाय या काचेवर जर एखादं जड भाडे, गॅसचे बर्नर आदळले तर ती तुटण्याची शक्यता आहे. यासाठीच शक्य असल्यास स्टेनलेस स्टीलचे हॉब किचनसाठी निवडला. या हॉबची स्वच्छता करणे सहज शक्य आहे. शिवाय ते स्वच्छ केल्यावर पुन्हा उजळून दिसू लागतात. 

हिट कंट्रोल –

स्वयंपाक उत्तम करायचा असेल तर तुम्हाला पदार्थांना किती उष्णता द्यायची हे समजणं खूप गरजेचं आहे. योग्य प्रमाणात गॅसची उष्णता मिळाली तर पदार्थ कच्चे राहत नाहीत अथवा करपतदेखील नाहीत. यासाठीच हॉबवर देण्यात येणारे हिट कंट्रोल स्वीच अथवा बटण तुमच्या सोयीचे आहेत का ते आधीच तपासा. बऱ्याच हॉबमध्ये जंबो बर्नरला हिट कंट्रोल फंक्शन असल्यामुळे ते तुम्ही तुमच्या सोयीनुसार कमी जास्त करू शकता.

हॉबचे कनेक्शन –

हॉब तुम्हाला तुमच्या  किचनच्या प्लॅटफॉर्म म्हणजेच ओट्यावर लादी, कडप्पा कापून बसववा लागतो. शिवाय तुमच्या नेहमीच्या गॅस शेगडीचे कनेक्शन आणि हॉबचे कनेक्शन निराळ्या पद्धतीचे असते. गॅस शेगडी लायटर अथवा माचिसने प्रज्वलित करता येते. मात्र हॉबसाठी तुम्हाला वीजेचे कनेक्शन करावे लागते.. त्यामुळे हॉब खरेदी करण्यापूर्वी तुमच्या किचनमध्ये या सर्व सोयी असणं गरजेचं आहे. अशी व्यवस्था असेल तर अर्धा ते पाऊण तासात तुमच्या किचन हॉबचे इन्स्टॉलेशन केले जाते. सध्याच्या  काळात किचन हॉब वापरणे जितके सोयीचे आहे तितकेच पैशांची बचत करणारे आहे. कारण या साधनामुळे तुमचा गॅस कनेक्शनमधून गॅस वाया जाण्याची शक्यता नसते.

सुरक्षितता –

गॅसचा वापर करताना सर्वात महत्त्वाचे आहे तुमची सुरक्षा. त्यामुळे तुम्ही जो हॉब निवडणार आहात त्यामध्ये तुमच्या गॅसची गळती होणार नाही आणि झाल्यास अर्लाम, टायमरची व्यवस्था असलेले फिटर्स जाणिवपूर्वक पाहा. कारण आजकाल हॉबमध्ये जर वारा अथवा पाण्यामुळे तुमचा गॅस बर्नर बंद झाला तर गॅसचे कनेक्शन ऑटोमॅटिक बंद करण्याची सोय असते.

बर्नरची संख्या –

किचन हॉबवर किती बर्नर हवेत हे तुम्हाला आधी निवडावे लागते. सध्या तीन, चार, पाच बर्नरच्या किचन हॉबचा ट्रेंड आहे. कारण जास्त बर्नर म्हणजे तुमचा  स्वयंपाकाचा  वेळ वाचणार असं गृहित धरलं जातं. मात्र तुम्ही तुमच्या घरातील माणसं, स्वयंपाकाचे प्रमाण  आणि तुमची स्वयंपाकाची वेळ यानुसार बर्नर निवडावे. एकाच वेळी तुम्ही सर्व बर्नर वापण्याची शक्यता कमी असते त्यामुळे तीन ते चार बर्नरचा हॉब एका मोठ्या कुटुंबासाठी नक्कीच सोयीचा ठरू शकतो. 

फोटोसौजन्य – 

अधिक वाचा –

सोप्या किचन हॅक्स, ज्या वाचवतील तुमचा वेळ

मिक्सर अथवा फूड प्रोसेसर वापरताना या गोष्टी ठेवा लक्षात, लवकर नाही होणार खराब

घरासाठी वॉटर प्युरिफायर खरेदी करताना लक्षात ठेवा या गोष्टी

Read More From घर आणि बगीचा