Travel in India

Shopping Destination : लातूरमधील गंजगोलाई

Aaditi Datar  |  Jun 18, 2019
Shopping Destination : लातूरमधील गंजगोलाई

गंजगोलाई म्हटल्या म्हटल्या लातूरकरांचे कान नक्कीच टवकारले असतील. महाराष्ट्रातील लातूर (Latur) शहराच्या हृदयस्थानी वसलेलं गंजगोलाई (Ganjgolai). लातूर शहर हे आज खऱ्या अर्थाने विकसित झालं असून इथे सगळ्या ब्रँड्सची दुकानं आणि मोठे मॉलही आहेत. पण लातूरकरांना काहीही खरेदी करायची असेल तर पहिली पसंती असते ती गंजगोलाईला. आजही कुठल्याही शॉपिंग मॉलमध्ये जाण्यापेक्षा त्यांना जास्त उत्सुकता असते ती गंजगोलाईत जाऊन खरेदी करण्याची. असं काय आहे या गंजगोलाईत जाणून घेऊया.

गंजगोलाईची विशेष रचना आणि इतिहास

Instagram

लातूर खरंतर महाराष्ट्रभरात प्रसिद्ध झालं ते लातूर पॅटर्नमुळे. पण लातूरची इतरही अनेक वैशिष्ट्य आहेत त्यापैकीच एक म्हणजे गंजगोलाई. लातूरच्या मध्यभागी वसलं आहे गंजगोलाई. वैशिष्ट्याची बाब म्हणजे याची ऐतिहासिक पद्धतीने करण्यात आलेली बांधणी आहे. याचं डिझाईन श्री फैयाजुद्दीन यांनी केलं होतं. या बाजाराची रचना अशी काही करण्यात आली आहे की, लातूर शहरातील कोणत्याही दिशेने तुम्ही आलात तरी गंजगोलाईच्या मध्यभागी पोचता येतं. जिथे जगदंबा मातेचं देऊळ आहे. येथे तब्बल 16 अशा गल्ल्या आहेत. या बाजाराची स्थापना तब्बल 1917 साली म्हणजे तब्बल 102 वर्षापूर्वी करण्यात आली होती. पण आजही या भागाला पूर्वी एवढंच महत्त्व असून आजही तो सकाळपासून रात्रीपर्यंत गर्दीने गजबजलेला असतो. पाहा हे ड्रोनमधून घेण्यात आलेलं या भागाचं रात्रीच्या झगमगाटातलं हे दृश्य –  

गंजगोलाईची वैशिष्ट्यं

गंजगोलाईमधील मुख्य गोष्ट म्हणजे जगदंबा मातेचं मंदिर आणि इथली बाजारपेठ. लातूर आणि आसपासच्या अनेक भागातील महिलांचं जिव्हाळ्याचं ठिकाण म्हणजे गंजगोलाई. अनेक माहेरवाशिणी लातूरला आल्यावर गंजगोलाईला हमखास भेट देतात. स्थानिकांमध्ये तर हे प्रसिद्ध आहेच पण लातूरमध्ये बाहेरून येणाऱ्यांनाही इथल्या बाजाराची भुरळ पडल्याशिवाय राहत नाही. कारण या बाजारात तुम्हाला अगदी छोट्याश्या पिनपासून ते अगदी किराणा सामानापर्यंत सगळंच मिळतं. त्यामुळे या भागाला पूर्वीच्या काळातील मॉल किंवा शॉपिंग डेस्टीनेशन म्हणायला हरकत नाही. असं हे गंजगोलाई आज लातूरच्या बाजारपेठेतील उत्पन्नाचं आणि समृद्धीचं प्रतीक आहे, म्हणायला हरकत नाही. इथला जगदंबा देवीच्या देवळातला नवरात्रौत्सवही पाहण्यासारखा असतो. या काळात देवळाच्या आसपासच्या भागाला अगदी एखाद्या जत्रेचं स्वरूप प्राप्त होतं आणि देवीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची लांबच लांब रांग लागते.    

Instagram

लातूरकरांचा जिव्हाळ्याचा विषय गंजगोलाई

प्रत्येक लातूरकरांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे गंजगोलाई. याबाबत आम्ही जाणून घेतली लातूरकरांची प्रतिक्रिया. सई कुलकर्णी या गेली अनेक वर्ष लातूरमध्ये वास्तव्यास आहेत. त्यामुळे गोलाई गंज हे त्याचं आवडतं शॉपिंग डेस्टीनेशन आहे. गंजगोलाईबद्दल विचारलं असता सई कुलकर्णी म्हणाल्या की, ‘गंजगोलाईमध्ये तुम्ही शॉपिंगसाठी गेलात तर तुमची कधीच निराशा होत नाही. इथे गेल्यावर तुम्हाला शॉपिंगही करता येतं आणि शॉपिंग झाल्यावर जगदंबा देवीच्या देवळात जाऊन दर्शनही घेता येतं. मी गेली अनेक वर्ष या भागातून खरेदी करत आहे. आता या भागात पूर्वीच्या मानाने खूप सुधारणाही झाल्या आहेत. आधी या भागात रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांची संख्या जास्त होती पण आता मात्र त्यांना व्यवस्थित जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे गर्दीही होत नाही.’

शॉपिंग डेस्टीनेशन गंजगोलाई

फक्त लातूरकरच नाहीतर सोलापूर आणि आसपासच्या भागातीलही स्थानिक रहिवासी येथे शॉपिंगसाठी येतात. सोलापूरवासी असलेली मेघना करवंदे ही लातूरला आल्यावर हमखास या भागाला भेट देते. कारण तिच्यामते या ठिकाणी येऊन शॉपिंग करण्याची वेगळीच मजा आहे. मेघना सांगते की, ‘लातूरमध्ये आल्यावर गंजगोलाईतील खास आणि प्रसिध्द अशा बांगड्यांच्या मार्केटला नक्कीच भेट दिली पाहिजे. इथे तुम्हाला अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टीपासून अगदी लग्नाच्या बस्त्यापर्यंत सर्व खरेदी करता येते. त्यामुळे मी जेव्हा जेव्हा लातूरला येते तेव्हा इथे नक्कीच भेट देते.’

गंजगोलाईला आल्यावर हे नक्की पाहा

Instagram

मुख्यतः गंजगोलाईची विशेष रचना फिरून तुम्हाला पाहता येईल. तसंच इथल्या मध्यभागी असलेल्या जगदंबा मातेच्या देवळात तुम्हाला जाऊन दर्शन घेता येईल. लातूरमधलं अजून एक वैशिष्ट्यं असलेल्या बांगड्याही इथे तुम्हाला विकत घेता येतील आणि त्याशिवाय इतरही वस्तूंचीही शॉपिंग करता येईल. तसंच इथे तुम्हाला खवय्येगिरी करण्यासाठीही बरेच ऑप्शन उपलब्ध आहेत.

गंजगोलाईला नक्की द्या भेट

Instagram

गंजगोलाईला भेट देण्यासाठी योग्य काळ म्हणजे ऑक्टोबर ते फेब्रुवारी. कारण लातूरचा उन्हाळा आणि हिवाळा हे दोन्ही ऋृतू फारच कडक असतात. त्यामुळे पावसाळ्यानंतर आणि हिवाळ्याच्या सुरूवातीच्या काळात तुम्ही इथे भेट देणं योग्य राहील.

गंजगोलाईला जाण्यासाठी

या ठिकाणी पोचण्यासाठी लातूरच्या रेल्वे स्टेशन आणि बस डेपोपासून तुम्ही रिक्शा, बस किंवा स्थानिक वाहन टमटमचाही वापर करू शकता. हा भाग प्रसिद्ध असल्यामुळे तुम्हाला जास्त विचारपूस न करता येथे पोचू शकता. मग पुढच्यावेळी लातूरला गेल्यावर नक्की भेट द्या गंजगोलाईला. कारण मॉलमध्ये तर तुम्ही नेहमीच शॉपिंग करत असाल पण  अशा ठिकाणी शॉपिंग आणि भटकंती करण्याची मजा काही औरच असते. नाही का? तुमच्या शहरातही असं खास ठिकाण असेल तर आम्हाला नक्की कळवा.

फोटो सौजन्य – Instagram

हेही वाचा – 

प्रवासाला जाताना सोबत न्या ‘हे’ घरगुती खाद्यपदार्थ

Weekend Gateway : शांत आणि नयनरम्य हरिहरेश्वर

ट्रॅव्हलिंगमध्ये कसे वाचवावेत पैसे, पर्याय आणि टीप्स

Read More From Travel in India