आरोग्य

हॉर्मोनल असतुंलनामुळे का वाटतं थकल्यासारखं

Trupti Paradkar  |  Feb 18, 2020
हॉर्मोनल असतुंलनामुळे का वाटतं थकल्यासारखं

आजकाल आपण महिलांच्या अनेक समस्येमागचं कारण हॉर्मोनल असंतुलन (Hormonal Imbalance) आहे असं ऐकतो. सतत चिडचिड होणं, प्रचंड थकल्यासारखं वाटणं, मूडस्वींग, अंगदूखी, काम करण्याचा  कंटाळा येणे, नैराश्य, डिप्रेशन अशी लक्षणं हॉर्मोनल असंतुलनामुळे जाणवतात. वास्तविक प्रत्येक महिलेला तिच्या जीवनातील विविध टप्प्यावर हॉर्मोन्सच्या बदलांना सामोरं जावंच लागत असतं. मासिक पाळी, गर्भधारणा, बाळंतपण, रजोनिवृत्ती या काळात शरीरात हॉर्मोन्समध्ये बदल होत असतात. याशिवाय धकधकीचं जीवन, चुकीचा आहार, कामाचा ताणतणाव, चिंता-काळजी, व्यायामाचा अभाव यामुळेही तुमच्या हॉर्मोन्समध्ये असंतुलन निर्माण होऊ शकते. यासाठी शारीरिक लक्षणांना ओळखा आणि त्यावर वेळीच उपचार करा.

मूड स्वींग –

महिलांमधील  एस्ट्रोजन (estrogen) या हॉर्मोन्समध्ये बदल झाले की त्याचे परिणाम तिच्या शरीरावर जाणवू लागतात. या हॉर्मोन्सच्या पातळीत घसरण झाली की महिलांना थकवा  जाणवू लागतो. ज्यामुळे त्यांची सतत चिडचिड होते. सतत बदलत राहणारा मूड हा यामागील एक महत्त्वाचा संकेत आहे.

Shutterstock

मासिक पाळीच्या समस्या –

महिलांमध्ये मासिक पाळीच्या समस्यांची अनेक कारणे आहेत. वयाच्या प्रत्येक टप्पावर मासिक पाळीच्या समस्या निरनिराळ्या असू शकतात. जर तुम्हाला दहा ते पंधरा दिवस आधी अथवा नंतर मासिक पाळी येत असेल अथवा मासिक पाळीच्या काळात जास्त रक्तस्त्राव होत असेल तर तुमच्या हॉर्मोन्समध्ये बदल झाले असण्याची शक्यता आहे. खरंतर मासिक पाळीत तुमची चिडचिड होणं स्वाभाविकच आहे. मात्र जर या काळात हॉर्मोन्सच्या पातळीत लक्षणीय बदल झाले तर त्यामुळे तुम्हाला फार थकल्यासारखं वाटू शकतं. तेव्हा मासिक पाळीच्या काळात नेहमीपेक्षा वेगळे बदल जाणवत असतील तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

भूक मंदावणे –

हॉर्मोनल बदलांचा तुमच्या भुकेवर विपरित परिणाम होत असतो. हॉर्मोन्समध्ये झालेल्या बदलांमुळे कधी कधी अती भुक लागते तर कधी कधी खाण्याची इच्छाच होत नाही ही दोन्ही लक्षणे आरोग्यासाठी योग्य नाहीत. जर तुमच्या शरीराचे योग्य पोषण झाले नाही तर त्यामुळे तुम्हाला थकल्यासारखं वाटू शकत. शरीरात ऊर्जा निर्माण न झाल्यामुळे सतत कंटाळवाणं वाटणं  हे याचंच एक लक्षण आहे.

सेक्सची इच्छा कमी होणे –

शरीरातील लिबीडो कमी झाल्यामुळे तुम्हाला सेक्स करण्याची इच्छा होत नाही. चाळीशीनंतर अथवा रजोनिवृत्तीच्या काळात महिलांमध्ये  हा बदल नेहमीच जाणवतो. शरीरातील Estrogen आणि Testosterone या हॉर्मोन्समध्ये झालेले बदल यामागचं कारण असू शकतं. यामुळे रजोनिवृत्तीच्या काळात महिलांना अती शारीरिक थकवा जाणवेल.

वजनात अती प्रमाणात वाढ होणे –

वजन वाढणं ही आजकाल प्रत्येकाची समस्या झाली आहे. पण जर तुमचं वजन अचानक वाढलं असेल तर त्यामागे तुमच्या शरीरातील हॉर्मोन्सचे असतुंलन हे देखील एक कारण असू शकतं. थायरॉईड, पीसीओडी अशा समस्यांमुळे तुमचं वजन वाढतं. ज्यामुळे तुम्हाला सतत थकल्यासारखं आणि उदास वाटू लागतं. यासाठीच तुमच्या शरीरातील हे बदल वेळीच ओळखून त्यावर तातडीने उपाय करा.

Read More From आरोग्य