xSEO

महाराष्ट्राची शान लोकगीत मराठी माहिती | Marathi Lokgeet

Leenal Gawade  |  Dec 21, 2021
मराठी लोकगीतं

लोकसाहित्य हे वंशपरंपरेने चालत आलेले असे साहित्य आहे. त्यामुळे त्याचा उगम असा निश्चित सांगता येणार नाही. लोकांना उपदेश देण्यासाठी त्यांना समजावे यासाठी पटेल अशा शब्दांमध्ये लयबद्ध करुन लोकगीते तयार करण्यात आली. पण आज इतका कालावधी उलटून आणि आधुनिक काळ येऊनसुद्धा या लोकगीताची ख्याती काही कमी होताना दिसत नाही. उलट या लोकगीतांचा आधार घेऊन अनेक जण आजही वेगवेगळ्या लोकगीतांचा समावेश करतात. आता लोकगीत म्हणजे एक ठराविक लोकगीत नाही. तर त्यामध्येही अनेक प्रकार पाहायला मिळतात. लोकसाहित्यात लावणी, भारुड, पोवाडे, भोंडल्याची गाणी, सकाळी दारात येणाऱ्या वासुदेवाची गाणी असे अनेक प्रकार आपण आतापर्यंत ऐकले असतील. लोकगीत मराठी माहिती (Lokgeet Marathi) ही सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण या माध्यमातून करणार आहोत. चला जाणून घेऊया लोकगीत मराठी माहिती. याशिवाय होळी सणाची गाणी देखील तुम्हाला ऐकायला हवीत. 

लावणी – लोकगीत मराठी | Lavani Lokgeet Marathi

लावणी

लावणी हा महाराष्ट्रातील लोककलेचा प्रकार आहे. ठसक्यात जी सादर केली जाते त्याला लावणी असे म्हणतात. लावणीला तमाशा असे देखील म्हटले जाते. ‘लवण’  म्हणजेच लावण्य किंवा सुंदर या शब्दावरुनच लावणी या शब्दाचा उगम झालेला आहे. लावणीमध्ये श्रृगांररस ओतप्रोत भरलेला असतो.  लावणीमध्ये नुसते गीत येत नाही. तर त्याची ठसकेबाज अदाकारी ही देखील पाहण्यासारखी असते. म्हणूनच आजतागायत हा प्रकार चांगलाच टिकून आहे. लावणी ही तमाशाचा किंवा फडाचा भाग असली तरी देखील तिला आता जगभरात मान्यता मिळाली आहे. जुनी लावणी आणि आता आलेल्या काही नवीन लावणीने लोकांच्या मनात घर केले आहे.लावणीच्या उत्पत्ती विषयी दोन विचार प्रवाह आहेत. संताचे विचार घेऊन शाहिरांनी विविध रसांच्या रचना केल्या.  बाराव्या आणि तेराव्या शतकात तर अध्यात्मिक विषयांवर लावण्या होत असतं. पण त्यानंतर केवळ श्रृगांर रसातच लावण्या होऊ लागल्या. चांदीची लोटी बसली घासीत…. ते बाजले की बारा या लावणीमध्ये कायम दुहेरी अर्थ दिसून आला आहे. आता लावणी ही केवळ श्रृगांरीकच असते. लावणीचे साधारणपणे तीन प्रकार असतात. गानप्रधान लावणी, नृत्यप्रधान लावणी आणि अदाकारीप्रधान लावणी या वेगवेगळ्या लावणींचे सादरीकरण हे देखील वेगळे असते.यामध्ये घुंगरु,ढोलकी यचा जास्तीत जास्त वापर केला जातो.  लावणी हा लोकगीताचा प्रकार त्यामुळे चांगलाच प्रचलित आणि आजही लक्षात राहिलेला असा आहे.

भारुड -लोकगीत मराठी | Bharud Geet Marathi

भारुड

भारुड हा एक पद्य वाड्:मयाचा प्रकार आहे. संतानी भारुडाचा उपयोग करुन समाजोपयोगी संदेश देण्याचे काम केलेले आहे. आजही अनेक ठिकाणी भारुड ही आवर्जून गायली जातात.  ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, रामदास आणि एकनाथ यांच्यानंतर झालेल्या थोर संतानी भारुडाची रचना केलेली आहे. भारुड याचा अर्थ धनगर असा घेतला जातो. असा दाखला महानुभाव पंथाच्या ग्रंथात केलेला आहे. ही एक आध्यात्मिक आणि धार्मिक अशी रचना असून अनेक भारुडांचे वाचन आजही मोठ्या उत्साहात आणि आनंदात केले जाते. भारुड हे बोलीभाषेत केले जातात. अगदी तळागाळातील लोकांनाही त्याचा अर्थ कळावा अशी त्याची रचना केलेली असते. भारुडाचे तीन प्रकार आहेत.  भजनी, सोंगी आणि  कूट भारुड असे प्रामुख्याने त्याचे प्रकार मानले जातात. भजनी भारुड हे एखाद्या किर्तनाप्रमाणे असते. तर कूट भारुडाचा अर्थ लावावा लागतो. अनेकदा अशा भारुडाचे दुहेरी अर्थ दडलेले असतात. पण भारुड हा प्रकार अश्लील नसतो. लोक शिक्षणासाठी भारुडाची रचना करण्यात आली या भारुडांमध्ये महिला भारुड रचना आणि सादरीकररण करणाऱ्या व्यक्तिंचा देखील समावेश आहे.  महिला भारुड रचनाकारमध्ये गंगूबाई जाधव, चंदाबाई तिवाडी अशा काही भारुडरचनाकारांचा समावेश आहे.

पोवाडे-लोकगीत मराठी | Powada Sangeet Marathi

पोवाडे

पोवाडा हा प्रकार माहीत नाहीत अशा व्यक्ती फारच विरळा असतील. कारण महाराजांचा पोवाडा हा आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे.  पोवाडा हा वीररसातील लोकगीतांचा प्रकार आहे. लोकगीत मराठी माहिती घेताना पोवाड्याची माहिती घेतली जाणार नाही असे मुळीच होणार नाही. पोवाडे हे उंच आणि चढ्या आवाजात गायले जातात. त्याची सुरुवात इतकी जोरदार असते की, ते ऐकल्यानंतर अंगावर काटा आल्यावाचून राहत नाही. मराठी भाषकांचा स्फूर्ति देणारा असा हा गीत प्रकार आहे.  भारतात साधारण 17 व्या शतकात पोवाड्याची निर्मिती झाली.  ऐतिहासिक घटनांची साक्ष देणारा असा पोवाडा हा प्रकार आहे.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या शूरवीर घटना सांगणारे अनेक पोवाडे आतापर्यंत तुम्ही नक्कीच ऐकले असतील .कवी तुलसीदास, यमाजी भास्कर, राम जोशी, होनाजी बाळ, अनंत फंदी यांनी वेगवेगळ्या पोवाड्याची आणि वेगवेगळ्या शूरवीरांवर पोवाड्याची निर्मिती केेलेली आहे.  पोवाडे हे आजही खास कार्यक्रमानंदरम्यान गायले जातात. पोवाडा या लोकगीत मराठी माहिती घेतल्यानंतर तो तुम्हाला ऐकायची इच्छाही नक्कीच होईल. 

भोंडल्याची गाणी-लोकगीत मराठी | Bhondala Sangeet Marathi

भोंडल्याची गाणी

दिंड्या मोड ग पोरी…दिंड्याची लांब दोरी. भोंडला हा प्रकार नवरात्रीच्या काळात अनेकांनी ऐकला असेल. महिला एकत्र येऊन वेगवेगळ्या गाण्यांवर फेर धरतात आणि नाचतात. पण भोंडला आणि बॉलीवूड गाण्यांमध्ये बराच फरक आहे बरं का! भोंडल्याची गाणी ही नित्य कामांविषयी, संसाराविषयी आणि मजेशीर अशी असतात. पूर्वीच्या काळी महिलांना फार काही सूट नसायची अशावेळी एकत्र येऊन मजा करण्यासाठी आणि नटण्याची महिलांना एक संधी मिळते. भोंडला हा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात प्रचलित असा प्रकार आहे.  नऊरात्रीच्या नऊ दिवसात भोंडला खेळला जातो. ज्याप्रमाणे हल्ली रास-गरबा खेळला जातो. अगदी तसाच हा पारंपरिक प्रकार आहे. यामध्ये रोज वेगवेगळ्या शुभ चिन्हांचा वापर केला जाते. यामध्ये हत्ती,फुलांच्या माळा ,धान्य यांचा वापर केला जातो. हा खेळ खेळून झाल्यावर खिरापतही ठेवली जाते.  याची सुरुवा ही नमन गीतापासून केली जाते. त्यानंतर तास दोन तास भोंडला सुरु राहतो.

वासुदेवाची गाणी-लोकगीत मराठी | Bhondala Sangeet Marathi

वासुदेवाची गाणी

आपले डोळेही उघडायच्या आत आपल्या मंगलमयी अशा गाण्यांनी सगळ्यांना  उठवणारा वासुदेव तुम्हाला सगळ्यांना आठवतो का? डोक्यावर मोरपंखाची टोपी, पायघोळ अंगरखा,धोतर आणि  खांद्यावर झोळी घेऊन फिरणारा वासुदेव हा आता फार कमी लोकांना पाहायला मिळत असेल. पण आजही अनेक लहान गावांमध्ये असे वासुदेव येतात. त्यांच्या मुखी अशी गोड गाणी असतात. ही गाणी म्हणजे समाजरुपी आरसा आहे. ज्यामध्ये समाजासाठी उपयोगी अससा संदेश दिलेला असतो. संसार करताना आणि घर सांभाळताना तुम्ही कशाप्रकारे राहायला हवे या सगळ्या गोष्टी यामध्ये सांगितल्या जातात.  वासूदेव कोणीही होऊ शकते. कारण हे केवळ समाजप्रबोधनासाठी घेतलेले रुप आहे. घरोघरी जाऊन भिक्षा गोळा करुन ते आपले जीवन व्यतीत करतात.  वासुदेवाची परंपरा ही कधी सुरु झाली याची याविषयीची नक्की माहिती कोणालाही नाही. असे म्हणतात की, पूर्वीच्या काळी म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात वासुदेवांच्या मदतीने शिवाजी महाराज संदेश पाठवत असतं.  हेरगिरीसाठी त्यांचा उपयोग केला जात असे. वासुदेवाच्या गाण्यामध्ये नामदेव, ज्ञानेश्वर, तुकाराम आदींची वेगवेगळी रुपके आढळून येतात.

पोतराजाची गाणी-लोकगीत मराठी | Potraj Geet Marathi

पोतराजाची गाणी

पोतराज हा महाराष्ट्राच्या कलाप्रकारामधील एक कलाप्रकार आहे. हा कलाप्रकार खूपच जास्त प्रचलित असा कलाप्रकार आहे. हल्ली पोतराज म्हणजेच चाबुकवाले फारसे दिसून येत नाही. पण आजही बुगूबुगू वाजवत ते अनेक ठिकाणी फिरताना दिसतात. अंगावर चाबकाचे फटके मारुन घेत ते नाचताना दिसतात. त्यांच्या पायात घुंगराची चाळ बांधलेली असते. मरीआईचे भक्त अशी त्यांची ओळख असते. त्यामुळे ते देवीचे उपासक असतात. देवीशी निगडीत गाणी गात ते दरोदारी फिरतात. त्यांच्याबद्दल इतिहासात फार काही नोंदी नसल्या तरी देखील  पोतराज हे आजही आपल्या आजुबाजूला दिसतात.

भलरी गाणी-लोकगीत मराठी | Bhalari Geet Marathi

भलरी गाणी

भलगडी दादा… भलगडी… हे शेतकऱ्यांच्या आयुष्याशी निगडीत असं गाणं तुम्ही अगदी लहानपणापासून ऐकले असेल. भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि या कृषीप्रधान देशामध्ये शेतकऱ्यांचे स्थान हे फारच वेगळे आहे. भलरी गाणी ही खास शेतकऱ्यांची गाणी आहेत. लोकगीत मराठी माहिती घेताना या भलरी गाण्याची माहिती घेणे देखील खूपच जास्त गरजेचे आहे. या प्रकाराबद्दल फार काही नोंदी नसल्या तरी तुम्हाला सोशल मीडियावर त्याच्या अनेक गाणी नक्कीच मिळतील. मराठी भाषेमध्ये असलेली शेतकऱ्यांची ही गाणी तुम्ही ऐकली नसतील तर ती ऐकायला हवीत असे आहे.  भलरी हा ग्रामीण गीतांचा प्रकार आहे. शेतात राबताना खूप कष्ट करावे लागतात. अशावेळी कामाचा थकवा जावा आणि उर्जा यावी यासाठी एकत्र येऊन ही गाणी गायली जातात.  याला जागल्या असे देखील म्हटले जाते. आदिवासी भागांमध्ये त्यांच्या भाषेत ही गाणी गायली जातात. एका विशिष्ट सुरात ही गाणी गायली जातात.

गोंधळाची गाणी- लोकगीत मराठी | Gondhal Geet Marathi

गोंधळ गाणी

आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्तांना …. गोंधळ हा फारच प्रचलित असा लोकगीताचा प्रकार आहे. गोंधळ हा अनेक कार्यक्रमादरम्यान घातला जातो. देवांना प्रसन्न करण्यासाठी गोंधळ घातला जातो.  गोंधळ हा विधिनाट्य प्रकारातील एक प्रकार आहे. महाराष्ट्र, कर्नाटक,मध्यप्रदेश आणि आंध्रप्रदेश या ठिकाणी याची प्रथा आहे. अनेक जण लग्नानंतर गोंधळ अगदी हमखास घालतात. गोंधळ हा जागरणाचा प्रकार आहे.  गोंधळी हे देखील देवीचे उपासक असतात. गोंधळात महिलांचा सहभाग हा नसतो. यात पुरुषच समाविष्ट असतात. वेगवेगळ्या अध्यात्मिक कथांची सांगड पद्यामध्ये करुन नाट्यमयरित्या याचे सादरीकरणे केले जाते. यामध्ये एक प्रमुख साथीदार असत आणि बाकीचे त्याला साहाय्य करणारे असतात. लोकगीत मराठी माहिती घेत असताना याची माहिती नक्कीच घ्यायला हवी असा हा लोकगीताचा प्रकार आहे.  या लोकगीतासाठी संबळ, तुणतुणे, झांज, डिमडी, झांजरी यांचा वापर केला जातो. यासाठी केलेली वेषभूषा ही देखील वेगळी असते.  गोंधळी समाजातील लोक ही कला सादर करताना दिसतात. 

गवळण- लोकगीत मराठी | Gavalan Sangeet Marathi

गवळण

गवळण हा देखील तमाशाचा एक भाग आहे. अनेकदा तमाशाची सुरुवात करताना गवळण सादर केली जाते. गवळण हा कृष्ण भक्तीचा एक प्रकार आहे. गणानंतर गवळण सादर केली जाते.  गवळणीत कृष्ण भक्तीची गाणी असतात.  गवळणीमध्ये मजा-मस्ती केली जाते. कृष्ण हा जसा खोडकर होता. तो सगळ्यांची खोडी काढायचा. सगळ्यांची छेड काढायचा त्याचे नाट्य रुपांतर ही अगदी त्याच पद्धतीने केले जाते. त्यामुळेच ही बघण्याची मजा काही वेगळीच असते.  गवळण ही पारंपरिक पद्धतीने राधाकृष्णांच्या लिलयांवर आधरीत अशी असते.  गवळणीमागे केवळ मनोरंजन हे एकमेव उद्दिष्ट्य असते. त्यामुळे हा प्रकार आजही चांगला गाजलेला आहे.  याशिवाय तुम्ही थोर समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांची माहिती घेऊनही ज्ञानात भर घालू शकता.

जात्यावरील गाणी- लोकगीत मराठी | Jatayvaril Gani Marathi

जात्यावरील ओवी

आताच्या काळी पीठं बनवण्यासाठी पीठाच्या गिरण्या आहेत. अगदी इन्स्टंट अशा पद्धतीने हल्ली पिठं मिळतं. पण पूर्वीच्या काळी जात्यावर एकत्रच पीठ दळले जात होते. मोठ्या प्रमाणात दळण काढताना जात्यावरील गाणी सादर केली जाते. जात्यावरील गाणी ही विशिष्ट स्वरात गायली जातात.  त्यामुळे ही गाणी ऐकायला मधूर वाटतात.  यालाच जात्यावरील ओवी असे देखील म्हटले जाते. सतराव्या शतकात देखील  याच्या नोंदी दाखवल्या जातात.  जात गोलाकार फिरवताना एक उर्जा लागते ही उर्जा या गाण्यातून मिळते.

प्रसिद्ध लोकगीत मराठी संगीतकार

लोकसंगीताचा विचार करता काही प्रसिद्ध लोकसंगीतकारांची थोडक्यात माहिती घेऊया.

शाहीर साबळे

शाहीर साबळे

जन्म :  3 सप्टेंबर 1923
मृत्यू : 20 मार्च  2015
शाहीर साबळे उर्फ कृष्णराव गणपतराव साबळे हे मराठीतील प्रसिद्ध लोकशाहीर आहेत.  भारत स्वातंत्र्याच्या चळवळीत आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत लोकशाहीर यांचे खूप मोठे योगदान आहे. शाहीर साबळे  हे गीतकार, संगीतकार म्हणून ओळखले जात.अगदी लहानपणापासूनच त्यांचे सामाजिक कार्यात योगदान होते. समाजाची दुखणी त्यांनी आपल्या लोकसंगीतातून मांडले. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा पाठवून तुम्ही त्या दिवसाची शान वाढवू शकता.

प्रसिद्ध लोकसंगीत
मुंबई नगरी बडी बाका… जशी रावणाची दुसरी लंका
या विठूचा गजर हरि नामाचा झेंडा रोविला

होनाजी बाळा

होनाजी बाळा यांचा तालमीतला फोटो

होनाजी सयाजी शिलारखाने आणि बाळा कारंजकर या दोन व्यक्तींचे टोपण नाव होनाजी बाळा असे ठेवले गेले होते.  होनाजी हे शाहीर घराण्यातील होते. त्यांचा मित्र होनाजी बाळा यांनी एकत्र येऊन  कवने गायली. होनाजी यांनी लावण्या, पोवाड्या आणि भूपाळी यांची रचना देखील केली.

प्रसिद्ध लोकसंगीत
घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला(भूपाळी )
छबीदार सुरत, साजिरी दिसे गोजिरी (लावणी)
लटपट लटपट तुझं चालणं (लावणी )

शाहीर विठ्ठल उमप

शाहीर विठ्ठल उमप

जन्म:  15 जुलै 1931
मृत्यू : 26 नोव्हेंबर 2010
शाहीर विठ्ठल उमप मराठीतील सुप्रसिद्ध लोककलाकार. उमप यांनी अनेक कोळीगीते आणि  भीम गीते लिहिली आहेत. त्यांनी ती चालबद्ध देखील केलेली आहेत.  शाहीरांच्या नावावर 1 हजाराहून अधिक लोकगीते आहेत  त्यात पोवाडा, भारुड, गवळणी, लावणी,कवने,तुंबडी या लोकसाहित्याचा समावेश आहे. त्यांच्या या लोककला या आजही वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात अगदी आवर्जून गायल्या जातात.

प्रसिद्ध लोकसंगीत
फू बाई फू… फुगडी फू
माझी मैना गावाकडे राहिली

लोकगीत मराठी माहिती जाणून घेतल्यानंतर ही माहिती अधिकाधिक लोकांना द्यायला हवी.

Read More From xSEO