Festival

मराठीतील लय भारी…. होळीचे गाणे – Marathi Holi Songs List

Aaditi Datar  |  Feb 24, 2020
holi songs in marathi

होळी असो रंगपंचमी असो वा धुळवड सगळीकडे असते ती रंगांची उधळण. संपूर्ण महाराष्ट्रात होळीचा सण अगदी उत्साहाने साजरा केला जातो. या सणाच्या निमित्ताने होळीची गाणे दाखवा किंवा लावण्याची मागणी जोरदार असते. मग मराठी चित्रपट तरी याला अपवाद कसे असतील. त्यामुळेच मराठी चित्रपटातही एक से एक होळीची, रंगपंचमीची आणि अगदी शिमग्यावरचीही गाणी आहेत. #POPxoMarathi तुमच्यासाठी घेऊन आलं आहे खास होळीचे गाणे म्हणजेच प्रसिद्ध आणि जुनी होळीची गाणी (Marathi Holi Songs List). मग होळीच्या शुभेच्छा आणि रंगपंचमीच्या शुभेच्छा लुटताना गाण्यांचाही आस्वाद नक्की घ्या.

आला होळीचा सण लई भारी (लय भारी)

लय लय भारी… होळीचे गाणे किंवा रंगपंचमीचे गाणे म्हटल्यावर पहिल्यांदा तोंडात येतं ते हे गाणं. लय भारी या गाजलेल्या चित्रपटातलं गाणंसुद्धा हिट झालं होतं. या गाण्यातील अभिनेता रितेश देशमुख, अभिनेत्री राधिका आपटे आणि गेस्ट अपिअरन्समधील जेनेलियामुळे हे गाणं खूप गाजलं. आता दरवर्षी रंगपंचमीचे गाणे म्हणून हे आवर्जून लावले जाते. या गाण्याला संगीत दिलं आहे प्रसिद्ध संगीतकार जोडी अजय-अतुल यांनी. तसंच हे गाणं गायलं आहे स्वप्नील बांदोडकर आणि योगिता गोडबोले यांनी. होळीच्या शुभेच्छा म्हटल्यावर आपोआपच हे गाणं तोंडावर आल्याशिवाय राहत नाही. 

सख्या चला बागामंदी रंग खेळू चला (सामना)

होळीच्या जुन्या गाण्यांमध्ये हे गाणं आजही प्रसिद्ध आहे. सामना चित्रपटातील हे गाणं उषा मंगेशकर यांनी गायलं आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन जब्बार पटेल यांनी केलं असून या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकार होते. ज्यामध्ये विजय तेंडुलकर, मोहन आगाशे, निळू फुले, श्रीराम लागू, स्मिता पाटील आणि विलास रकाटे यांचा समावेश आहे.

अगं नाच नाच राधे उडवू या रंग (गोंधळात गोंधळ)

‘गोंधळात गोंधळ’ चित्रपटातलं हे प्रसिद्ध होळीचे गाणे आहे. हे प्रसिद्ध गाणं गायलं आहे गायक सुरेश वाडकर यांनी. गाण्याला संगीत दिलं आहे विश्वनाथ मोरे यांनी. या चित्रपटात रविंद्र महाजनी, रंजना देशमुक आणि अशोक सराफ हे कलाकार होते. तर या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं व्ही के नाईक यांनी.

आज गोकुळात रंग खेळतो हरी, ‘राधिके जरा जपून जा तुझ्या घरी’

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायलेलं हे रंगपंचमीचे गाणे आहे. जे श्रीकृष्ण आणि राधाच्या गोकुळातील कृष्ण लीलांवरील आहे. हे गाणं फारचं सुंदर असून ते अगदी बालकृष्णांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारं असं आहे.

वाचा – Holi Special : यंदा करून पाहा ‘या’ फ्युजन रेसिपीज

खेळताना रंग बाई होळीचा होळीचा

ही लावणी सुरू होताच होळी-रंगपंचमीचा मूड बनतोच बनतो. गायिका उत्तरा केळकर यांनी ही लावणी अगदी बहारदार गायली आहे. तर या गाण्याला संगीत दिलं आहे अशोक वायंगणकर आणि मधू रेडकर यांनी.

आली रे आली पंचिम आली (सुशीला)

ब्लॅक अँड व्हाईट एरामधलं हे आजच्या पिढीला फारसं परिचित नसलेलं होळीचे गाणे आहे. पण या गाण्यातील जोडी आहे अशोक सराफ आणि रंजना. हे गाणं आहे सुशिला या मराठी चित्रपटातलं. या चित्रपटाचे दिग्दर्शक होते अनंत माने आणि या गाण्याला संगीत दिलं होतं राम कदम यांनी.

मन धागा धागा (दगडी चाळ)

हे पूर्णतः रंगपंचमीचे गाणे नसले तरी या गाण्याची सुरूवात होते ती रंगपंचमीनेच. दगडी चाळ चित्रपटातलं हे गाणं फारच गाजलं. रंगपंचमीच्या दिवशी सुरू होणारी यातली नायक नायिकेची कथा पुढे कशी बहरत जाते ते या गाण्यात दाखवलं आहे. हे गाणं अंकुश चौधरी आणि पूजा सावंत यांच्यावर चित्रित करण्यात आलं आहे.

वाचा – होळीच्या दिवशी धमाल करण्यासाठी बॉलीवूडची टॉप 16 होळीची गाणी

चला होळीचा खेळाला रंग (चष्मेबहाद्दर)

‘चष्मेबहाद्दर’ चित्रपटातलं हे गाणं अगदी धमाल होळीचे गाणे आहे. या चित्रपटात संजय नार्वेकर, पूर्णिमा अहिरे, पूजा अजिंक्य, किशोरी अंबिये, अविनाश बब्बर, गणेश भागवत, जयवंत भालेराव, नरेश बिडकर, विजय चव्हाण, अवतार गिल, रसिका जोशी, जॉनी लिव्हर, दिपाली सय्यद, दिपक शिर्के, साहिल शिरवळकर आणि राजपाल यादव अशी मल्टीस्टार कास्ट होती. या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं होतं विजय पाटकर यांनी. तर हे गाणं श्रीरंग गोडबोले यांनी लिहीलं असून संगीत आहे जितेंद्र कुलकर्णी आणि बाळ नाईक यांचं.

होळी आली (कळतंय पण वळत नाही)

लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या कळतंय पण वळत नाही चित्रपटातलं हे गाणं आहे. या चित्रपटात त्यांच्यासोबत पूर्णिमा पाटणेकर, निळू फुले आणि संजीवनी राठोड होत्या. या गाण्याला संगीत दिलं आहे बाळ पळसुळे यांनी. तर दिग्दर्शन केलं आहे दत्तार्ण तावडे यांनी.

गोड व्हाया लागलं

या प्रेमगीताच्या शेवटी येतो तो गोड रंगपंचमीचा सिक्वेन्स. ज्यामध्ये या जोडप्याचं प्रेम गोड होतं. हे गाणं चित्रपटातलं नसून म्युझिक अल्बममधलं आहे. गायक वैभव लोंढे असून संगीत दिलं आहे सुनील वाहुळ यांनी.

आला होळीचा रे सण (सख्खा सावत्र)

होळीची गाणी म्हटल्यावर हे गाणंही लक्षात येतं. मल्टीस्टारर सख्खा सावत्र या चित्रपटातलं हे गाणं आहे. या चित्रपटात मकरंद अनासपुरे, क्रांती रेडकर, प्रिया अरूण, विजय चव्हाण, नूतन जयंत आणि भारत गणेशपुरे हे कलाकार होते. या चित्रपटाचं दिग्दर्शन राजेश पाटोळे यांनी केलं असून या गाण्याला संगीत दिलं आहे राम साळवे यांनी. हे गाणे पाहा.

होळी रे होळी (लई झक्कास)

होळी रे होळी पुरणाची पोळी… होळी म्हटलं की, होळी स्पेशल पदार्थांची आठवण होतेच. तसं आहे हे लई झक्कास या चित्रपटातलं गाणं. जे गायलं आहे सचिन पिळगांवकर आणि साधना सरगम यांनी. या गाण्याला संगीत दिलं आहे संजयराज गौरीनंदन यांनी.

चांद रातीला आला शिमगा (शिमगा)

होळीची गाणी आणि रंगपंचमीचे गाणे अनेक असतील पण हे गाणं आहे शिमग्याचं. या चित्रपटाचं नावंच शिमगा आहे. या चित्रपटात भूषण प्रधान मुख्य भूमिकेत असून गाण्याचं चित्रीकरणही त्याच्यावर करण्यात आलं आहे.

होळी होळी (कँपस कट्टा)

कँपस कट्टा या चित्रपटातलं हे गाणं गायलं आहे नेहा राजपाल, आनंद जोशी आणि आदर्श शिंदे यांनी. संजीव कोलते यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शक केलं होतं.

होळीचा डंका (विजय असो)

चिन्मय मांडलेकर, नम्रता गायकवाड, गणेश यादव, अमिता खोपकर, केदार शिंदे, जनार्दन परब, प्रियदर्शन जाधव, रोहन गुजर, मंगेश कवाडे आणि विष्णू कोकाणे अशी स्टारकास्ट असलेल्या विजय असो चित्रपटातलं हे धमाल होळीचे गाणे आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं राहुल जाधव यांनी. मग यंदा बॉलीवूडऐवजी मराठीतली होळीचे गाणे लावून साजरी करा होळी, रंगपंचमी आणि धुळवड.

POPxoMarathi कडून होळीच्या खूप खूप शुभेच्छा.

Read More From Festival