मनोरंजन

विशाल सिंगने सिद्ध केलं कलेला नसतं भाषेचे ‘बंधन’

Trupti Paradkar  |  Aug 26, 2019
विशाल सिंगने सिद्ध केलं कलेला नसतं भाषेचे ‘बंधन’

मराठी टेलिव्हिजन माध्यमावर सध्या ‘युवा सिंगर एक नंबर’ हा कार्यक्रम अल्पावधीतच प्रेक्षकांचा आवडता शो झाला आहे. यावरून मराठी मनोरंजन वाहिनीवरील कथाबाह्य कार्यक्रमांना सध्या फारच लोकप्रियता मिळत आहे असं दिसत आहे. अभिनेता वैभव मांगले आणि गायिका सावनी शेंडे असे उत्तम परीक्षक, मृण्मयी देशपांडे सारखी हजरजबाबी सूत्रसंचालिका आणि गायन स्पर्धेची एक निराळी संकल्पना या सगळ्या खास गोष्टींमुळे या शोला ‘एक नंबर’ लोकप्रियता मिळवण्यात कार्यक्रमाला यश आले आहे. अर्थातच, वेगळी आणि हटके संकल्पना असलेल्या या गायन स्पर्धेची त्यामुळे सर्वत्र चर्चा आहे. असं म्हणतात ‘कलेला कोणतीच भाषा नसते’. विशेष म्हणजे युवा सिंगर एक नंबर या शोमधून हे अगदी जवळून प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.’युवा सिंगर’ या च्या मंचावर वय, भाषा किंवा इतर कोणतंही  बंधन नाही. त्यामुळे विविध वयोगटाचे, विविध भाषेचे स्पर्धक यातून पुढे येत आहेत. मराठी टेलिव्हिजनवरचा हा खऱ्या अर्थाने एक सर्वसमावेशक असा कार्यक्रम बनला आहे.

युवा सिंगर एक नंबरमध्ये ‘विशाल सिंग’ची जादू

विशाल सिंग हा उत्तरप्रदेशचा तरुण सध्या, ‘युवा सिंगर’ कार्यक्रमातून सर्वांची मने जिंकून घेत आहे. आतापर्यंत त्याने आपल्या प्रत्येक सादरीकरणातून सर्वांच्याच हृदयावर राज्य केलं आहे. अमराठी असूनही उत्कृष्ट मराठी भाषा उच्चार आणि संगीताचं उत्तम ज्ञान यामुळे तो सर्वांचा आवडता स्पर्धक होत आहे. जेव्हा मागील एका भागात ‘तुझ्या प्रीतीचा हा विंचू मला चावला’ हे गाणं विशाल सिंग ने सादर केलं तेव्हा सर्वांचे चेहरे अगदी अवाक होऊन त्याच्याकडे पाहात होते. विशालचे उच्चार व लहेजा ऐकून तो अमराठी आहे, हे कुणीही सांगू शकणार नाही. उत्तरप्रदेशात जन्म झालेल्या आणि मुंबईत वाढलेल्या विशालला गाण्याची खूप आवड आहे. त्याने अप्रतिमरित्या गायलेले मराठी गाणं, हीच या गोष्टीची साक्ष ठरत आहे. या शोमधून मातृभाषा भोजपुरी असणाऱ्या विशालने, मराठी प्रेक्षकांवर राज्य करण्याची कमाल करून दाखवली आहे. 

परिक्षकांची प्रतिक्रीया

विशाल भोजपुरी आहे हे समजताच, परीक्षक वैभव मांगले यांनी त्याच्याशी भोजपुरी भाषेत संभाषण सुरु केले. उत्तरप्रदेशचा विशाल अस्खलित मराठी बोलत असतांना, वैभव मांगले यांनी भोजपुरी संवादांमध्ये मात्र त्याच्यावर वर्चस्व गाजवले. हे बघून मृण्मयी देशपांडे सुद्धा चकित झाली होती. कोकणातील रत्नागिरीत जन्माला आलेल्या वैभव मांगलेला मराठीतील विविध बोलीभाषातून अभिनय करण्याचं कौशल्य अवगत आहे. कोकणी, मालवणी, वऱ्हाडी अशा विविध बोलीभाषा तो सफाईदारपणे बोलू शकतो. मात्र या शोमधून वैभवने भोजपूरी भाषा बोलून त्याचं भाषेवरील प्रभूत्व दाखवून दिलं आहे. ज्यामुळे अमराठी गायकाने मराठी गाणं गाऊन आणि वैभवने भोजपूरीत बोलून कलेला कोणतीच भाषा नसते हे सिद्ध केलं आहे. एक आगळीवेगळी संकल्पना घेऊन आलेला हा कार्यक्रम, अशा निराळ्या मजेदार किश्यांमुळेही लोकप्रिय झालेला आहे. अशीच मजा-मस्करी व धमाल या शोमध्ये सुरूच राहील. मात्र या शोमधून नवनवीन आणि प्रतिभावान कलाकार जगासमोर येतील हे मात्र नक्की. 

अधिक वाचा-

#BBM2 नंतर शिवानी सुर्वेची दुहेरी भरारी

SHOCKING : Insha-Allah चित्रपटाबाबत भाईजानचं धक्कादायक ट्वीट

DIY: या गणेशोत्सवाला घरच्या घरी स्वतःच तयार करा अशी इकोफ्रेन्डली सजावट

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

Read More From मनोरंजन