एका मुलाच्या आयुष्यात जेवढं महत्त्व आईचं आहे तितकंच महत्त्व वडिलांचंही आहे. फक्त मातृदिनचं नाहीतर पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. मुलाच्या संगोपनात आईवडिल या दोघांची भूमिका महत्त्वपूर्ण असते. नेहमी असं म्हटलं जातं की, मुलांसोबत आई असेल तर त्यांची जडणघडण चांगली होते. पण तुम्ही कधी हा विचार केला आहे का, मुलासाठी त्याचे वडील असणंही किती आवश्यक आहे ते? भलेही मुलांना वडिलांची घरातील असलेली शिस्त आणि धाक असलेलं वातावरण आवडत नाही. पण वडील असल्यामुळे मुलांना आयुष्यभर अनेक फायदे मिळतात. आता काळही बदलतो आहे, आई आणि बाबा दोघंही ऑफिसला जातात. त्यामुळे जबाबदाऱ्याही वाटून घेणं आता क्रमप्राप्त आहे. मुलांचं संगोपन आणि जडणघडण ही फक्त आईची जबाबदारी उरलेली नाही. काळासोबत वडिलांनीही मुलांच्या गरजा समजून त्यांच्यासाठी वेळ काढणं गरजेचं आहे. जाणून घेऊया वडिलांचं मुलांच्या संगोपनातील महत्त्व.
मुलं देतात कमी त्रास
नुकत्याच एका अध्ययनात हे समोर आलं आहे की, जे वडील आपल्या नवजात बाळाची देखभाल करतात. जसं बाळाला बाटलीने दूध पाजणे, बाळाची लंगोट बदलणे किंवा त्याला झोपवणे अशी कामं करतात. ती मुलं जास्त रडत नाहीत आणि किरकिरी होत नाहीत. कारण किरकिरी मुलंही तीन तासांपेक्षा जास्त वेळ रडतात. जे त्याच्या आरोग्यासाठी योग्य नसते. त्यामुळे जसं लहान शिशूसाठी आईचं दूध महत्त्वाचं आहे, तसंच वडिलांचा उबदार स्पर्शही तेवढाच महत्त्वाचा आहे.
मुलांमध्ये हुशारी येण्यासाठी
एका अध्ययनातून हे आढळलं आहे की, जे वडील मुलांच्या बालावस्थेपासून त्यांच्यासोबत जास्त खेळतात किंवा एक्टीव्ह असतात. त्या मुलांची दुसऱ्या वर्षातील कॉग्निटीव्ह टेस्ट ही उत्तम असते. मुलांच्या वडिलांचं त्यांच्या सोबत असणं हे त्यांचं नातं अधिक दृढ करणारं असतं. तसंच त्यांच्या बौद्धिक विकासातही ते प्रभावी ठरतं. 0 ते 5 वर्षात जर वडिलांनी मुलांसोबत चांगला वेळ घालवला तर या मुलांचा आयक्यू हा इतर मुलांच्या तुलनेत जास्त चांगला असतो. ज्या मुलांचे वडील त्यांना जास्त वेळ देत नाहीत किंवा त्यांच्यासोबत खेळत नाहीत त्या मुलांचा आयक्यू हा कमी आढळून आला आहे.
मुलांचं वागणं चांगलं असतं
एका नव्या संशोधनानुसार वडिलांसोबत मजबूत नातं आणि भावनात्मक जवळीक असल्याचा परिणाम मुलांच्या दैनंदिन व्यवहारावरही होतो. अशा मुलांच्या व्यवहारासंबंधीच्या समस्या कमी आढळतात. त्यांना समाजात वावरताना कोणताही न्यूनगंड वाटत नाही. त्यांच्या वागण्यात एक आत्मविश्वास आढळतो.
मुलं होतात यशस्वी
वडिलांची साथ असेल तर मुलं शाळेतही चांगला अभ्यास करतात आणि दुसऱ्यांशी बोलताना आणि वागताना आत्मविश्वास दाखवतात. या मुलांमध्ये सतत काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा असते. मोठं होऊन ही मुलं धडाडीने निर्णय घेण्यास मागेपुढे पाहत नाहीत आणि जे क्षेत्र निवडतात त्यात यशस्वी होण्याची शक्यताही जास्त असते. एखाद्या खेळात जिंकल्यावर किंवा अभ्यासात चांगली कामगिरी केल्यावर मुलांना वडिलांची मिळणारी शाबासकीची थाप ही त्यांचा आत्मविश्वास दुणावते. त्यांना नवनवीन गोष्टी करून त्यात प्रावीण्य मिळवण्यास उद्युक्त करत असते.
आनंदी मुलं
ज्या मुलांचे वडील त्यांच्यासोबत असतात ती मुलं आयुष्यभर खूष असतात. मुलांना शाळेतून आणणं, त्यांना बागेत खेळण्यासाठी नेणं हे मुलांसाठी खूप फायदेशीर असतं. कारण मुलांना आई आणि वडील या दोघांचाही सहवास हवा असतो. फक्त एकच पालक असल्यास मुलंही खूप हट्टी आणि चिडचिडी होतात. वडील नसतील तर मुलं बरेचदा एकलकोंडी झाल्याचंही आढळतं.
वरील कारणांमुळे मुलांच्या आयुष्यात वडील असणं फार महत्त्वाचं आहे. वडील असल्याच्या नात्याने तुम्ही जितका वेळ आपल्या मुलांसोबत घालवाल तितका जास्त फायदा तुमच्या मुलांना मिळेल. बदलत्या काळानुसार जसं आईने घरात आणि घराबाहेरच्या कामात हातभार लावला आहे. तसंच वडीलांनीही मुलांच्या संगोपनात जास्तीतजास्त सहभाग घेणं आवश्यक आहे. मुलांच्या शाळेच्या कार्यक्रमांना किंवा सभांना फक्त आईनी जाण्याचे दिवस आता गेले आहेत. वडिलांनीही मुलांच्या शाळेच्या अभ्यासात आणि इतर गोष्टीत सहभाग घेतला पाहिजे. बाबा मुलांचे फक्त लाड पुरवण्यापुरते आता चालणार नाहीत. त्यांनी मुलांच्या छोट्या छोट्या गोष्टी आई इतक्याच समजून घेतल्या पाहिजेत. ज्यामुळे मुलं आणि वडिलांच्या नात्यात कधीच दरी येणार नाही. तसंच वडिलांनी मुलांसमोर स्वतःहून आईची जबाबदारी वाटून घेणंही आवश्यक आहे. कारण बालपणातील आईवडिलांचं नातं आणि त्यांच्यातील वागण्याचा परिणाम हा मुलांच्या मनावर खोलवर होत असतो. जर लहानपणीच त्यांच्यासमोर योग्य आदर्श असतील तर त्यांच्या भविष्यातील नात्यांवर सकारात्मक परिणाम नक्कीच होईल.
लक्षात घ्या पुरूष आणि स्त्री एकसारखे नाहीत आणि मुलांच्या संगोपनात दोघांचीही भूमिका वेगवेगळी आणि महत्त्वाची आहे. यामुळेच सिंगल पेरेंट्सना दोघांची भूमिका करणं कठीण जातं. कारण वडील आणि आई या दोघांचाही पालकत्वबाबतचा दृष्टीकोन हा वेगळा असतो. पण जेव्हा ते दोघंही एकत्रितपणे मुलांचं संगोपन करतात तेव्हा ते मुलासाठी नक्कीच फायदेशीर ठरतं. एकीकडे आईही मुलांबदल जितकी जागरूक असते. तितकेच वडील हे मुलांना नवीन काहीतरी करण्यासाठी उद्युक्त करत असतात. जे त्यांच्या जडणघडणीत आणि वाढीसाठी आवश्यक असतं. त्यामुळे मुलांशी संवाद साधा, त्यांच्यासोबत खेळा आणि वडील म्हणून त्यांना जास्तीतजास्त वेळ द्या. आपल्या मुलांसोबत छान आठवणी बनवा आणि त्यांच्या मनात आपोआप जागा मिळवा. मग मुलंही खास वडिलांकरिता कविता नक्कीच करतील. जसं आईसाठी नेहमी लिहील्या जातात.