मनोरंजन

सेलिब्रेटीज स्पेशल दिवाळीच्या आठवणी

Trupti Paradkar  |  Oct 24, 2019
सेलिब्रेटीज स्पेशल दिवाळीच्या आठवणी

लहानपण देगा देवा असं म्हटलं जातं. कारण लहानपणीच्या आठवणी नेहमीच खास असतात. त्यात लहानपणीच्या दिवाळीच्या आठवणी तर प्रत्येकासाठी स्पेशल असतात. या काळात अगदी लहानांपासून थोरांपर्यंतसदिवाळीला काय काय करायचं याचे प्लॅन फार आधीपासूनच ठरतात. आपल्याप्रमाणेच कलाकारांच्या आयुष्यातील दिवाळी कशी असते हे जाणून घेण्यासाठी चाहते नक्कीच उत्सुक असतात. तुमच्या आवडत्या कलाकारांनी शेअर केल्या त्यांच्या बालपणीच्या दिवाळीच्या आठवणी. तुम्हा सगळ्यांनाही दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा (diwali wishes in marathi).

तेजश्री प्रधान

माझ्याप्रमाणेच माझ्यासोबत काम करणाऱ्या प्रत्येक कलाकार, तंत्रज्ञ व सेटवरचे लहान-मोठे कामगार या प्रत्येकाची ‘आपल्या घरची’ दिवाळी असते. मालिकांतून भूमिका करणारे आम्ही सगळे दररोज बारा-चौदा तास एकत्र असतो, त्यातून नवे भावबंध जुळतात, नाती तयार होतात, एक नवे घर वा कुटुंब आकाराला येते असे म्हटले तरी चालेल, अशा कुटुंबाची मग सेटवर दिवाळी साजरी करतो. हा एक नवा अनुभव असतो. यावर्षी ‘अगंबाई सासूबाई’ या मालिकेच्या बाबतीत असेच होईल. यंदा चित्रीकरणातून थोडा वेळ काढून मी माझ्या घरी जाऊन माझ्या आईबाबांसोबत देखील हा सण साजरा करेन.

Instagram

तेजस बर्वे

यंदाची दिवाळी माझ्यासाठी खूप खास आहे कारण मी मिसेस मुख्यमंत्री या मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय आणि याच मालिकेच्या चित्रीकरणात व्यस्त असल्यामुळे आम्हाला 3 दिवसांची सुट्टी मिळणार आहे. मी सध्या या दिवसात मी कशी दिवाळी साजरी करणार आहे याचं प्लॅनिंग करतो आहे. मालिकेच्या निमित्ताने घरापासून दूर असल्यामुळे मला खरेदीसाठी जास्त वेळ मिळणार नाही आहे, त्यामुळे माझे कुटुंबीयच मला यावेळी सरप्राईज देणार आहेत आणि यासाठी मी खूप उत्सुक आहे. दिवाळी म्हंटल कि खाण्याची चंगळ असते. मला फराळातील सर्व गोडाचे पदार्थ आवडतात, त्यातल्या त्यात मला बेसनाचे लाडू खूपच आवडतात. माझी आई बेसनाचे लाडू उत्तम बनवते त्यामुळे मी त्यावर ताव मारणार आहे. लहानपणी फटाक्यांची भीती वाटत असल्यामुळे आणि मोठं झाल्यावर फटाक्यांमुळे पर्यावरणावर काय दुष्परिणाम होतात हे कळायला लागल्यामुळे मी कधी फारसे फटाके फोडलेच नाहीत.

Instagram

हार्दिक जोशी

यंदा कोल्हापूरमध्ये सतत पाऊस असल्यामुळे तुझ्यात जीव रंगला या मालिकेत शूटिंग आम्ही पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र चित्रीकरण करत आहोत. यावेळी दिवाळीची 3 दिवस सुट्टी मिळणार आहे तेव्हा मी माझ्या घरी माझ्या परिवारासोबत हा सण साजरा करणार आहे. मी आईला घरी साफसफाईसाठी, फराळात चकल्या आणि शंकरपाळ्या करायला मदत करायचो पण गेली 3 वर्ष मालिकेमुळे मी दिवाळीच्या पहिल्याच दिवशी घरी जातो त्यामुळे ही मदत फारशी आता करता येत नाही. माझ्या मते आपले सण जपण्याची जबाबदारी आपल्यावरच आहे. घरी मी दिवाळी ही पारंपरिक पद्धतीने साजरी करतो. पहिल्या दिवशी सकाळी लवकर उठून उटणं लावून अंघोळ करणं, कारेट फोडण, मित्रपरिवाराला भेटणं त्यांच्या सोबत फराळाचा आस्वाद घेणं आशा प्रकारे मी दिवाळी साजरी करतो आणि आपण हा सण असाच पारंपरिक पद्धतीने साजरा केला पाहिजे जेणेकरुन पुढील पिढीमध्ये देखील हा सण सुट्टी म्हणून नाही तर एक सण म्हणून जीवंत राहील. तसंच फटाके फोडताना प्राण्यांची काळजी घ्या कारण फटाक्यांच्या आवाजाचा त्रास आपल्यापेक्षा 3 पटीने जास्त त्यांना होतो त्यामुळे माणुसकी जपून सण साजरा करा, एकत्र येऊन आनंदानं सण साजरा करा.

Instagram

निखिल दामले

आम्हा कलाकारांच्या दिवाळीची सुरुवात सुट्टी मागण्यापासून होते. यंदा मला सुट्टी मिळाली आहे. त्यामुळे मी पुण्याला माझ्या घरी जाणार आहे. दिवाळी हा माझा सर्वात आवडता सण आहे. नेहमी भेटू न शकणारी आप्तेष्ट मंडळी या निमित्ताने भेटतात. एखाद्या विशिष्ट वर्षातील दिवाळीची आठवण सांगणं कठीण आहे, कारण प्रत्येक दिवाळी माझ्यासाठी स्पेशलच असते. फराळाच्या बाबतीत म्हणाल, तर चकल्या पाडायला मला थोडं फार जमतं, पण इतर पदार्थांवर ताव मारणे, हेच मुख्य काम असतं. माझ्यासाठी दिवाळीचा आनंद हा सगळ्या मंडळींच्या गाठीभेटी आणि फराळ यावरच अवलंबून असतो. फटाके फोडणं मला अजिबातच आवडत नाही. फटाक्यांमुळे होणारं प्रदूषण, वयस्कर मंडळी, लहान मुलं आणि अगदी इतर सर्वांना सुद्धा धुरामुळे होणारा त्रास या कारणांमुळे मी फटाक्यांच्या विरोधात आहे. मी कधीही फटाके फोडले नाहीत व इतरांनी सुद्धा कमीत कमी फटाके फोडावेत असं मला वाटतं. 

Instagram

अभिजित श्वेतचंद्र

दिवसरात्र ‘साजणा’ मालिकेचे शूट सुरू आहे.  या व्यस्त कार्यक्रमातून दिवाळीच्या निमित्ताने 4 दिवसांची सुट्टी मिळणार आहे. दिवाळीचे खूप प्लॅन्स केले आहेत. ते पूर्ण करायला मिळणार असल्याने, यंदा सुद्धा दिवाळीची खूप उत्सुकता आहे. दिवाळीच्या निमित्ताने मी दरवर्षी वृद्धाश्रमात जातो. यंदादेखील तिथे नक्कीच जाईन. यंदाची दिवाळी स्पेशल असण्याचं आणखी एक कारण म्हणजे, ‘साजणा’च्या सेटवर, ‘झी युवा’च्या कुटुंबासोबत आणि नंतर घरी, अशी तीनवेळा दिवाळी साजरी करण्याची संधी मला मिळाली आहे. घरच्यांसोबत दिवाळी साजरी करणार असल्याने, 2-3 दिवस डाएट बाजूला ठेऊन, भरपूर फराळ करणार आहे. अर्थात, फक्त फराळावर ताव मारणे एवढंच काम नसतं. मला फराळातील अनेक पदार्थ करता येतात. लहानपणी आईला बऱ्याचवेळा मदत करायचो, पण आता शूटिंगमुळे ते शक्य होत नाही. तरीदेखील जमेल तशी आणि जमेल तेवढी मदत मी करतो. फटाके फोडून दिवाळी साजरी करायला अनेकांना आवडते. पण, त्यामुळे होणारे दुष्परिणाम, इतरांना होणारा त्रास, अपघात या सगळ्या गोष्टींचा विचार करून फटाक्यांचा वापर करावा असं मला वाटतं. फटाके न फोडता, इतर सर्व गोष्टी आनंद घेऊन दिवाळी साजरी करणं शक्य असल्यास, सर्वांनी याचा विचार करायला हवा. उत्तमरीत्या आणि आनंदात दिवाळी साजरी करण्यासाठी, माझ्याकडून व ‘झी युवा’च्या संपूर्ण टीमकडून तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा…!! 

Instagram

तितिक्षा तावडे

मला चकली आवडते. दिवाळीचा सण म्हणजे कंदील, चहुबाजूला प्रकाश, पणत्या, रांगोळी सगळीकडे प्रसन्न वातावरण असते. या सगळ्यांमध्ये सगळ्यांचीच आवडती गोष्ट म्हणजे फराळ. फराळामध्ये मला चकली खूपच आवडते. मला लहानपणापासून दिवाळीचा पहिला दिवस खूपच आवडतो. सर्वजण एकत्र येऊन फराळ करतात, फटाके उडवतात, नवीन कपडे, गप्पा-गोष्टी करतात, हे सगळंच मला खूप आवडतं. पण, आता विचाराल तर मला दिवाळीचा आदला दिवस खूप आवडतो, त्याचं कारण असं की, खूप खरेदी करायला मिळते घरच्यांसाठी, स्वत:साठी. घराची साफ-सफाई हे सगळं एक दिवस आधी होते, त्यामुळे मला आदला दिवस आता जास्त आवडतो.

Instagram

प्राजक्ता गायकवाड

मी दिवाळी या सणाची खूप आतुरतेने वाट पाहते. स्वाराज्यरक्षक संभाजी मालिकेच्या चित्रीकरणात मी खूपच व्यग्र आहे त्यामुळे अजूनतरी मी या सणाची काहीच तयारी करू शकली नाहीये. दिवाळीचे 2 दिवस आम्हाला शूटिंगमधून सुट्टी मिळेल त्यावेळी मी माझ्या कुटुंबियांसोबत हा सण साजरा करणार आहे. मी खूप शॉपिंग करणार आहे. दिवाळी म्हंटल कि फराळ आला. यावेळी मी कारंजी आणि चकलीवर ताव मारणार आहे. चकली हा माझा आवडता पदार्थ आहे. दिवाळी आणि फटाके फोडणे हे समीकरणच आहे पण सध्याची पर्यावरणाची अवस्था बघता फटाके फोडू नका अशीच विनंती मी माझ्या चाहत्यांना करेन. तसंच या दिवाळीला गरजू लोकांमध्ये आनंद पसरवायचा प्रयत्न करूया आणि हि दिवाळी सगळ्यांसाठी आनंददायी बनवूया.

Instagram

हे ही वाचा –

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

अधिक वाचा –

Vaastu Tips: दिवाळीच्या दिवशी काय करावं आणि काय करू नये

यंदाच्या #Diwali ला बनवा खास,शेअर करा दिवाळीच्या शुभेच्छा

DIY: दिवाळीला स्वतःच्या हाताने घर सजवण्यासाठी सोप्या टीप्स

Read More From मनोरंजन