उन्हाळा असो अथवा कोणताही ऋतू असो चहा घेतल्याशिवाय अनेक जणांची सकाळ सुरूच होत नाही. कारण चहाशिवाय अनेकांचा डोळा उघडतच नाही. तसंच चहा घेतल्याशिवाय दिवसही अपूर्ण वाटतो. तर अनेक जण असतात ज्यांना टपरीवरचा चहा खूपच आवडतो. विशेषतः ऑफिसमध्ये काम करणारे अनेक जण टपरीवरील चहा पिताना दिसतात आणि टपरीवरच्या मसाला चहाची चव ही घरच्या चहाला येत नाही असंही अनेकांचं म्हणणं असतं. पण टपरीवरील चहा बनविणे खरं तर सोपं आहे आणि तुम्ही घरीही हा असा मसाला चहा तयार करू शकता. अनेकांना वाटतं की, चहा बनवणं म्हणजे असं किती मोठं काम असतं. पण चहाचा स्वाद वाढविण्यासाठी मसाला चहा बनविण्यात येतो आणि त्याच्या काही ट्रिक्स आम्ही तुम्हाला या लेखातून देणार आहोत.
मसाला चहा बनविण्याच्या टिप्स आणि ट्रिक्स (Tips to Make Masala Chai)
- मसाला चहा बनविण्यासाठी तुम्हाला योग्य मसाले तुमच्याजवळ असावे लागतात, ज्यामुळे चहाचा स्वाद वाढतो
- पाणी, मसाले, चहाची पावडर, दूध हे सर्व पदार्थ सहसा ताजे असावेत, त्यामुळे चव योग्य येते
- तुम्ही चहामध्ये वाटलेले मसाले घालण्यापेक्षा अख्खे मसाले घालणे अधिक चांगले ठरते. असं केल्यामुळे चहामध्ये केवळ मसाल्याचा सुगंधच येणार नाही तर याचा स्वादही वाढतो
आजीच्या बटव्यातील टिप्स
- चहा अधिक स्वादिष्ट आणि चविष्ट हवा असेल तर तुम्ही त्यात वेलची आणि लवंगचा वापर करावा
- तुम्हाला मसाला चहा बनवायचा असेल तर यामध्ये दुधाचा वापर अधिक प्रमाणात करावा
- तुम्ही जर पाण्याचा चहा बनविणार असाल अर्थात चहात पाण्याचा वापर करण्यात असेल तर यामध्ये चहाच्या पानांचा वापर तुम्ही कमी करा
- तसंच चहा बनवताना तुम्ही दूध आधी तापवूनच घ्या. कच्च्या दुधाचा वापर करू नका. कच्च्या दुधाचा वापर केल्यास, चहाचा स्वाद खराब होतो आणि तुम्हाला त्याचा ताजेपणाही जाणवत नाही
या गोष्टी ठेवा लक्षात
- तुम्हाला मसाला चहा बनवायचा असेल तेव्हा प्रमाणापेक्षा अधिक मसाला घालू नका
- तसंच मसाला एकत्र चहामध्ये टाकू नका
- मसाला चहात वेलचीचा वापर करणार असाल तर तुम्ही लवंगचा वापर अत्यंत कमी करा
- मसाला चहा बनविताना तुम्ही मध्यम आचेवरच उकळा. मसाला चहा अधिक आचेवर उकळल्यास, त्याची चव लागत नाही आणि चहा जळण्याची शक्यता असते
मसाला चहाची रेसिपी (Masala Chai Recipe In Marathi)
साहित्य
- 4 मोठे चमचा चहा पावडर (चहाची पाने)
- 4 मोठे चमचे साखर
- 2 कप दूध
- पाऊण चमचा चहा मसाला
- 15 वेलचीचे दाणे
- 5 काळ्या मिरीचे दाणे
- 2 इंच दालचिनी
- 1 चमचा बडिशेप
- 3 चमचे गुलाबाच्या पाकळ्या
- 5 लवंग
- अर्धा चमचा आल्याची पावडर
- 4 कप पाणी
बनविण्याची पद्धत
- मसाला चहा बनविण्यापूर्वी सर्वात पहिल्यांदा सर्व मसाले तव्यावर भाजून घ्या आणि मग थंड झाल्यावर त्याची पावडर बनवा
- आता गॅसवर भांडे ठेवा आणि त्यात पाणी आणि चहाची पावडर उकळा
- त्यात दूध आणि साखर घालून वरून चहाचा मसाला घाला आणि उकळवा
- चहाचा मसाला घालून चहा अधिक वेळ न उकळवता केवळ एक उकळी आल्यावर खाली उतरवा
- नंतर चहा गाळून घ्या आणि मग गरमागरम मसाला चहा सर्वांना द्या
वरील मसाल्यापैकी कोणताही पदार्थ तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही अजिबात चहामध्ये वापरू नका. तुमच्या स्वादानुसार याचा वापर करावा.
Read More From खाणंपिण आणि नाइटलाईफ
रात्री डाळ अथवा कडधान्य भिजत घालण्यास विसरला आहात, या ट्रिक्स वापरून करा स्वयंपाक
Trupti Paradkar
गरम मसाला बनविण्याची घरगुती पद्धत, येईल पदार्थांना अधिक स्वाद
Dipali Naphade