सतत गोड खाण्याची तीव्र इच्छा होणे व त्यावर ताबा न मिळवू शकणे हे शुगर ऍडिक्शनचे लक्षण असू शकते. आपल्या रोजच्या आहारात साखर अनेक पदार्थांमध्ये आढळते आणि ती टाळणे जवळजवळ अशक्य आहे. साखरयुक्त पदार्थ आणि पेयांवर भावनिक किंवा मानसिक अवलंबित्व, ज्याला साखरेचे व्यसन किंवा शुगर ऍडिक्शन असेही म्हणतात, हे एक चिंतेचे कारण आहे. प्रक्रिया केलेले अन्न आणि धान्ये शरीरात अन्नाचे चयापचय झाल्यावर अतिरिक्त साखर तयार करतात. माफक प्रमाणात साखर शरीरासाठी हानिकारक नाही, परंतु ती प्रमाणाबाहेर खाल्ल्यास त्याचे अनेक गंभीर दुष्परिणाम होतात.
शुगर ऍडिक्शन कसे लागते
साखरेचे सेवन शरीरात अल्पकालीन उच्च ऊर्जा निर्माण करू शकते. काही अभ्यासांनी असे सुचवले आहे की साखरेचे व्यसन हे कोकेनसारखे आहे. कारण साखर खाल्ल्यावर मेंदूतून डोपामाइन स्त्रवले जाते ज्यामुळे आपल्याला आनंदी वाटते. म्हणूनच बऱ्याच लोकांना सारखे गोड खावेसे वाटते. परंतु साखरेचे व्यसन लागल्यामुळे लठ्ठपणा आणि मधुमेह यांसारखे परिणाम होऊन साखरेचे अतिसेवन होण्याचा धोका असतो. इतर व्यसनांप्रमाणेच, साखरेचे व्यसन हे नैराश्य, चिंता आणि तणाव असलेल्या लोकांसाठी एक विशेष धोका आहे.
याव्यतिरिक्त, ज्या लोकांना सतत थकवा जाणवतो ते ऊर्जा मिळण्यासाठी कार्बोहायड्रेट युक्त, साखरयुक्त पदार्थ खातात. साखर शरीरात एंडोर्फिन सोडते आणि शरीरातील इतर रसायनांशी संयोगित होते, परिणामी शरीरात उर्जेची लाट तयार होते. चिडचिडेपणा, भावनिक तणाव आणि इतर परिस्थिती संतुलित करण्यासाठी लोक गोड खाऊ लागतात. या टप्प्यावर आहाराच्या सवयींवर बरेचदा नियंत्रण नसते आणि साखरेचे व्यसन लागते.
साखरेचे व्यसन कसे कमी करायचे
साखर मेंदूतील प्रत्येक पेशीला इंधन देते. तुमचा मेंदू देखील साखरेकडे एक बक्षीस म्हणून पाहतो, ज्यामुळे तुम्हाला त्याची अधिक इच्छा होत राहते. ज्यामुळे गोडाची सवय सोडणे कठीण होऊ शकते. काही लोक साखरयुक्त पदार्थ अशा प्रकारे खातात जे आरोग्यदायी नसतात. म्हणूनच या व्यसनावर विजय मिळवणे खूप आवश्यक आहे.
काही शुगर डिटॉक्स डाएट तुम्हाला गोड पदार्थ पूर्णपणे टाळण्याचा सल्ला देतात. म्हणजे सर्व फळे, दुग्धजन्य पदार्थ आणि रिफाईंड धान्ये देखील बंद करण्यास सांगतात. म्हणजे तुमचे शरीर पूर्णपणे साखरेपासून मुक्त करणे हा यामागील हेतू असतो. परंतु आहारात असे अचानक कठोर बदल करणे कठीण असते. म्हणूनच फक्त अल्प काळासाठी आपण हे पाळू शकतो आणि कंटाळून थोड्याच वेळात आपण पुन्हा आपले पूर्वीचे गोड खाणे सुरु करतो. म्हणूनच हळू हळू बदल केलेत तर आपण आहारातील साखरेचे प्रमाण कमी करू शकतो.
जिभेला हळू हळू सवय लावा
आपल्याला वाटते तितकी आपल्याला साखरेची गरज नसते. साखरेची सवय कमी करण्यासाठी प्रत्येक आठवड्यात आपल्या आहारातून एक गोड पदार्थ काढून टाकण्याचा प्रयत्न करा. उदाहरणार्थ, रात्रीच्या जेवणानंतरचे गोड खाणे बंद करा. तुमच्या कॉफी किंवा कॉर्नफ्लेक्समध्ये कमी साखर घालणे सुरू करा. कालांतराने, तुमचे साखरेचे सेवन कमी होईल.
पौष्टिक पर्याय निवडा
तुम्हाला गोड खाणे पूर्णपणे सोडण्याची गरज नाही. फक्त साखरेऐवजी पौष्टिक पर्याय जसे की ताजी फळे खा. सुकवलेली, फ्रोजन किंवा शुगर फ्री कॅन्ड फळे खा. एक ग्लास लो फॅट दूध किंवा दही देखील तुमचे साखरेचे क्रेविंग कमी करण्यास मदत करू शकते.
प्रोटीनचे सेवन वाढवा
प्रोटीन खाणे हा साखरेची इच्छा कमी करण्याचा एक सोपा मार्ग आहे. जास्त प्रथिने असलेले पदार्थ हळूहळू पचतात, ज्यामुळे तुम्हाला जास्त काळ पोट भरलेले वाटते. प्रथिने तुमच्या रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण कर्बोदकांप्रमाणे आणि साखरेप्रमाणे वाढवत नाही. चिकन, लो फॅट दही, अंडी, नट्स व बीन्स यांचा आहारात समावेश करा.
तसेच फायबर देखील अनेक प्रकारे साखरेचे क्रेविंग कमी करण्यात मदत करते. उच्च फायबरयुक्त पदार्थ आपल्याला अधिक ऊर्जा देतात. कारण ते तुमची रक्तातील साखर वाढवत नाहीत. फळे, भाज्या यांचा आहारात समावेश करा आणि साखरेचे व्यसन कमी करा.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक