आरोग्य

जाणून घ्या वयानुसार प्रत्येकाने किती तास झोप घ्यावी

Trupti Paradkar  |  Oct 13, 2021
How much you should sleep according to your age

निरोगी राहण्यासाठी प्रत्येकाने काही ठराविक तास शांत आणि निवांत झोपणं गरजेचं आहे. मात्र आधुनिक जीवनशैली, चुकीच्या सवयी आणि कामाचा ताण यामुळे प्रत्येकालाच पुरेशी झोप मिळते असं नाही. अपुऱ्या झोपेमुळे ताणतणाव आणि आजारपणात वाढ होताना यामुळेच दिसून येत आहे. जर शरीराला पुरेसा आराम मिळाला नाही तर त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होणं स्वाभाविक आहे. एखाद्या दिवशी झोप पूर्ण नाही झाली तर दिवसभर थकल्यासारखं वाटत राहतं. याचं कारण प्रत्येकाला त्याच्या वय आणि आरोग्यानुसार झोपेची गरज असते. प्रत्येक वयातील माणसाची झोपेची गरज निरनिराळी असू शकते. यासाठी जाणून घ्या वयानुसार प्रत्येकाने कमीत कमी किती तास झोपणं गरजेचं आहे. 

वयानुसार प्रत्येकाने किती तास झोपावं

वयानुसार माणसाच्या झोपेची गरज वेगवेगळी असू शकते. यासाठी जाणून घ्या तुम्ही तुमच्या वयानुसार पुरेशी झोप घेता का

एक वर्षापर्यंत तान्ह्ये बाळ  

How much you should sleep according to your age

सर्वात जास्त झोप तान्ह्या बाळासाठी गरजेची असते. एक वर्षापर्यंत बाळाने दिवसभरात चौदा ते पंधरा तास झोपणं गरजेचं आहे. ज्यामुळे त्याची शारीरिक आणि मानसिक वाढ आणि विकास झपाट्याने होण्यास मदत होते. चौथ्या महिन्यानंतर बाळाच्या झोपण्याच्या सवयीमध्ये थोडेफार बदल होत जातात. चोथ्या महिन्यापर्यंत बाळ खूप झोपते नंतर ते हळू हळू थोडावेळ जागे राहू लागते. यासाठीच तान्ह्या बाळाची झोपमोड होणार नाही याची काळजी घ्यावी. 

पाच वर्षापर्यंतची लहान मुले

एक वर्षापासून पाच वर्षांच्या मुलांच्या झोपेच्या सवयी निरनिराळ्या असू शकतात. मात्र तीन वर्षापर्यंतच्या मुलांना कमीत कमी बारा ते पंधरा तास झोप मिळणं गरजेचं आहे. त्यानंतर तीन ते पाच वर्षांतील मुलांनी कमीत कमी बारा तास तरी झोपायला हवं. तरच त्यांच्या बुद्धीचा विकास योग्य पद्धतीने होऊ शकतो. 

तेरा वर्षांपर्यंत शाळेत जाणारी लहान मुले

How much you should sleep according to your age

पाच वर्षानंतर मुलांची शाळा आणि अभ्यासाचा ताण वाढू लागल्यामुळे शिवाय शारीरिक हालचालीचा वेग जास्त असल्यामुळे मुले दिवसभर झोपून राहू शकत नाहीत. मात्र असं असलं तरी लहान मुलांना रात्री लवकर झोपवावं ज्यामुळे त्यांची झोप व्यवस्थित पूर्ण होऊ शकते. तेरा वर्षापर्यंतच्या मुलांना कमीत कमी नऊ ते दहा तास शांत झोप यायला हवी.

वीस वर्षापर्यंतची मुले

तरूण मुलांमध्ये आजकाल चुकीच्या सवयी, अभ्यासाचा ताण यामुळे झोपेचे प्रमाण कमी झालेले दिसून येते. मात्र त्यांच्या आरोग्यासाठी हे मुळीच योग्य नाही. तरूण वयातही मुलांनी आठ ते तास झोपणं गरजेचं आहे. अवेळी झोपणं आणि उशीरा उठण्यामुळे त्यांच्या झोपेचं चक्र बिघडतं आणि त्याचे परिणाम आरोग्यावर दिसू लागतात. या वयात मुलांमध्ये अनेक शारीरिक आणि मानसिक बदल होत असतात. यासाठी तरूण मुलांच्या झोपेची योग्य काळजी घेतली जाणं गरजेचं आहे. 

रात्री झोपताना तुम्ही देखील उशीजवळ ठेवता का मोबाईल, वेळीच व्हा सावध

पंचवीस ते साठ वर्षांतील माणसे

How much you should sleep according to your age

तरूण मुलांप्रमाणेच साठ वर्षांच्या आतील सर्व लोकांनी कमीत कमी आठ तास झोपणं गरजेचं आहे. कारण झोपल्यावर मेंदूला चांगला आराम मिळतो. दिवसभर उत्साही राहण्यासाठी, कामाचा वेग वाढण्यासाठी प्रत्येकाने आठ तासांची शांत झोप घ्यायला हवी. मात्र कामच्या ताणामुळे प्रत्येकाला ते शक्य होत नाही. निरोगी राहायचं असेल तर यासाठी लवकर झोपणे आणि लवकर उठणे हा नियम पाळणं गरजेचं आहे.

चाळीशीनंतर झोप झाली असेल कमी तर वापरा सोप्या टिप्स

साठीनंतरचे वृद्ध

असं म्हणतात की, वाढत्या वयासोबत माणसाची झोप कमी होत जाते. मात्र हे चुकीचे आहे कारण माणसाला निरोगी राहण्यासाठी झोपेची खूप गरज असते. जरी वय वाढत असलं आणि कामाचा ताण कमी झाल्यामुळे,. शारीरिक हालचाल कमी झाल्यामुळे झोप कमी येत असली तरी प्रत्येकाला कमीत कमी सहा तास झोपेची गरज ही असतेच. त्यामुळे वृद्ध लोकांनी थोडाफार चालण्याचा व्यायाम करावा, आहाराबाबत नियम पाळावे आणि वेळेवर झोपावे. ज्यामुळे झोपेचा त्रास कमी जाणवेल. 

रात्री झोपेतही होईल वजन कमी, फक्त झोपण्यापूर्वी करा या टिप्स फॉलो

Read More From आरोग्य