Care

केस आणि नखं मजबूत करण्यासाठी तुमच्या आहारात करा असे बदल

Trupti Paradkar  |  Jul 23, 2020
केस आणि नखं  मजबूत करण्यासाठी तुमच्या आहारात करा असे बदल

पावसाळ्यात व्हायरल इनफेक्शनप्रमाणेच आणखी काही समस्या नेहमी जाणवतात. त्या म्हणजे मोठ्या प्रमाणावर केस गळणे आणि नखे तुटक होणे. सध्या परिस्थिती अशी आहे की तुम्ही या समस्येवर उपाय करण्यासाठी पार्लर अथवा सलॉनमध्येही जाऊ शकत नाही. त्यामुळे तुमचे केस आणि नखे सध्या अधिकच निस्तेज दिसू शकतात. नियमित हेअर स्पा आणि मॅनिक्युअर, पेडिक्युअर केल्यामुळे केस आणि नखांची योग्य निगा राखली जाते. हा उपाय सध्या घरच्या घरी करण्याशिवाय पर्याय नाही. मात्र असं असलं तरी घरच्या घरी आहारात थोडासा बदल करूनही तुम्ही तुमच्या केस आणि नखांना मजबूत करू शकता. यासाठी जाणून घ्या केसांच्या आणि नखांच्या आरोग्यासाठी कोणते खाद्यपदार्थ नेहमी आहारात असावे. 

अंडे –

अंड्यामुळे तुमच्या शरीराला पुरेसे ‘प्रोटिन’ आणि ‘बायोटिन’ मिळते. या दोन पोषकतत्त्वामुळे तुमचे केस आणि नखे मजबूत होऊ शकतात. तुमचे हेअर फॉलिकल्स तयार होण्यासाठी प्रोटिन्सची मोठ्या प्रमाणावर गरज असते. जर तुमच्या आहारात प्रोटिनचे प्रमाण कमी झाले असेल तर तुमचे केस गळू लागतात. त्याचप्रमाणे शरीराला केसांसाठी उपयुक्त असे ‘केराटिन’ हे प्रोटिन तयार करण्यासाठीही बायोटिनची गरज असते. या दोन मुख्य घटकांसोबतच अंड्यामध्ये झिंक, सेलेनिअम यासारखे अनेक पोषक घटकदेखील असतात. ज्यामुळे तुमचे केस आणि नखे मजबूत होण्यास मदत होते. तेव्हा जर केस गळत असतील अथवा नखं तुटत असतील तर दररोज एक अंडं जरूर खा.

Shutterstock

सुकामेवा –

आरोग्यतज्ञ्ज सांगतात त्याप्रमाणे प्रत्येकाने दररोज एक मुठभर सुकामेवा खाणं गरजेचं आहे. सुकामेव्यामध्ये तुम्ही काजू, बदाम, अक्रोड आणि शेंगदाण्यांचा समावेश करू शकता. कारणय या सर्व प्रकारांमध्ये ‘ओमेगा फॅटी अॅसिड’ ‘व्हिटॅमिन्स’ ‘अॅंटिऑक्सिडंट’ आणि ‘मिनरल्स’ भरपूर प्रमाणात असतात. जेव्हा तुम्ही नियमित सुकामेवा खाता तेव्हा हे सर्व घटक तुमच्या शरीराला मिळू लागतात. या सर्व घटकांची तुमच्या केस आणि नखांच्या वाढ आणि विकासासाठी अत्यंत गरज असते. 

Shutterstock

टोमॅटो –

भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये स्वयंपाकात टोमॅटोचा वापर अनेक पदार्थांमध्ये केला जातो. टोमॅटो व्हिटॅमिनचा पूरवठा करणारा एक प्रमुख खाद्यपदार्थ आहे. त्याचप्रमाणे टोमॅटोमुळे तुम्हाला ‘केरोटोनॉईड’ ‘बीटा केरोटीन’ आणि ‘ल्युटेन’देखील मिळते. या सर्व गोष्टींमुळे तुमच्या त्वचेचं सुर्यप्रकाशामुळे होणाऱ्या दुष्परिणामांपासून संरक्षण होते. शिवाय टोमॅटोमुळे तुमचे हेअर फॉलिकल्स मजबूत होतात. ज्यामुळे तुमच्या केसांचे गळणे थांबवता येते. 

Shutterstock

ओटमील –

एक बाऊल ओटमील दररोज सकाळी घेणे हा एक परफेक्ट नाश्ता असू शकतो. कारण यामुळे तुमचे फक्त पोटच भरत नाही तर तुम्हाला दिवसभर उत्साहीदेखील वाटते. कारण यामध्ये मुबलक प्रमाणात ‘तांबे’ ‘झिंक’ आणि ‘व्हिटॅमिन बी’ असते. यामुळे तुमचे केस आणि नखे मजबूत होतात. झिंकमुळे तुमच्या त्वचेचंही रक्षण होतं. 

Shutterstock

पालक –

पालक खाण्यामुळे तुमच्या शरीराला ‘व्हिटॅमिन ए’ आणि ‘व्हिटॅमिन सी’ भरपूर प्रमाणात मिळते. व्हिटॅमिन ए मुळे तुमच्या स्कॅल्पचे आरोग्य राखले जाते. केसांची मुळे मजबूत झाल्यामुळे केस कमी प्रमाणात तुटतात. शिवाय यामध्ये ‘लोह’ही असते. त्यामुळे तुमच्या केसांना नैसर्गिक चमक मिळते. शरीराला पुरेश्या प्रमाणात पोषण मिळाल्यामुळे त्याचा चांगला परिणाम तुमच्या केस आणि नखांवर होतो. 

Shutterstock

कडधान्ये –

डाळी आणि कडधान्यांमध्ये ‘प्रोटिन’ ‘झिंक’ आणि ‘बायोटिन’ असते. जे तुमच्या केस आणि नखांना मजबूत करण्यासाठी फायदेशीर ठरते. या पोषकतत्वांच्या अभावामुळे तुमचे  केस आणि नखे कमजोर होतात आणि तुटू लागतात. यासाठी निरनिराळ्या डाळी आणि कडधान्यांचा आहारात समावेश करा. 

 

 

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

अधिक वाचा –

आठवड्यातून एकदा केसांची तेल लावून वेणी घालणं का आहे गरजेचं

नखं वाढवण्यासाठी नक्की वापरा ‘हे’ सोपे घरगुती उपाय (How to Grow Nails Faster in Marathi)

केसांचा हेअरकट करण्याआधी या गोष्टी आहेत महत्वाच्या

 

Read More From Care