Festival

मकर संक्रांतीची माहिती 2022 | Makar Sankranti Information In Marathi

Dipali Naphade  |  Jan 10, 2022
makar sankranti information in marathi

इंग्रजी नव्या वर्षाची सुरुवात झाली की, मराठी सणांनाही सुरुवात होते. सर्वात पहिला सण येतो तो म्हणजे मकर संक्रांत (makar sankranti in marathi). दरवर्षी जानेवारीच्या 14 तारखेला संक्रांत हा सण साजरा करण्यात येतो. पण हा सण 15 जानेवारीलादेखील साजरा करण्यात येतो. पण असं फार क्वचित घडतं. भारतामध्ये विविध ठिकाणी वेगवेगळ्या नावाने हा सण साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये मात्र मकर संक्रांत म्हणूनच हा दिन साजरा होतो. खरं तर मकर संक्रांतीला अध्यात्मिक जितकं महत्त्व आहे, तितकंच शास्त्रीय महत्त्वही आहे. हा दिवस येण्याआधी रात्र मोठी असते तर दिवस लहान असतो. मात्र या दिवसानंतर दिवस आणि रात्र समान होतात. शिवाय संक्रांतीनंतर ऋतूबदल होत थंडी कमी होऊ लागते. पण सर्वात महत्त्व असतं ते या दिवशी तिळाला. तीळ इतके महत्त्वाचे का? असा प्रश्न सर्वांनाच पडतो. पण पूर्वी प्रचंड प्रमाणात थंडी असायची आणि तिळामुळे शरीर उष्ण राहते. त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ खाण्याची पद्धत सुरु झाली. त्यातूनच तिळाचे लाडू आणि विविध पदार्थ बनण्यास सुरुवात झाली. मकर संक्रांत नक्की का साजरी करतात याबद्दल मकर संक्रांतीची माहिती आपण जाणून घेणार आहोत. पण त्याआधी मकर संक्रांत म्हणजे नक्की काय हे जाणून घेऊया. 

मकर संक्रांतीची माहिती | Makar Sankranti Information In Marathi

मकर संक्रांत सगळीकडे साजरी करण्यात येते पण मकर संक्रांतीची माहिती तुम्हाला आहे का? मकर संक्रांत म्हणजे पतंग उडवणे हे सध्याच्या मुलांच्या मकर संक्रांतीची व्याख्या आहे. मकर ही रास असल्याचं सर्वांनाच ज्ञात आहे. या मकर राशीतून सूर्य दुसऱ्या राशीमध्ये दरवर्षी याच दिवशी प्रवेश करत असतो. त्या प्रक्रियेला मकर संक्रांत असं म्हटलं जातं. दुसऱ्या राशीत प्रवेश करणं म्हणजे संक्रमण. त्यामुळे मकर संक्रांत असं म्हटलं जातं. आता हा सण दरवर्षी एकाच दिवशी कसा काय येतो ? असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात कधी ना कधीतरी येतोच. हा एकमेव असा हिंदू सण आहे जो कॅलेंडरवर एकाच दिवशी येतो. त्याचं कारण म्हणजे सूर्याच्या स्थानानुसार हा सण येतो आणि बाकीचे सण हे चंद्राच्या स्थानानुसार येत असल्यामुळे त्याची तारीख बदललेली दिसते. सोलर सायकल ही साधारणतः दर आठ वर्षांनी एकदा बदलते. त्याचवेळी मकर संक्रांत 15 जानेवारी रोजी येते. यापूर्वी 2016 या वर्षात मकर संक्रांत 15 जानेवारीला येऊन गेली आहे. काही ठिकाणी हा सण पतंगांचा सण म्हणून ओळखला जातो मात्र त्यामागे असणारे शास्त्रीय कारण खूपच कमी लोकांना माहीत आहे. सकाळी सकाळी उन्हात उठून पतंग उडवल्याने शरीरामध्ये उष्णता निर्माण होते आणि शिवाय शरीराला व्हिटामिन डीदेखील मिळते त्यामुळे पतंग उडवायची प्रथा पडली. मुंबई, गुजरात अशा राज्यांमध्ये  जास्त प्रमाणात संक्रांत साजरी करण्यात येते. आता याला अगदी मोठा फेस्टिव्हलचा लुक आलेला आहे. 

मकर संक्रांतीला तिळगुळाचं महत्त्व (Importance of Sesame Seeds In Makar Sankranti)

Instagram

मकर संक्रांत आणि तीळगूळ हे समीकरणच आहे. पण तुम्हालाही कधीतरी प्रश्न सुचला असेलच ना? की याच सणाला तीळगूळ का खायचा किंवा गुळाच्या पोळ्या याचवेळी का मिळतात. बाकीच्या वेळी हवं असेल तरी मिळत नाहीत. तर त्यासाठीदेखील एक शास्त्रीय कारण आहे. तीळ हे उष्ण आणि स्निग्ध असतात. तसंच गुळातही उष्णता असते. थंडीमध्ये शरीराला उष्ण आणि स्निग्ध पदार्थांची गरज असल्यामुळे यावेळी तीळगूळ बनतात. शिवाय भूतकाळात झालेल्या कटू आठवणींना विसरून नव्याने त्यामध्ये तीळ आणि गुळाचा गोडवा भरून नात्याला सुरुवात करायची असे म्हटले जाते. म्हणूनच मकर संक्रांतीला ‘तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला’ असंही म्हटलं जातं. त्यामुळे मकर संक्रांत साजरी करताना तिळगुळाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे.  तिळाचं सेवन करणं हे शरीरासाठी आरोग्यदायी असतं. शिवाय तीळ अतिशय पौष्टिक असतात. यामध्ये कॅल्शियमची मात्रा जास्त प्रमाणात असते. शिवाय यामध्ये लोह, सेलेनियम, ब जीवनसत्त्व, मँगनीज आणि इतर तंतुमय पदार्थांची मात्रादेखील असते. तिळामधील असणारे कॅल्शियम आणि झिंक हे शरीराराती हाडांचा ठिसूळपणा रोखण्यासाठी मदत करते. त्यामुळे वयाच्या तिशीनंतर स्त्रियांना तीळ खाण्याचा फायदा होऊ शकतो. शिवाय ज्यांना मासिक पाळीचा त्रास आहे, अशा स्त्रियांनाही तिळातील कॅल्शियममुळे बराच फायदा होतो. संधीवातावर तिळाच्या तेलाने मालिश केल्यास, संधीवाताच्या रूग्णांनाही बराच फरक पडतो. त्यामुळे अशा तिळामध्ये गूळ मिक्स करून तिळाचे लाडू खाल्ल्यामुळे शरीराला आवश्यक सर्व पौष्टिक गोष्टींचा फायदा होतो. 

मकर संक्रांत आणि काळ्या रंगाचं महत्त्व (Importance of Black Colour in Makar Sankrant?)

मकर संक्रांत भारतीय महिलांसाठी फारच आवडीचा सण आहे. एकतर नववर्षाला सुरुवात झाल्यावर येणारा हा पहिलाच सण आहे. त्यात मकर संक्रातीला महिला हळदी-कुंकू समारंभ आयोजित करतात. मकरसंक्रांतपासून रथसप्तमी पर्यंत हळदी-कुंकू समारंभ आयोजित करण्यात येते. हळदी-कुंकूच्या निमित्ताने जवळच्या मैत्रिणी आणि सुवासिनींना घरी वाण देण्या-घेण्यासाठी बोलावता येतं. थोडक्यात महिलांना सेलिब्रेट करण्यासाठी हा सण म्हणजे पर्वणीच असते. पण यावेळी नक्की काळा रंग का परिधान करायचा याची माहिती सर्वांनाच नसते. तसंच मकर संक्रांतीची माहिती सर्वांना असतेच असं नाही. त्याचं शास्त्रीय कारण आहे. सणासुदीला काळा रंग खरंतर वर्ज्य आहे. मात्र मकर संक्रात हिवाळ्यामध्ये येते. हिवाळ्यात ऊबदार कपडे घातले जातात. काळा रंग उष्णता शोषून घेतो. म्हणून संक्रातीला काळे कपडे परिधान केले जातात. शिवाय मकर संक्रातीला घालण्यात येणारे हलव्याचे दागिने काळ्या रंगावर उठून दिसतात. त्यामुळे हलव्याचे दागिनेदेखील यावेळी घालण्यात येतात. 

हलव्याचे विविध पारंपरिक दागिने (Traditional Halwa Ornaments)

काळ्या कपड्यांवर हलव्याचे दागिने शोभून दिसतात म्हणून खरं तर हे दागिने संक्रांतीच्या सणाला साडीसह परिधान  केले जातात. तसंच नव्या नवरीचे अथवा लहान मुलाचे बोरन्हाण असेल तर हे खास दागिने बनवून घेण्यात येतात. घरात आलेल्या नव्या सुनेचं, जावयाचं आणि लहान बाळाचं हलव्याचे दागिने घालून कोडकौतुक करण्यात येतं. पहिल्या संक्रांतीला विवाहित जोडप्याला जन्मभर त्यांच्या संसारातील गोडवा वाढावा यासाठी हलव्याचे दागिने घालून हा सण साजरा करण्याची पद्धत आहे. या दागिन्यांमध्ये लहान मुलांपासून ते नवविवाहित जोडप्यांपर्यंत सर्वच खूप सुंदर दिसतात. 

लहान मुलांसाठी हलव्याचे दागिने

लहान मुलांचंही बोरन्हाण याचवेळी करण्यात येतं. साधारण तीन ते चार वर्षांपर्यंत बोरन्हाण करण्याची पद्धत आहे. त्यासाठी हलव्याच्या दागिन्यांची वाडी तयार करण्यात येते. 

नव्या नवरीसाठी हलव्याचे दागिने

पहिल्या संक्रांतीला नव्या नवरीला हलव्याच्या दागिन्यांची सजवण्यात येतं. त्यासाठी तुम्ही अशा प्रकारचे हलव्याचे दागिने घेऊ शकता.

हलव्याच्या दागिन्यांचा सेट

विविध प्रकारचे हलव्याचे दागिने बनवण्यात येतात. तुम्ही नव्या नवरीसाठी वेगवेगळे सेटही तयार करून घेऊ शकता. अगदी नेकलेसपासून बांगड्यांपर्यंत सर्व काही तयार करून मिळते.

हलव्याच्या दागिन्यांची व्हरायटी

हलव्याच्या दागिन्यांमध्ये अनेक व्हरायटी तुम्हाला पाहायला मिळते. तसंच तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे बनवून घ्यायचे असतील तर तुम्ही त्याप्रमाणे सांगून करून घेऊ शकता.

हलव्याच्या दागिन्यांचे डिझाईन्स

हल्ली प्रत्येक गोष्ट आधुनिक आणि पारंपरिकता याचा मेळ घातलेली हवी असते. तुमच्या आवडीप्रमाणे हलव्यांच्या दागिन्यांच्या डिझाईन्समध्येही विविधता पाहायला मिळते.

तिळाचे लाडू रेसिपी मराठी (Tilache Ladoo Recipe in marathi)

तिळाचे लाडू प्रत्येकाच्या घरी करण्यात येतात. पाहूया नक्की काय आहे याची रेसिपी – 

साहित्य (Material) 

कृती (Recipe)

सर्वप्रथम तीळ भाजून घेणे त्यानंतर किसलेले सुकं खोबरं भाजून घेणे. पाक करण्यासाठी गूळ बारीक कापून घेणे. त्यानंतर पाक करताना गुळात थोडं पाणी अंदाजाने घालणे (गूळ भिजेपर्यंत) आणि पाक करून घेणे. पाक करताना त्यामध्ये १ चमचा तूप घालणे. तुमचा पाक तयार झाल्यावर त्यामध्ये वरील भाजलेले तीळ, कूट आणि खोबरं मिक्स करून घेणे. गरम असतानाच त्याचे लाडू बनवणे. हवा असल्यास, यामध्ये सुका मेवा घालणे.

मकर संक्रांतीचे 5 खास पदार्थ (Special Dish for Makar Sankranti)

मकर संक्रांतीला विविध ठिकाणी विविध पदार्थ बनवण्यात येतात. या पदार्थांची काय आहे खासियत आपण जाणून घेऊया. हे पदार्थ सगळ्यांनाच आवडतात. मकर संक्रांतीच्या वेळी थंडी असते त्यामुळे त्याप्रमाणे याची रेसिपी आहे. 

खिचडी (Khichdi)

मकरसंक्रांतीच्या सणाला खिचडीला फार महत्त्व आहे. बटाटा, मटार, फ्लॉवर, गाजर आणि कोवळे हरभऱ्याचे दाणे  यांसारख्या या मौसमात बाजारात येणाऱ्या भाज्या घालून ही खिचडी बनवण्यात येते. देवाला या खिचडीचा नैवेद्य दाखवण्यात येतो. अनेक मंदिरांमध्ये या निमित्ताने प्रसाद म्हणून भंडाऱ्यामध्ये खिचडी केली जाते. ज्याची चव अप्रतिम असते.   

गुळपोळी (Gulpoli)

खास गुळपोळीचा आस्वाद घेण्यासाठी मकरसंक्रांतीच्या सणाला महाराष्ट्राला अनेक भारतीय भेट देत असतात. गूळ, तीळ, खसखस आणि बेसन यांचं मिश्रण गहू आणि मैद्याच्या कणकेने पोळी बनवली जाते. गरमागरम गुळपोळी आणि त्यावर छान तुपाची धार असा खास बेत मकरसंक्रातीला असतो.

उंधियो (Undhiyo)

हिवाळा म्हटल्यावर बेत नक्की होतो तो म्हणजे उंधियो करण्याचा. उंधियो ही खासियत आहे गुजरातच्या खाद्यपरंपरेतली. मकरसंक्रांतीच्या निमित्ताने गुजरातमध्ये या मौसमात उपलब्ध असलेल्या भरपूर भाज्या वापरून उंधियो बनवला जातो. उंधियोची चव अजून छान लागावी म्हणून हा खास माती्च्या मडक्यात बनवला जातो. ही भाजी खास गरमागरम पुऱ्या किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर वाढली जाते. जर तुम्ही संक्रांतीला गुजरातला भेट देणार असाल तर उंधियो चाखायला विसरू नका.

घेवर (Ghevar)

घेवर हा गोड पदार्थ राजस्थानची खासियत आहे. घेवर हा पदार्थ तीन प्रकारात उपलब्ध आहे, साधा घेवर, मावा घेवर आणि मलाई घेवर. हा पदार्थ बनवताना गव्हाच्या पीठाचं आणि दूधाचं मिश्रण करून त्याला तूपाच्या फोडणीत शिजवलं जातं. त्यानंतर घेवर साखरेच्या पाकात बूडवून सुका मेव्याने सजवून सर्व्ह केलं जातं.

उसाच्या रसाची खीर (Sugarcane Juice Kheer)

लोहडीशिवाय पंजाबमधील कोणताही सण अपूर्ण आहे. पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणावर ऊसाची शेती होते. याच ऊस आणि भाताची खीर मकरसंक्रांतीला त्यामध्ये सुकामेवा घालून बनवली जाते. हल्ली हा प्रकार महाराष्ट्रातही करण्यात येतो. याची चव अप्रतिम असल्याने आणि हिवाळ्यात मकरसंक्रांत येत असल्याने हा पदार्थ खाण्याची मजाच वेगळी आहे. 

मकरसंक्रांतीसाठी काही झटपट रेसिपीज (Instant Recipies for Makar Sankranti)

आपण नेहमीच वेगळ्या रेसिपी करून पाहात असतो. महाराष्ट्रीयन पदार्थ तर आपण करतोच. पण मकरसंक्रांतीला तुम्ही असे काही वेगळे पदार्थ करून तुमची संक्रांत अधिक चवदार बनवू शकता. त्यासाठी जाणून घेऊया रेसिपी – 

दही चुरा किंवा दही चूडा (Dahi Chura)

जर तुम्हाला तिळाचे लाडू किंवा गूळपोळी बनवण्यासाठी वेळ मिळाला नसेल तर हरकत नाही. या मकरसंक्रांतीला करून पाहा झटपट आणि पौष्टीक दही चुरा.

साहित्य :

कृती : 

चाळणीमध्ये पोहे घेऊन ते वाहत्या पाण्याखाली चांगले धूवून घ्या. त्यानंतर पाणी निथळून घ्या. आता या पोह्यांमध्ये 2 चमचे दूध मिक्स करा. पोहे 15-20 मिनट दुधात भिजू द्या. हा पदार्थ बनवण्यासाठी शक्यतो पातळ पोह्यांचा वापर केला जातो. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही जाडे पोहेही वापरू शकता.(जाडे पोहे घेतल्यास ते दुधात किमान अर्धा तास भिजू द्या). पोह्यांमध्ये दही, गूळ किंवा मध चांगला मिक्स करून घ्या. आता चिवडा म्हणजेच पोहे आणि ताजी फळ एकत्र सर्व्ह करा.

सर्व्ह करताना :

काचेच्या ग्लासात आधी ताजी फळ आणि त्यावर दही मिक्स केलेले पोहे आणि आवडीनुसार ब्राऊन शूगर घाला, मग परत ताजी फळ आणि पोह्यांचा लेयर करा. नंतर ताज्या फळांनी सजावट करा. तुम्हाला आवडत असल्यास मेपल सिरप आणि मधसुद्धा यावर घालू शकता.

मकर चौला (Makar Chaula)

ओरिसामध्ये मकरसंक्रांतीच्या निमित्ताने मकर चौला हा पदार्थ घरोघरी करण्यात येतो.

साहित्य : 

कृती

तांदूळ रात्रभर भिजवून ठेवा. त्यानंतर तांदूळातील पाणी निथळून ठेवा. एका डिशमध्ये पसरून तो सूकू द्या. रात्रभर भिजवलेला भात सुकण्यास साधारण 2-3 तास लागतात. भात सुकल्यावर मिक्सरमधून बारीक रवाळ वाटून घ्या. त्यानंतर भातात केळ्याशिवाय इतर सर्व साहित्य मिक्स करा. सर्वात शेवटी केळं सोलून आणि कुस्करून त्या मिश्रणात घाला आणि डाळिंब्याच्या दाण्यांनी सजावट करा.  

रामदाना लाडू (Ramdana Laddu)

Instagram

रामदाना म्हणजेच राजगिऱ्याचा लाडू बिहारमध्ये फारच पवित्र मानला जातो. राजगिऱ्याचा वापर उपावासाच्या पदार्थांमध्येही केला जातो. पाहूया या लाडूची रेसिपी

साहित्य : 

कृती : 

रामदाणे म्हणजेच राजगिरा धुवा आणि सुकवून घ्या.नंतर जाड बुडाच्या कढई घेऊन मोठ्या आचेवर तापवा. कढई गरम झाल्यावर राजगिरा घालून तो फूलू द्या. कढई चांगली गरम झाली असेल तरच राजगिरा फुलेल. जर कढई जास्त तापल्यासारखी वाटल्यास गॅस बारीक करावा. अशाप्रकारे राजगिरा भाजून घ्या. जो राजगिरा फुलला नसेल तो चाळणीने चाळून घ्या. आता एका तव्यात एक चमचा तूप, 2 चमचे पाण्यात गूळ तोडून घाला. तो चांगला शिजू द्या, मधेमधे पळीने हलवत राहा. जेव्हा दोन तारेचा पाक तयार होईल तेव्हा त्यात राजगिरा घाला. चांगलं मिक्स करून घ्या आणि गरम असतानाच लाडू वळायला घ्या. दोन्ही तळहातांना थोडं पाणी लावून मग लाडू वळा. हे लाडू हवाबंद डब्यात ठेवल्यास भरपूर दिवस चांगले राहतात.

मग या गुलाबी थंडीत नक्की करून पाहा हे वेगळे आणि पौष्टीक पदार्थ. सर्वांना मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगूळ घ्या आणि गोडगोड बोला. 

Read More From Festival