Family

‘या’ टिप्सच्या मदतीने व्हा आपल्या मुलीची बेस्ट फ्रेंड

Aaditi Datar  |  Apr 27, 2021
‘या’ टिप्सच्या मदतीने व्हा आपल्या मुलीची बेस्ट फ्रेंड

एक आईच आपल्या मुलीला सर्वात चांगल्याप्रकारे ओळखू शकते. चला तुमच्यासोबत अशाच काही टिप्स शेअर करणार आहोत. ज्यांच्या मदतीने तुम्ही आपल्या मुलींसोबत छान मैत्रीचं नातं बनवू शकता. 

मुलगी युवावस्थेत येताच तिच्या स्वभावात अनेक बदल होऊ लागतात. कधी ती अचानक उदास होते तर कधी एकदम खुष दिसते. तिचे हे मूड स्विंग्स पण तुम्हाला तिच्या सोशल मीडियावरचे अॅटीट्यूड स्टेटस पाहिल्यामुळे कळत असतील. नाही का? अनेकदा या वयातल्या मुला मुलींना वाटतं की, त्यांना समजून घेणारं असं कोणीच नाही आणि ते अगदी एकटे आहेत. या वयात शारीरिक बदल ही वेगाने होत असतात. अशा वेळी मुलींना सर्वात जास्त गरज असते ती आपल्या आईने समजून घेण्याची किंवा तिच्या पाठिंब्याची. कधी मुली आपल्या मनातली प्रत्येक गोष्ट आपल्या आईला विना संकोच सांगतात. पण काही ठिकाणी वेगळं चित्र ही दिसू शकतं. आईला मदर्स डे ला शुभेच्छा दिल्या जातात. पण मनातलं सांगितलं जातंच असं नाही.  कारण प्रत्येक आईची जडणघडणाची पद्धत ही वेगळी असते. एखादी आई स्वभावाने कडक असते तर एखादी आई एकदम प्रेमळ असते. पण आपली मुलगी जेव्हा अशा वयात असते तेव्हा आईने तिच्याशी सामंजस्याने वागणे महत्त्वाचे आहे. या वयात आई आपल्या मुलीची सर्वात चांगली मैत्रीण व्हावं. कारण आई आपल्या मुलीची प्रत्येक गोष्ट सोप्या रितीने समजून घेऊन तिला आधार देऊ शकते. या लेखात आपण यावर प्रकाश टाकणार आहोत. 

मनातलं हितगुज ऐका

मुलीच्या मनातलं जाणून घ्या

मुलीने तारूण्यात प्रवेश करताच येणारे अनुभव हे कधी चांगले तर कधी अगदी त्रासदायी असतात. ज्यामुळे तुमची मुलगी प्रसंगी घाबरू शकते. अशावेळी तिच्या मनातल्या गोष्टी लक्ष देऊन ऐका. जर तुम्ही तिच्या मनातलं ऐकलं नाहीतर तर तुमच्याशी मनातल्या गोष्टी शेअर करणार नाही. पण जर तुम्ही मुलीच्या मनातलं ऐकून तिच्या समस्येवर समाधान शोधलंत तर ती नेहमी तुमच्याजवळ येऊन मनमोकळं करेल. अशा वयातल्या मुलांना समजून घेणं खूप गरजेचं आहे.

रागावू नका

जेव्हा तुमची मुलगी एखादी गोष्ट तुम्हाला सांगेल तेव्हा तिच्यावर लगेच रागावू नका. या दरम्यान शांत राहण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला तिची एखादी गोष्ट चुकीची वाटत असेल तर तिच्या कलाने समजण्याचा प्रयत्न करा आणि तिची समस्या दूर करण्याचा प्रयत्न करा. असं केल्याने तुम्ही तुमच्या मुलीच्या जास्त जवळ याल आणि तुमच्यातील आईमुलीच्या नात्याचं मैत्रीत रूपांतर होईल.

जास्त बंधन घालू नका

मुलीवर बंधन घालू नका

युवावस्थेत मुलं बिघडण्याची शक्यता जास्त असते. कारण या वयात मुलांना चांगल्या-वाईट गोष्टींची ओळख कमी असते. पण अनेकदा आपण त्यांच्यावर जास्त बंधन लादल्याने ती आपल्यापासून मनाने दूर जातात. तारूण्यात जेव्हा मुलं बघतात की, त्यांची मित्रमंडळी फिरायला जात आहेत किंवा पार्टी करत आहेत. तेव्हा त्यांना पण फिरण्याची आणि पार्टी करण्याची इच्छा होणं सहाजिक आहे. अशावेळी त्यांना चांगल्या-वाईट गोष्टींबाबत समजवा आणि प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना नकार देऊ नका. असं केल्याने तुमची मुलं आणि तुमचं नातं दृढ होईल आणि त्यांना चांगल्या-वाईट गोष्टींचीही ओळख होईल.

टोमणे मारू नका

जर तरूणवयात तुमच्या मुलीकडून एखादी चूक झाली तर तिला टोमणे मारू नका. असं केल्याने ती आतून तुटेल आणि तिच्या मनातल्या गोष्टी तुम्हाला सांगणं बंद करेल. तिला असं वाटेल की, तुम्ही तिला समजूनच घेत नाही आणि वरून तिला टोमणे मारता आहात. त्यामुळे मुलीची मैत्रीण व्हायचं असल्यास असं अजिबात करू नका.

मित्रांसोबत वेळ घालवू द्या

मित्रांसोबतही वेळ घालवू द्या

बरेचदा आपण बघतो की, काही घरांमध्ये मुलांच्या मित्रमैत्रिणींना एंट्री नसते. काही गोष्टी अशा असतात की, मुलं त्यांच्या मित्रमैत्रिणींसोबतच शेअर करतात. त्यामुळे मुलांच्या मित्रमैत्रिणींना घरी येऊ द्या आणि मुलांना त्यांच्यासोबत वेळही घालवण्यासाठी बाहेरही जाऊ द्या. अशा प्रकारे तुमची मुलगी तुमच्या जवळ नक्कीच येईल आणि तिला तिची आई सतत तिच्यासोबत असल्याची जाणीव होईल.

तुम्हाला वरील लेख कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. तुम्हाला चांगला वाटल्यास तुमच्या ग्रुपमध्येही शेअर करा. अशाप्रकारे अनेक लेख तुम्हाला आमच्या वेबसाईट वाचायला नक्कीच मिळतील. तुम्हाला एखाद्या विषयाबाबत वाचायची इच्छा असल्यास तोही आम्हाला नक्की कळवा.

Read More From Family