आरोग्य

स्त्रियांमधील कर्करोग समज-गैरसमज

Dipali Naphade  |  Dec 20, 2021
misconceptions-about-cancer-in-women

प्रत्येक व्यक्तीच्या मनात कर्करोग या आजाराबद्दल भिती असते. कुठला तरी मित्र, नातेवाईक, शेजारी यापैकी कुणाला तरी कर्करोग झाला आणि त्या व्यक्तीला खूप सोसावे लागले. त्याचे खूप हाल झाले अशाप्रकारचे पूर्वग्रह खूप जणांच्या मनात असतात. कर्करोगाबद्दल अनेक समज-गैरसमज आणि त्याबद्दल प्रचंड भीतीही खूप जणांच्या मनात दिसून येत आहे.  विशेषतः स्त्रियांच्या मनात ही भिती खूपच जास्त प्रमाणात दिसून येते. मला काही तरी असेल. या भीतीपोटीच स्त्रिया चाचणी करायला जात नाहीत, असे अनेकदा दिसून आले आहे. परंतु, जेव्हा निदान होते तेव्हा खूप उशीर झालेला असतो.  कर्करोग म्हणजे पेशींची अनियंत्रित वाढ शरीराच्या कुठल्या तरी भागात या पेशी अनियंत्रितपणे वाढायला लागतात. आणि हळुहळु ही वाढ शरीरभर पसरायला लागते. कर्करोगाचे निदान जर लवकर केले गेले तर बहुतेकदा कर्करोगावर पूर्णपणे मात करता येते. याबाबत अधिक माहिती दिली आहे डॉ. मीता नखरे, प्रसूतीशास्त्र व स्त्रीरोग तज्ज्ञ, लोकमान्य रूग्णालय, पुणे यांनी. 

रोगाचा प्रतिबंध हाच खरा त्यावरील उपाय

रोगाचा प्रतिबंध हाच खरा त्यावरील उपाय आहे. वेळीच निदान हे कर्करोगावरील गुरुकिल्ली आहे. हे वाक्य कर्करोगाच्या बाबतीत शंभर टक्के खरे आहे. यासाठी अगदी सोपा उपाय म्हणजे कर्करोग निदान चाचणी करून घेणं. कर्करोग कर्करोगावरील शस्त्रक्रिया, केमोथेरपी किंवा स्क्रिनिंग याबाबत इतके गैरसमज आणि पूर्वग्रह तसेच भीती आहे की, कर्करोग हा शब्द निघालाच की त्याबाबत माहिती घेण्यास ते घाबरून नकार देतात. खरे तर नियमितपणे स्क्रिनिंग करून घेतल्यावर कर्करोग असल्याचं निदान झाल्यास त्यावर लगेचच उपचार करता येतात. वेळीच निदान व उपचार झाल्यास कर्करूग्ण बरा होऊ शकतो. याशिवाय कर्करोगावरची शस्त्रक्रिया किंवा केमोथेरपी आता पूर्वीइतकी त्रासदायक राहिलेली नाही. या सर्व गोष्टींबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती होऊन लोकांच्या मनातली भिती आणि गैरसमज दूर करणे गरजेचं आहे. 

सर्वाधिक आढळतो स्तनाचा कर्करोग 

महिलांमध्ये सर्वांधिक आढळून येणारे कर्करोग म्हणजे स्तनाचा कर्करोग हा आहे. या व्यतिरिक्त गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग, पोटाचा, आतड्यांचा, गर्भाशय पिशवीचा कर्करोग, बीजकोषाचा कर्करोग व फुफ्फुसाचा कर्करोग आढळून येतो. कर्करोग झाला आहे, त्यातही महिलेला कर्करोग झाला आहे, हे वास्तव स्विकारण्याची तयारी आजही अनेक कुटुंबांमध्ये नाही. पोटाच्या, गर्भाशयाच्या संबंधित असलेल्या कर्करोगाची थेट लक्षणं दिसून येत नाही. त्यामुळे पहिल्या टप्प्यात निदान होऊन उपचार सुरू करण्यात विलंब लागतो. वेळीच निदान व उपचार न झाल्यास जीवावरही बेतू शकतं. 

वाढते वजन, संप्रेरकामध्ये बदल, पाळी लवकर येऊन रजोनिवृत्ती उशिरा होणाऱ्या महिलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण तुलनेने अधिक असते. जनुकीय वा अनुवांशिक कारणांमुळे होणारा कर्करोग हा पाच टक्क्यांहून कमी व्यक्तींमध्ये होतो. पोटाच्या, गर्भाशयाचा जो कर्करोग होतो त्याची लक्षणे पहिल्या टप्प्यांत समजून येत नाही. आजार उशीर कळल्यान तोवर खूप उशीर झालेला असतो. त्यामुळे वेळीच उपचार न मिळाल्यामुळे दगावलेल्या महिलांचे प्रमाण साहजिकच वाढते आहे. 

महिलांमध्ये कर्करोगाचे वाढते प्रमाण याला बदलती आणि चुकीची जीवनशैली हे मुख्य कारण आहे. दारू व सिगारेटचं सेवन करणाऱ्या महिलांमध्ये फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका अधिक संभवतो. म्हणूनच महिलांमधील कर्करोगाचे प्रमाण जरी वाढत असले तरी नियमित चाचण्या करून आपण कर्करोगाचे निदान लवकर करू शकतो. जेणेकरून भविष्यातील गुंतागुंत टाळता येऊ शकते. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From आरोग्य