पालकत्व

लहान मुलांच्या मनातून इंजेक्शनची भीती घालवण्यासाठी हे उपाय करा 

Vaidehi Raje  |  Jul 13, 2022
Fear Of Needles In Kids

लहान मुलांना इंजेक्शनची भीती वाटणे सामान्य आहे, कारण लहान मुले खूप संवेदनशील असतात. बरीच मुले इंजेक्शन नुसते बघितले तरी रडून गोंधळ घालतात. पण यात त्यांची चूक नाही कारण ते मनापासून घाबरलेले असतात. हे देखील खरे आहे की इंजेक्शन न देऊन चालणार नाही कारण लसीकरण मुलांचे धोकादायक रोगांपासून संरक्षण करते.लसीकरणाच्या वेळी आपण आपल्या बाळाला रडताना पाहू शकत नसलो तरीही ही परिस्थिती संयमाने हाताळणे आवश्यक आहे. “तू माझे ऐकले नाहीस तर तुला इंजेक्शन देईन” असे म्हणून मुलांच्या भीतीमध्ये भर न घालता त्यांच्या मनातून इंजेक्शन व नीडल्सची भीती कशी जाईल यासाठी आपण प्रयत्न केले पाहिले. जेव्हा मुलांना इंजेक्शन देण्याची गरज असते तेव्हा त्यांना प्रेमाने दिलासा द्या की ते एकटे नाहीत व इंजेक्शन देणे म्हणजे शिक्षा नाही. त्यांना पटवून द्या की इंजेक्शन हे औषधच आहे जे त्यांना भविष्यात आजारी पडण्यापासून वाचवणार आहे. खाली दिलेल्या सोप्या मार्गांचा अवलंब करून तुम्ही तुमच्या मुलांच्या मनातील इंजेक्शनची भीती सहजपणे काढून टाकू शकता. 

मुलांना खरे सांगा 

अनेक पालक मुलांना लसीकरणासाठी घेऊन जातात तेव्हा ते मुलांना खोटे बोलतात की इंजेक्शनने वेदना होत नाहीत. पण असे करू नका. मुलांचे खोटे सांत्वन करू नका. त्याऐवजी त्यांना हे सत्य सांगणे महत्त्वाचे आहे की इंजेक्शन्समुळे थोडेसे दुखेल, पण ते लगेच बरे देखील होईल. थोड्यावेळासाठी मुंगी चावल्यासारखे वाटेल आणि मग दुखणे थांबेल असे त्यांना सांगा. म्हणजे त्यांच्या मनातील इंजेक्शनचा बागुलबुवा कमी होईल. तसेच त्यांना इंजेक्शन घेणे किती आवश्यक आहे, ते कसे आपले रोगांपासून संरक्षण करते हे सोप्या भाषेत समजावून सांगा. 

Fear Of Needles In Kids

लसीकरणादरम्यान बाळाचे लक्ष दुसरीकडे वेधून घ्या

लसीकरणासाठी मुलाला घेऊन जात असताना, तुम्ही त्यांच्या आवडत्या गोष्टींचे पुस्तक किंवा खेळणी सोबत घेऊन जाऊ शकता किंवा त्यांना आवडणारे गाणे त्यांना ऐकवू शकता. इंजेक्शन देताना त्यांचे लक्ष दुसरीकडे वेधून घेतले तर त्यांची भीती कमी होईल. तसेच हे लक्षात ठेवा की बालकाच्या लसीकरणाच्या वेळी तुम्ही घाबरून पॅनिक होऊ नका, याउलट नॉर्मल राहा म्हणजे मुलालाही वाटेल ही काही मोठी गोष्ट नाही. 

इंजेक्शन घेतल्याबद्दल मुलांना छोटेसे बक्षीस द्या

इंजेक्शन घेतल्यानंतर मुलांचे कौतुक करा. त्यांनी भीतीवर मात करत इंजेक्शन घेतले हे त्यांच्या दृष्टीने एका प्रकारचे शौर्यच आहे. त्या  शौर्याबद्दल त्यांचे कौतुक करा आणि त्यांना आवडते चॉकलेट, आईस्क्रीम किंवा त्यांच्या आवडीची छोटीशी वस्तू बक्षीस म्हणून द्या. जेव्हा तुम्ही या पॅटर्नचे अनुसरण कराल तेव्हा तुमचे मूल  त्याच्या आवडीची वस्तू मिळवण्यासाठी का होईना पण इंजेक्शन घ्यायला तयार होईल. 

मुलांना आरामदायक पोझिशनमध्ये ठेवा 

Fear Of Needles In Kids

इंजेक्शन देताना वेदनांच्या भीतीने मुले पळून जायचा प्रयत्न करतात. किंवा सतत हलत असतात. अशावेळी बरेच डॉक्टर असे सुचवतात की मुलाला झोपवून त्याचे हात व पाय धरून ठेवावे आणि मग त्यांना इंजेक्शन द्यावे. परंतु यामुळे उलटे घडते आणि मुलाच्या मनात इंजेक्शनविषयी भीती बसते. त्यामुळे डॉक्टरांना सांगा की त्यांनी मुलाला आरामदायी स्थितीत इंजेक्शन द्यावे. मुलांना सीटवर बसवा किंवा तुम्ही स्वत: मुलाला मांडीवर घेऊन बसा जेणेकरून त्यांना  थोडा धीर मिळेल व आरामदायक वाटेल.

मुलांच्या मनातून इंजेक्शनची भीती काढून टाकण्यासाठी त्यांचे समुपदेशन करणे अत्यंत आवश्यक आहे.तुमच्या मुलांना इंजेक्शनची भीती वाटत असेल तर त्यांना कधीही थेट इंजेक्शन देऊ नका. त्यामुळे त्यांच्या मनातील भीती तर वाढेलच शिवाय ते घाबरून हलत असताना इंजेक्शन दिले तर त्यांना दुखापत होण्याची शक्यताही असते. म्हणूनच आधी त्यांना प्रेमाने समजावून सांगा आणि जेव्हा ते शांत असतील तेव्हाच त्यांना इंजेक्शन द्या. 

Photo Credit – istockphoto 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From पालकत्व