आज नाताळ सण आहे सहाजिकच त्यामुळे सर्वत्र सेलिब्रेशनचं वातावरण आहे. त्यासोबतच आज मराठी अभिनेत्री ‘हेमांगी कवी’च्या लग्नाचा वाढदिवसदेखील आहे. हेमांगी कवी आणि संदीप धुमाळ यांच्या विवाहाला आज दहा वर्ष पूर्ण होत आहेत. हेमांगीने तिच्या इन्स्टावर जरा हटके पद्धतीने पती संदीपला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. प्रत्येक स्रीसाठी ‘शॉपिंग’ हा अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो. हेमांगीसाठी तर आज नाताळ, न्यू ईअर आणि लग्नाचा वाढदिवस असा मणिकांचन योगच शॉपिंगसाठी आला आहे. हेमांगीने पतीसोबत शॉपिंग करत असलेल्या एक फोटो आणि “ जेव्हा जेव्हा मी शॉपिंग करेन तेव्हा तू माझ्या पाठीशी असशील…आणि इमोशनल होत म्हणशील… “जा सिमरन जा…करले अपनी शॉपिंग” असं इन्स्टावर शेअर केलं आहे. सोबत लग्नाच्या दहाव्या वाढदिवसानिमित्त संदीपला शुभेच्छादेखील दिल्या आहेत.
हेमांगीची चित्रपट,मालिका आणि नाटक या ‘तिन्ही’ माध्यमातील वाटचाल
हेमांगी कवीने खूप कमी काळात मराठी चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तिन्ही माध्यमात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. धुडगूस, पिपाणी सारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये हेमांगी झळकली आहे. विशेष म्हणजे ‘ती फुलराणी’ आणि ‘ओवी’ सारख्या दर्जेदार नाटकांमधून तिच्या अभिनयाचं कसब प्रेक्षकांसमोर आलं. अनेक मराठी कॉमेडी शोमधून तिच्या विनोदी भूमिकांचं कौतुक झालं.
हेमांगीचा ‘आगामी चित्रपट’
सध्या ‘फुलपाखरू’ या मालिकेतील नकारात्मक छटा असलेली हेमांगीची भूमिका चांगलीच लोकप्रिय होत आहे. तसंच लवकरच हेमांगीचा ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. चित्रपटाच्या नावावरुन तो विनोदी असेल असं वाटतंय. स्टेलारिया स्टुडियोज आणि अमोल शिवराम उतेकर या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. सर्व लाईन व्यस्त आहेत चित्रपटाचं दिग्दर्शन प्रदिप मेस्री करणार आहेत.सर्व लाईन व्यस्त आहेत चित्रपट एक फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.
फोटोसौजन्य- इन्स्टाग्राम