बॉलीवूड

“माझं नाव त्यांनीच ठेवलं होतं “-अभिनेता नील नितीन मुकेशने शेअर केली लतादीदींची आठवण

Vaidehi Raje  |  Feb 7, 2022
“माझं नाव त्यांनीच ठेवलं होतं “-अभिनेता नील नितीन मुकेशने शेअर केली लतादीदींची आठवण

लतादीदींच्या जाण्याने केवळ संगीतक्षेत्रच नव्हे तर सगळा देशच दुःखाच्या सागरात बुडाला आहे. त्यांच्या गळ्यात साक्षात देवी सरस्वतीच होती ह्याबद्दल कुणाचेच दुमत नसेल. वयाच्या तेराव्या वर्षांपासून संगीताची अविरत सेवा करणाऱ्या लतादीदी अखेर काल पंचत्वात विलीन झाल्या. त्यांनी संगीतक्षेत्रात  आणि भारतीय चित्रपटक्षेत्राला दिलेले योगदान अनन्यसाधारण आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात लतादीदींचे करोडो चाहते आहेत. अनेकांशी तर त्यांचे घरच्यासारखे संबंध होते त्यामुळे अनेकांनी काल लतादीदींच्या आठवणींना उजाळा दिला. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता नील नितीन मुकेशने देखील काल इंस्टाग्रामवर पोस्ट करून लतादीदींना आदरांजली वाहिली व त्याच्या आठवणींना उजाळा दिला. “माझे नाव त्यांनीच ठेवले होते”, असे त्याने त्या पोस्टमधून शेअर केले.  

लतादीदी ही देवी होती  

नील नितीन मुकेशने इंस्टाग्रामवर लतादीदींचे त्याच्या  कुटुंबाशी असलेल्या जवळच्या नात्याविषयी लिहिले. त्याने त्याचे  वडील नितीन मुकेश आणि आजोबा मुकेश यांच्याबरोबर असलेले लतादीदींचे  फोटो शेअर केले व लतादीदींना आदरांजली वाहिली. नीलने लिहिले की “माझ्या कुटुंबाला या क्षणी काय वाटतेय हे मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही.  आम्ही उद्ध्वस्त झालो आहोत. माझ्या वडिलांसाठी संगीताची सुरुवात लतादीदींपासूनच झाली आणि त्यांचे संगीत लतादीदींवरच येऊन संपते. दीदींच्या जाण्याने माझे वडील पूर्ण कोलमडले आहेत. लतादीदी ही देवी होती जिची माझे वडील आणि आपण सर्वजण पूजा करत होतो.”

अधिक वाचा – सुनिल ग्रोव्हरच्या उपचारांसाठी सलमान खानचा मदतीचा हात

त्यांनीच माझे नाव ठेवले होते

लतादीदींनीच आपले नील हे नाव ठेवल्याचेही नील नितीन मुकेशने शेअर केले. तो पुढे लिहितो की, “लतादीदी म्हणजे साक्षात सरस्वती होत्या. मुकेश कुटुंबातील 4 पिढ्या त्यांच्यावर प्रेम करतात. 3 पिढ्यांनी तर त्यांच्याबरोबर काम केले आहे. माझ्या कुटुंबाच्या पिढ्यांनी केवळ त्यांच्याबरोबर कामच केले नाही तर  तर आज आमचे नाव त्यांच्यामुळे झाले आहे.  माझे तर नाव त्यांनीच ठेवले आहे.  आज त्या परमेश्वराशी एकरूप झाल्या आहेत. लतादीदी आम्ही तुमच्यावर कायम प्रेम करत राहू.” या शब्दांत आदरांजली वाहून नीलने लतादीदींच्या स्मरणार्थ हात जोडले. 

अधिक वाचा – मीरा जगन्नाथ, जय दुधाणे बिग बॉसनंतर पहिल्यांदाच एकत्र

लतादीदी पंचत्वात विलीन 

प्रकृती अस्वास्थ्यामुळे लतादीदी अनेक दिवस रुग्णालयात दाखल होत्या. त्यांना करोनाची लागण झाली होती त्यात त्यांना न्यूमोनियाही झाल्याने त्यांची प्रकृती खालावली होती. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करीत त्यांच्यावर उपचार केले परंतु अनेक महत्वाचे अवयव निकामी झाल्याने अखेर काल सकाळी त्या हे जग सोडून गेल्या. काल संध्याकाळी 6.30 वाजता शिवाजी पार्कवर संपूर्ण शासकीय इतमामात लतादीदींवर अंत्यसंस्कार करण्यात आले. लतादीदींना अखेरची मानवंदना देण्यासाठी त्याच्या अंत्यसंस्काराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रेमळ स्वभावाच्या लतादीदींना अखेरचा निरोप देताना अनेकांना त्यांचे अश्रू आवरले नाहीत.  

28 सप्टेंबर 1929 रोजी जन्मलेल्या, लतादीदींनी 1942 मध्ये वयाच्या 13 व्या वर्षी कारकिर्दीला सुरुवात केली. सात दशकांहून अधिक काळच्या कारकिर्दीत गानकोकिळा म्हणून नावारूपाला येत लतादीदींनी  एक हजाराहून अधिक हिंदी चित्रपटांसाठी गाणी रेकॉर्ड केली. त्यांनी 36 हून अधिक प्रादेशिक भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये  गाणी रेकॉर्ड केली. त्यांनी संगीतक्षेत्राला दिलेल्या योगदानानिमित्त त्यांना  2001  मध्ये भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देण्यात आला. एमएस सुब्बुलक्ष्मी यांच्यानंतर भारतरत्न मिळवणाऱ्या त्या दुसऱ्या गायिका होत्या.  लतादीदींच्या जाण्याने त्यांच्या धाकट्या भावंडांना तसेच समस्त भारतीयांना देखील पोरके झाल्यासारखे वाटते आहे.   

लतादीदींच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन! 

फोटो सौजन्य – नील नितीन मुकेश यांचे इन्टाग्राम प्रोफाइल  

अधिक वाचा – भारताचा ‘सूर’ हरपला, लता मंगेशकर यांचे निधन

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From बॉलीवूड