कोणत्याही ऋतूमध्ये दमटपणामुळे बऱ्याचदा धान्यांना कीड लागते. या किड्यांमुळे केवळ धान्यामधील पौष्टिकता कमी होते असं नाही तर त्या धान्याचा स्वादही बिघडतो. विशेषतः तांदळाला जर कीड लागली तर संपूर्ण तांदूळ खराब होतो. कीड लागल्यामुळे तांदूळ लवकर खराब होतो. म्हणूनच डाळी आणि धान्य हे नेहमी एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवावे असा सल्ला देण्यात येतो. तसंच सुक्या ठिकाणी सहसा तांदूळ ठेवावेत, ज्यामुळे त्यात दमटपणा निर्माण होत नाही आणि कीडही लागत नाही. पण कधी कधी इतकी काळजी घेतल्यानंतरही तांदळाला कीड लागते आणि तांदूळ खराब होऊ लागतात. त्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता. तांदळाला कीड लागत असेल तर काही सोपे उपाय आम्ही तुम्हाला सांगत आहोत. याचा वापर करून तुम्ही तांदळाचा करा साठा.
तेजपत्ता आणि कडिलिंबाच्या पानाचा करा वापर
तांदळाचा किड्यांपासून बचाव करण्यासाठी डब्यामध्ये काही तेजपत्ता अर्थात तमालपत्राची पाने आणि कडिलिंबाची सुकलेली पाने ठेवावीत. तमालपत्रामुळे खूपच फायदा मिळतो. तांदळाला कीड लागली असेल तर तमालपत्र हा त्याचा उत्तम पर्याय आहे. कारण तमालपत्राचा सुगंध कीड सहन करू शकत नाही आणि त्यामुळे त्याचा नायनाट होतो. तर कडुलिंबाच्या पानामुळे कीड ही मुळापासूनच नष्ट होते आणि तांदळातून संपूर्ण कीड निघून जाण्यास मदत मिळते. उत्तम परिणामांसाठी तुम्ही एका टाईट कंटेनरमध्ये तमालपत्र आणि कडुलिंबाची पाने घालून तांदळाचा साठा करू शकता. कडुलिंबाच्या पानांचा शरीरासाठीही उपयोग होतो.
लवंगेचा करून घ्या उपयोग
लवंग ही स्वयंपाकघरात आरामात सापडते. कोणाच्याही घरात लवंग नाही असं होणे शक्य नाही. लवंगेच्या जबरदस्त सुगंंधामुळे कीडे नष्ट करण्यास उपयोग होतो. तुम्ही जर तांदळातून कीड काढू इच्छित असाल तर तुम्ही तांदळाच्या डब्यात साधारण 10-12 लवंग घालून ठेवा. तांदळाला कीड लागली असेल तर ती निघून जाण्यास यामुळे मदत मिळते. जर कीड लागली नसेल तर त्यात कीड होऊ नये यासाठीही लवंगेचा उपयोग करता येतो. किटाणुनाशक म्हणून लवंगेचा फायदा होतो. केवळ लवंगच नाही तर तांदळाच्या डब्यात तुम्ही लवंग तेलाचे काही थेंब टाकले तरीही तुम्हाला त्याचा फायदा मिळतो. लवंग खाण्याचेही अनेक फायदे आहेत.
तांदूळ ठेवा रेफ्रिजरेटरमध्ये
हे वाचून तुम्हाला नक्कीच थोडे विचित्र वाटले असेल. पण तुम्ही जेव्हा बाजारातून तांदळाची खरेदी करता तेव्हा पावसापाण्याच्या दिवसात तांदळाला कीड लागण्यापासून वाचवायचे असेल तर तांदूळ रेफ्रिजरेटरमध्ये ठेवणे हा उत्तम उपाय आहे. तुम्ही फ्रिजरमध्ये तांदूळ डब्यात ठेऊ शकता. दुकानातून आणलेल्या तांदळात जर कीड लागली असेल तर फ्रिजरच्या थंड तापमानामुळे कीड मरते आणि तांदूळ स्वच्छ होतात. तसंच फ्रिजमध्ये कीड लागण्याची शक्यताही नसते. पण पावसाळ्याच्या दिवसात तांदळाची खरेदी सहसा करू नये याकडे लक्ष द्या.
लसणीच्या पाकळ्यांचा करा वापर
तांदूळ किड्यांपासून वाचविण्यासाठी तुम्ही तांदळाच्या डब्यात न सोललेली लसूण पाकळ्या 5-6 टाकून ठेवा आणि तांदळामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या. जेव्हा लसणीच्या पाकळ्या पूर्ण सुकतील तेव्हा त्या बाहेर काढा आणि दुसऱ्या घाला. लसणीचा वास हा कीड न लागण्यास मदत करतो.
अधिक वाचा – तुमच्या किचन गार्डनमध्ये सोप्या पद्धतीने लावा लसूण, बाजारातून आणायची गरज नाही
तांदळाच्या डब्याजवळ ठेवा माचिस
माचिसच्या डब्यामध्ये सल्फर असते, जे केवळ तांदूळच नाही तर अन्य धान्यालादेखील कीड लागण्यापासून वाचवते. तुम्ही ज्या ठिकाणी तांदळाचा साठा करणार आहात त्या कपाटात काही माचिसच्या काड्या ठेवा. कीड लागणार नाही.
उन्हात ठेवा तांदूळ
तांदळाला कीड न लागण्यासाठी हादेखील सर्वात सोपा आणि पारपंरिक उपाय आहे. तुम्हाला तांदळात कीड झाली आहे असे लक्षात आल्यावर तांदळाचा डबा एका मोठ्या परातीमध्ये रिकामा करा आणि ही परात उन्हात आणून ठेवा. असं केल्यामुळे कीड आणि त्याची अंडी दोन्ही नष्ट होतात. तुम्हाला तांदूळ जास्त काळासाठी साठवायचे असतील तर तुम्ही जास्त काळ उन्हात ठेऊ नका. अन्यथा तांदूळ तुटण्याची शक्यता असते.
वर दिलेल्या सोप्या टिप्स वापरून तुम्ही तांदूळ किड्यांपासून वाचवू शकता आणि अधिक काळासाठी टिकवूदेखील शकता.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक