Diet

शरीराला पुरेसं झिंक मिळण्यासाठी आहारात वाढवा हे पदार्थ

Trupti Paradkar  |  May 5, 2021
शरीराला पुरेसं झिंक मिळण्यासाठी आहारात वाढवा हे पदार्थ

शरीर निरोगी राहण्यासाठी पोषक तत्त्वांची शरीराला गरज असते. आरोग्य तज्ञ्जांच्या सल्ल्यानुसार दिवसभरात पुरुषांच्या शरीराला ११ ग्रॅम तर महिलांच्या शरीराला ८ ग्रॅम झिंकची गरज असते. जर झिंकची कमतरता असेल तर भूक कमी लागणे, वजन कमी होणे, प्रतिकार शक्ती कमजोर होणे, केस गळणे, जखम लवकर बरी न होणे, डोळ्यांच्या समस्या, त्वचेच्या समस्या अशा अनेक समस्या जाणवतात. शरीरातील झिंकची कमतरता असल्यास झिंकयुक्त औषधे घेण्याचा सल्ला दिला जातो. मात्र भारतीय आहारात असे अनेक पदार्थ आहेत ज्यांच्यामधून झिंकची कमतरता भागवली जाऊ शकते. काजू, ओट्स, मटण, डेअर प्रोडक्ट, बकरीचे दूध अशा अनेक पदार्थांमध्ये झिंक असते. कोरोनाच्या काळात संक्रमण टाळण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी शरीराला पुरेसं झिंक मिळण्याची गरज आहे. सहाजिकच या काळात नेमकं काय खावं हे प्रत्येकाला माहीत असायलाच हवं.

भोपळ्याच्या बिया –

भोपळ्याच्या बिया खाणं आरोग्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकतं. कारण भोपळ्यांच्या बियांमध्ये पुरेशा प्रमाणात झिंक असतंच. शिवाय यामध्ये मॅग्नेशिअम, लोह, कॅल्शिअम, फोलेट आणि बीटा कॅरोटीनसारखे पोषक घटक असतात. भोपळ्याच्या बिया तुम्ही सकाळी अथवा संध्याकाळी स्नॅक्स म्हणून खाऊ शकता. मुखवासमध्ये भोपळ्याच्या बिया घालून जेवणानंतर तो खाल्ल्यास पचनाच्या समस्या कमी होतात. भोपळ्याच्या बिया खाण्यामुळे तुम्हाला त्वरीत ऊर्जा मिळते.

निरनिराळ्या डाळी –

भारतीय आहारात निरनिराळ्या डाळींचा समावेश करण्यात आलेला आहे. कारण डाळी शरीरासाठी अतिशय पोषक असतात. यामध्ये कॅल्शिअम, लोह, प्रोटिन, व्हिटॅमिन्स, कार्बोहायड्रेटसोबतच भरपूर प्रमाणात झिंकदेखील असते. ज्यामुळे तुमचे आजारपणापासून संरक्षण होते. शिवाय भात आणि पोळीसोबत डाळ खाण्यामुळे शरीराला परिपूर्ण आहार मिळतो.

शेंगदाणे –

सुकामेव्यापेक्षा शेंगदाणे स्वस्त असल्यामुळे शेंगदाणे सर्व स्तरावरील लोकांना परवडणारे असतात. शेंगदाण्यांमध्ये पुरेसं झिंक असल्यामुळे कोरोनाच्या काळात प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी सर्वांच्या आहारात शेंगदाणे असणं गरजेचं आहे. शेंगदाणे खाण्यामुळे तुमच्या शरीराला झिंकचा पूरवठा तर होतोच शिवाय लोह, व्हिटॅमिन ई, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, फोलिक अॅसिड आणि फायबर्सही मिळते.

तीळ –

तीळगुळाप्रमाणेच अनेक भारतीय खाद्यपदार्थांमध्ये तीळ घातले जातात. बऱ्याचदा सॅलेडमध्ये रोस्टेड तीळ घालून खाण्याची पद्धत आहे. याचं कारण तीळामध्ये प्रोटिन्स, कॅल्शिअम, बी कॉप्लेक्स आणि कार्बोहायड्रेट भरपूर असते. एवढंच नाही तर तीळामुळे तुमच्या शरीराला योग्य प्रमाणात झिंकचा पूरवठादेखील होतो. 

अंड्याचा पिवळा भाग –

फिटनेस फ्रिक लोकांना नियमित अंडे खाण्याची सवय असते. मात्र अशी माणसं त्यांच्या डाएटमध्ये अंड्याचा फक्त पांढरा भाग घेतात. पण जर तुमच्या शरीरात झिंकची कमतरता असेल तर तुम्ही अंड्याचे पिवळे बलकदेखील शिजवून खायला हवे. कारण यामध्ये झिंकसोबत कॅल्शिअम, थायमिन, व्हिटॅमिन बी 6, फोलेट, व्हिटॅमिन बी 12, लोह, फॉस्फरस यासोबतच झिंकही भरपूर प्रमाणात मिळते.

अळशीच्या बिया –

अळशीच्या बिया आहात असण्याचे अनेक फायदे आहेत. मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अळशीच्या बियांमध्ये झिंक असतं. सध्या कोरोना महामारीच्या काळात प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी अळशीच्या बिया खायला हव्या. कारण यातून तुमच्या शरीराला झिंकसोबतच पुरेसे अॅंटि ऑक्सिडंट देखील मिळतात. अळशीच्या बिया तुम्ही भाजून पावडर करून जेवणात वापरू शकता. 

फोटोसौजन्य – pixels

अधिक वाचा –

उन्हाळ्यात यासाठी खायलाच हवेत ताडगोळे

सतत खाऊ नका ओवा,संभवतील या आरोग्य तक्रारी

शरीर निरोगी राहण्यासाठी नियमित करा 5 व्यायाम प्रकार

Read More From Diet