बॉलीवूड

Movie Review : अशक्य स्वप्न पूर्ण करण्याची कहाणी ‘मिशन मंगल’

Dipali Naphade  |  Aug 14, 2019
Movie Review : अशक्य स्वप्न पूर्ण करण्याची कहाणी ‘मिशन मंगल’

एखादी गोष्ट मनापासून करायची ठरवली तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे वाक्य आपण नेहमीच ऐकत आलो आहोत आणि याच वाक्याचा अर्थ पूर्ण करणारी कथा आहे ती ‘मिशन मंगल’ ची. भारताने पहिल्याच झटक्यात मंगळयान अभियान सफल करून दाखवलं त्यामागच्या वेडेपणाची ही कथा आहे. 2010 ते 2014 या चार वर्षात इस्रोच्या वैज्ञानिकांनी केलेली मेहनत आणि त्यामधून सफल झालेलं मंगलयान पाहताना प्रेक्षक खुर्चीला नक्कीच खिळून राहातो. पण तरीही काही त्रुटी मात्र नक्कीच राहिल्या आहेत. महिला वैज्ञानिकांनी हे मंगलयान सफल करून दाखवलं आणि त्यांना साथ दिली ती इतरांनी. कथा नक्की काय असणार याचा अंदाज प्रेक्षकाला आहेच पण तरीही ती पाहताना खुर्चीला खिळवून ठेवण्याची किमया नक्कीच दिग्दर्शक जगन शक्ती यांनी केली आहे. 

विद्या बालन चित्रपटाचा खरा हिरो

या मल्टीस्टारर चित्रपटातही विद्या बालनच चित्रपटाचा खरा हिरो आहे. कहाणीला सुरुवात होते ती एका असफल अभियानाने. ताराच्या (विद्या बालन) एका चुकीमुळे यान असफल ठरतं आणि याची खंत तिला लागून राहते. त्याचा परिणाम राकेश धवन (अक्षकुमार) च्या करिअरवर होतो आणि त्याला अशक्यप्राय असं मंगलमिशन देण्यात येतं. अगदी नासालाही अपयश आलेल्या अशा या मिशनमध्ये आपण काहीच करू शकत नाही असं राकेशला वाटतं. पण त्याला धीर देते तारा. या मिशन मंगलमध्ये त्यांना यान तयार करण्यासाठी लागणारी टीमही नसते आणि ती टीम तयार करण्यासाठी त्यांना मेहनतही घ्यावी लागते. तसंच आपल्या सिनिअर्सना तयार करण्यापासून ते त्यासाठी मोजाव्या लागणाऱ्या किमतीसाठी झटण्यापर्यंत सर्व अडचणींना बुद्धीचातुर्याने सामोरं जात मंगलयान मिशनवर ही टीम कशी मात करते आणि सफल करते हीच या चित्रपटाची कथा आहे. या सगळ्यात त्यांना साथ मिळते ती एका गांधी (सोनाक्षी सिन्हा), नेहा सिद्दीकी (क्रिती कुल्हाडी सेहगल), परमेश्वर जोशी (शरमन जोशी), क्रितिका अगरवाल (तापसी पन्नू), वर्षा पिल्लई (नित्या मेनन) आणि अनंथ अय्यर (एचजी दत्तात्रेय) यांची. सुरुवातीला हे अशक्य आहे असं म्हणणारी टीम झटून काम करत अशक्यप्राय गोष्ट शक्य करून दाखवण्यात यशस्वी होते. 

Review: स्टुडंट नाही हा तर आहे डान्स ऑफ द इयर

लहान भूमिकांमध्येही उमटवला ठसा

अक्षय आणि विद्या सोडल्यास इतरांच्या वाट्याला आलेल्या भूमिका या त्यामानाने लहान आहेत पण उठावदार आहेत. बऱ्याच कालावधीनंतर संजय कपूरला चांगली भूमिका मिळाली असून त्याने ती चांगली साकारली आहे. तर एका गांधीच्या भूमिकेतील सोनाक्षी सिन्हाही भाव खाऊन जाते. तिच्यातला बिनधास्तपणा प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.  परमेश्वरच्या भूमिकेतील शरमन त्याच्यातील निष्पापपणा खूपच चांगल्या तऱ्हेने दाखवला आहे. फक्त चित्रपटातील स्टार कास्ट जास्त असल्यामुळे प्रत्येकाच्या वाट्याला कमी वेळाचं काम असल्याचं दिसून येत आहे. पण तरीही प्रत्येकाने आपापल्या परीने काम चांगलंच केलं आहे. चित्रपटातील रितूराज त्रिपाठीने लिहिलेले संवाद प्रेक्षकांना नक्कीच खिळवून ठेवतील. काही संवादांवर प्रेक्षकांच्या टाळ्या आणि शिट्याही येतील. 

Film Review : विकासाचा पर्दाफाश करणारा ‘मुळशी पॅटर्न’

चित्रपटातील त्रुटी

मिशन मंगल म्हटल्यानंतर प्रेक्षकांच्या मनात सर्वात पहिले या मिशनसाठी नक्की कोणकोणत्या अडचणींना सामोरं जावं लागलं असणार हा प्रश्न येतो आणि या चित्रपटात सर्व काही त्याबद्दलच असेल असा ग्रहही असू शकतो. पण चित्रपटात या अडचणी दाखवल्या असल्या तरीही त्या अगदी पटापट सुटत जातात असंच दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांची थोडीशी निराशा होऊ शकते. इतकं सहजासहजी हे पार पडलेलं नाही हे माहीत असूनही काही ठिकाणी ते सहज वाटतं. इंटरवलनंतर शेवटी चित्रपट थोडा खेचल्यासारखा वाटतो. पण मसाला मुव्ही असल्यामुळे ते चालून जातं. सर्वांचा भूतकाळ इथे दिसतो. पण अक्षयकुमारचा भूतकाळ मात्र इथे दिसत नाही. त्यामुळे थोडं चुकल्यासारखं वाटतं. ही कथा खरी असली तरीही ती अजून मनोरंजक करता आली असती. 

प्रेमाच्या नात्याला लागलेला ‘कलंक’

Read More From बॉलीवूड