लाईफस्टाईल

सबकुछ स्मिता तांबे असलेला ‘सावट’

Aaditi Datar  |  Apr 5, 2019
सबकुछ स्मिता तांबे असलेला ‘सावट’

‘सावट’च्या ट्रेलरपासूनच या चित्रपटाच्या कथेबाबत उत्सुकता होती. मराठीत सस्पेन्स-क्राईम थ्रिलर हा चित्रपटाचा प्रकार फारच कमी पाहायला मिळतो आणि त्यातही मुख्य भूमिकेत अभिनेत्री हे तर दुर्मिळच. हेच साधलं आहे ‘सावट’ या चित्रपटात.

अभिनेत्री स्मिता तांबे या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच निर्मिती क्षेत्रात उतरली आहे आणि निर्मितीसाठी स्मिताने फारच चांगला विषय निवडला आहे. स्मिताने एकटीच्या खांद्यावर हा पूर्ण सिनेमा पेलला आहे, असं म्हणायला हरकत नाही. स्मिता या चित्रपटात अदिती देशमुख या स्पेशल इन्व्हेस्टीगेटीव्ह ऑफिसरची भूमिका पार पाडत आहे. जी शेवटपर्यंत रहस्याचा पिच्छा सोडत नाही. या चित्रपटामध्ये स्मिताचा एक डायलॉग आहे. ‘अफवांच्या ढिगाऱ्याखालीच सत्य सापडतं’. याच डायलॉगला अनुसरून पूर्ण चित्रपटात सत्याचा शोध घेत शेवटी अनपेक्षित अशा सत्याचा छडा लावते. सौरभ सिन्हा यांचा लेखनाचा आणि दिग्दर्शनाचा पहिलाच प्रयत्न फारच चांगला आणि प्रेक्षकांना शेवटपर्यंत खुर्चीला खिळवून ठेवतो.  

महाराष्ट्रातील एक छोटं खेडं मालगिडे, जिथे एकाच गावात सात आत्महत्त्या घडतात. ज्या प्रत्येक आत्महत्त्येचा एक साक्षीदार आहे आणि या सर्व हत्त्या वर्षातील एकाच दिवशी घडतात. आता या हत्त्या आहेत की आत्महत्त्या यामागील कारण शोधण्यासाठी अदिती देशमुख आणि तिची टीम या गावात दाखल होते आणि समोर उलगडत जातं ते धक्कादायक वास्तव. ज्या वास्तवाचा अनुभव तिने शहरातही घेतला आहे. तपासादरम्यान अदितीली कळतं की, नंदिनी नावाची एक महिला आणि तिच्या दोन मुली यांना गावात चेटकीण ठरवण्यात आलं आहे. गावकऱ्यांचा असा आरोप आहे की, या आत्महत्त्यांमागे नंदिनी आणि तिच्या जुळ्या मुलींचा हात आहे. नंदिनीची हत्त्या झाली आहे तर अधिरा आणि आशनी या जुळ्या मुलींमधील आशनीही बऱ्याच वर्षांपासून गायब आहे. तर अधिरा प्रत्येक खूनाआधी गावाबाहेर निघून जाते. आता नेमकं सत्य काय आहे या जुळ्या बहिणीचं?

दिग्दर्शक सिन्हा यांनी आपल्या एका कथेत बऱ्याच विषयांना स्पर्श केला आहे. उदा. अंधश्रद्धा, जमिनी बळकावणे, स्त्री शिक्षण आणि सक्षमीकरण इ. कथानक फुलवण्यात आणि रहस्य कायम ठेवण्यासाठी प्रत्येक पात्राचा चांगला वापर केला आहे. पण सगळ्या विषयांना न्याय देण्यात कथानक थोडं लांबत आणि सिनेमा कधी संपणार असाही विचार मनात डोकावून जातो. काही घटना अनुत्तरित राहतात. तांत्रिकरित्याही सिनेमा थोडा तोकडा वाटतो. जर या गोष्टी टाळता आल्या असत्या तर सिनेमा अजून चांगला झाला असता.

खरं पाहता ‘सावट’ हा फक्त आणि फक्त स्मिता तांबेचा सिनेमा आहे. तिने या चित्रपटाच्या निमित्ताने मिळालेल्या संधीचं सोनं करत उत्तम अभिनय केला आहे. आपलं दुःख बाजूला सारून ती आपली जवाबदारी प्रामाणिकपणे पार पाडते.  स्मितासोबतच इन्स्पेकटरच्या भूमिकेतील मिलिंद शिरोळे आणि सितांशू शरद यांच्याही भूमिका चांगल्या झाल्या आहेत. तर नवोदित अभिनेत्री श्वेतांबरी घुटेनेही लक्ष वेधलं आहे. भविष्यात तिच्याकडून अशाच चांगल्या भूमिकांची अपेक्षा करण्यास हरकत नाही.

जर तुम्हाला सुपर नॅचरल थ्रिलर हा प्रकार आवडत असेल तर ‘सावट’ हा चित्रपट तुमच्या वीकेंडसाठी चांगलं ऑप्शन आहे. 

Read More From लाईफस्टाईल