Recipes

#POPxoMarathiBappa : बाप्पासाठी करा खास मघई मोदक

Aaditi Datar  |  Sep 3, 2019
#POPxoMarathiBappa : बाप्पासाठी करा खास मघई मोदक

साग्रसंगीत जेवण झालं की, सगळ्यांची हमखास एकच मागणी असते ती म्हणजे पान खाण्याची. त्यातही जर ते मघई पान असेल तर लगेचच होकार मिळतो. पान खाण्याची परंपरा भारतात हजारो वर्षांपासून आहे. पान खाणं हा लोकांचा इतका जिव्हाळ्याचा विषय आहे की, यावर अनेक गाणीही आली आहेत. खई के पान बनारसवाला… हे गाणं कोण विसरू शकतं. तर या खाण्याच्या पानाचा उपयोग अनेक रेसिपीजमध्येही केला जातो. कधी कुल्फीत तर कधी मिठाई तर कधी चॉकलेट कोटेड पान तर कधी चिकन स्टार्टरमध्येही मेरिनेशनसाठी पानाचा वापर केला जातो. पण तुम्ही कधी मघई मोदक किंवा पानाचा मोदक असं ऐकलं किंवा खाल्लं आहे का?

Instagram

गणपतीत करा हटके मघई मोदक

गणेशोत्सवाच्या काळात काहीतरी वेगळं डेझर्ट करायची तुमची इच्छा असेल किंवा तेच तेच मिठाईचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर नक्की करून पाहा व्हाईट चारकोलच्या शेफ राजेंद्र अग्नीहोत्री यांनी शेअर केलेली ही मघई मोदकांची रेसिपी. हे मोदक वेगळेही आहेत आणि सगळ्यांना आवडत्या पानाच्या प्रकारचेही. त्यामुळे तुमच्या घरच्यांना हे मोदक नक्कीच पसंत पडतील. पाहा या मोदकाची रेसिपी.

मघई मोदक रेसिपी Maghai Modak recipe

सारणासाठी – तूप, खोबरं 1 कप, गुलकंद 1/2 कप, वेलची पावडर ½ चमचे, केशराच्या काही काड्या, शुगर कोटेड बडीशोप एक चमचा

मोदकाच्या पारीसाठी –  एक कप तांदूळाचं पीठ, एक कप पाणी, चिमूटभर मीठ, मघई पानाची प्युरी (किमान 4 मघई पान).  

कसे बनवाल मघई मोदक – एका पॅनमध्ये तूप चांगलं गरम करून त्यात खोबरं चांगल परतून घ्या. नंतर ते गॅसवरून उतरवून त्यात गुलकंद, वेलची पावडर, केशराच्या काड्या घालून चांगलं मिक्स करा. थंड होऊ द्या. पारीसाठी पाणी गरम करून घ्या. त्याला उकळी आल्यावर त्यात चिमूटभर मीठ आणि तूप घाला. गॅसवरून उतरवून त्यात पानाची प्युरी आणि तांदूळाची पिठी घाला. हे मिश्रण गरम असतानाच ते चांगलं मळून घ्या. हाताला तेल आणि पाणी लावून ते मळा. म्हणजे हाताला चटका लागणार नाही. आता त्याचे गोळे बनवून घ्या. त्याचा वाटीसारखा आकार बनवून त्यात सारण भरा. नेहमीच्या मोदकाप्रमाणे कळ्या बनवून ते बंद करा. आता हे हिरवेगार मोदक उकडून घ्या. किमान 10 मिनिटं हे मोदक उकडा. तयार आहेत मघई पानाच्या स्वादातले तुमचे हटके आणि हिरवेगार मघई मोदक.  

मग हे हटके मघई मोदक नक्की करून पाहा आणि घरातल्यांना व येणाऱ्या पाहुण्यांना हे मोदक आवडले का, हे आम्हाला नक्की कळवा. गणशोत्सावातील फॅशन, शॉपिंग आणि खादाडीसाठी फॉलो करा #POPxoMarathi.

हेही वाचा –

गणपतीसाठी वेगळ्या आणि सोप्या Modak Recipes

बाप्पाचा नेवैद्य असतो खास, कसे वाढावे ताट

जाणून घ्या ऋषीपंचमीचा नैवेद्य कसा करावा

Read More From Recipes