लाईफस्टाईल

अशी बनवा मस्त कुरकुरीत कांद्याची खेकडा भजी, टिप्स आणि ट्रिक्स

Leenal Gawade  |  Jul 4, 2022
खेकडा कांदाभजी

 बाहेर मस्त पाऊस पडत असेल आणि काहीतरी चमचमीत खायचे असेल तर… खूप ठिकाणी कांदा आणि बटाटा भजीचा बेत केला जातो. कुरकुरीत भजी बनवणे हे देखील एक स्किल आहे. भजी ही मस्त खुसखुशीत व्हायला हवी असते. त्यासाठी त्यात सोडा घालण्याची गरज असते असे नाही. त्यातल्या त्यात पावसाळ्यात जी कांदा भजी खावीशी वाटते ती म्हणजे खेकडा कांदा भजी. कारण ती खूपच कुरकुरीत आणि मस्त लागते. काही जणांनी कितीही कांदाभजी केली तरी देखील ती तितकीशी कुरकरीत, खमंग किंवा चविष्ट होत नाही अशावेळी काही सोप्या टिप्स आम्ही तुम्हाला देणार आहोत. या टिप्सच्या वापरामुळे तुमची खेकडा कांदा भजी चविष्ट होईल यात काही शंकाच नाही.

कांदे मोठे निवडा

कांदे निवडताना

कांदा भजी करायची म्हणजे पहिले साहित्य आले ते म्हणजे कांदे. खूप जण उन्हाळ्यात चांगला सुका कांदा निवडून घरी आणून ठेवतात. अनेकांनी भजी किंवा आषाढ तळणे याचा बेत आधीच केलेला असतो. त्यानुसारही कांदा अधिकचा घेतला जातो. मस्त पाऊस आणि भजी हे कॉम्बिनेशन कोणालाही हवेहवेसे असते. आता कांदा निवडताना तुम्ही कांद्याचा आकार हा मध्यम निवडायला हवा. कांदा मोठा असेल तर तो भजीमध्ये खूप चांगला दिसतो. त्यामुळे कांदा निवडताना तो मध्यम ते मोठा अशा आकारातील निवडा. त्याची भजी करणे फार सोपे जाते. 

कांदा चिरताना

कांदा भजीसाठी दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कांदा चिरणे. कांदा चिरणे हे देखील तितकेच महत्वाचे आहे. कांदा भजी कुरकुरीत हवी असेल तर तो कांदा उभा पण पातळ चिरायला हवा. काही जणांना चिरणे सोपे जाते. पण काही जणांसाठी चिरण्याचे काम हे तितकेसे सोपे नसते. अशावेळी बाजारात मिळणाऱ्या स्लाईसरचा उपयोग करुन तुम्ही कांदा छान पातळ पातळ चिरुन घ्या. त्यामुळे त्याचे खेकडे म्हणजेच कडा कुरकुरीत होण्यास मदत मिळते. त्यामुळे कांदा छान पातळ चिरा. 

धणे आणि ओवा

कांदाभजी तळताना

कांदा भजीला सगळ्यात जास्त चव आणणारे घटक म्हणजे ओवा आणि धणे. धणे  घेऊन ते थोडे तव्यावर गरम करा. त्यानंतर त्यावर लाटणे फिरवून त्याला जाडसर वाटा. चिरलेल्या कांद्यात धणे घाला. हातावर ओवा घेऊन तो चोळून घाला. आता दोन्ही घटक टाकल्यानंतर ते चांगले चोळून घ्या. कांद्यात ती चव उतरायला हवी त्यामुळे ही ट्रिक खूपच जास्त महत्वाची आहे. तुमच्या भजीला चव आणण्यासाठी ते फारच फायद्याचे ठरतील. 

मीठ महत्वाचे

कांदा आणि मीठ एकत्र आले की, त्याला पाणी सुटणार हे आपण सगळेच जाणतो. खूप जण मीठ कधी घालायचे? यात गोंधळलेले असतात. कधीही मीठ घालताना ते कांदा चिरल्यानंतर घाला. म्हणजे ओवा आणि धणे घातल्यानंतर त्याला चांगले पाणी सुटलेले असेल. कांद्याचे बॅटर खूप वेळ तसेच ठेवून चालत नाही. कारण त्याला पाणी सुटत राहणार. त्यामुळे त्यानंतरच्या क्रिया पटपट हव्यात 

बेसन आणि मसाले

कांद्याला चांगले पाणी सुटले की, त्यामध्ये लाल तिखट आणि हळद घालून ते एकजीव करा. लगेच त्यामध्ये बेसन घालून एकजीव करा. आता तुम्हाला पाणी घालायची काहीही गरज नाही. सारण थोडे घट्ट चालेल. पण ते पातळ नको. कारण नाहीतर भजी पडणार नाही. बेसन टाकणार त्यावेळीच कढईत तेल गरम करा. आच मध्यम करुन मग त्यामध्ये एक एक भजी सोडा. सोनेरी होईपर्यंत तळा.

टिप: सोनेरी भजी तळताना ती काळी होणार नाही याची काळजी घ्या. कारण त्यामुळे कांदा जळतो आणि भजी कडू लागतात. 

आता अशापद्धतीने सोडा न घालता बनवा मस्त कुरकुरीत कांदा भजी.

Read More From लाईफस्टाईल