घर आणि बगीचा

बाथरूमचा दरवाजा पाण्याने खराब होऊ नये यासाठी सोप्या टिप्स

Trupti Paradkar  |  Mar 22, 2021
बाथरूमचा दरवाजा पाण्याने खराब होऊ नये यासाठी सोप्या टिप्स

घर ही प्रत्येकासाठी अशी एक खास जागा असते. कामावरून घरी  गेल्यावर घरात नेहमी निवांत वाटायला हवं.  प्रत्येक घर प्रसन्न ठेवण्यासाठी प्रत्येकजण घराच्या सजावटीवर आणि डागडुजीकडे सावधपणे लक्ष देतो. घरातील छोट्या छोट्या गोष्टींकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर पुढे घराच्या डागडुजीवर फार खर्च करावा लागतो. घराचे दरवाजे, खिडक्या, विजेची बटणे, किचन अशा अनेक गोष्टींची वारंवार दुरूस्ती करावी लागते. घरातील मुख्य दरवाजापेक्षा बाथरूमचे दरवाजे लवकर खराब होतात. कारण त्याचा सतत पाण्यासोबत संपर्क येत असतो. पाण्यामुळे ते कुजतात आणि त्यामधून घाणेरडा वास येऊ लागतो. जर तुम्ही या समस्येमुळे हैराण झाला असाल तर तुमच्या बाथरूमच्या दरवाज्याची अशी घ्या काळजी. ज्यामुळे लवकर तो खराब नाही होणार आणि घर दुरुस्ती वरील तुमचा खर्च वाचेल. 

बाथरूम दरवाजावर प्लास्टिक पेंट लावा

बाथरूममध्ये सतत पाण्याचा वापर केला जात असतो. आजकाल बऱ्याच बाथरूममध्ये अंघोळीसाठी वेगळं सेक्शन केलेलं असतं. पण जर तुमचा बाथरूम तसं नसेल आणि तुमच्या बाथरूमच्या दरवाजावर सतत पाणी पडल्यामुळे तो लवकर खराब होऊ शकतो. यासाठीच बाथरूमचा दरवाजा जर लाकडाचा असेल तर त्याला प्लास्टिक पेंट लावून घ्या. कारण प्लास्टिक पेंटमुळे बाथरूमचा दरवाजा लवकर खराब होत नाही. खरंतर बाथरूमचा दरवाजा तेव्हाच खराब होतो जेव्हा त्यावर सतत पाणी पडतं अथवा दरवाजाजवळ साचणाऱ्या पाण्याचा योग्य निचरा होत नाही. 

instagram

बाथरूम दरवाजाला हार्ड कोटेड कव्हर लावा

तुमच्या बाथरूमचा दरवाजा लाकडाचा असो वा फ्लायवूडचा जर त्याची काळजी घेतली नाही तर तो काही महिन्याच खराब होऊ शकतो. बाथरूमचा दरवाजा पाण्यामुळे खराब होऊ नये यासाठी तुम्ही हार्ड प्लास्टिक कव्हरचा वापर करू शकता. बाथरूमसाठी असलेले हे कव्हर तुम्हाला फक्त तुमच्या बाथरूमच्या दरवाजावर चिकटावे लागतात. आजकाल बाजारात विविध प्रकारचे कव्हर मिळतात तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे कव्हर निवडू शकता. 

बाथरूमसाठी मेटलचा दरवाजा निवडा

बाथरूम डोअरसाठी आजकाल खूप चांगले चांगले पर्याय मिळतात. जर तुमचा बाथरूम सतत ओला झाल्यामुळे बाथरूमचा दरवाजा खराब झाला असेल तर तुम्ही यासाठी मेटलचा दरवाजा वापरू शकता. मेटलचे दरवाजे अतिशय हलके असतात आणि पाण्याने खराब होत नाहीत. शिवाय मेटलचे दरवाजे लाकडाच्या दरवाजाच्या मानाने खूप स्वस्त आणि टिकाऊ असतात. 

काचेचा दरवाजा बाथरूमसाठी एक बेस्ट पर्याय

बाथरूमसाठी  तुम्ही काचेचा दरवाजाही निवडू शकता. आजकाल यामध्येही खूप पर्याय मिळतात. सजावटीच्या दृष्टीने काचेचा दरवाजा तुमच्या घरासाठी उत्तम ठरेल. मात्र या दरवाजाची नीट काळजी घ्यायला हवी. कारण जरी ते सुंदर आणि आकर्षक असले तरी त्यांना हाताळताना विशेष काळजी घ्यायला हवी. तुम्ही तुमच्या बाथरूमसाठी पारदर्शक आणि स्लायडिंग डोअर निवडू शकता. 

अंघोळीसाठी वेगळं सेक्शन करा-

आजकाल होम इंटेरिअरसाठी खूप चांगले पर्याय उपलब्ध असतात. बाथरूमचं इंटेरिअर करताना तुम्ही तुमच्या बाथरूमचे तीन सेक्शन करू शकता. ज्यामध्ये अंघोळीची जागा, कमोड आणि वॉश बेसिन असे तीन भाग असतील. अंघोळीसाठी असलेली जागा बाथरूमच्या दरवाज्यापासून दूर असावी आणि ती जागा काचेच्या दरवाज्याने विभागलेली असावी. ज्यामुळे अंघोळीचे पाणी तुमच्या बाथरूमच्या दरवाज्यावर पडणार नाही आणि तुमचा दरवाजा पाण्यामुळे खराब होणार नाही. मात्र यासाठी तुम्हाला बाथरूम मोठा असण्याची आणि योग्य इंटेरिअर तज्ञ्जाचा सल्ला घेण्याची गरज आहे. 

instagram

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

बाथरूम स्वच्छ करण्यासाठी सोप्या टिप्स

बाथरूममधील जागा व्यवस्थित वापरण्यासाठी उपयोगी टिप्स

बेकिंग सोड्याचा उपयोग करा सफाईसाठी, महागड्या उत्पादनांपेक्षा उत्तम सफाई

Read More From घर आणि बगीचा