मनोरंजन

‘ज्ञानेश्वर माउली’ – ज्ञानेश्वरांची चरित्रगाथा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Dipali Naphade  |  Sep 17, 2021
dnyaneshwar-mauli

महाराष्ट्राला संत परंपरेचा वारसा लाभला आहे. महाराष्ट्रात आजही अवलंबल्या जात असलेल्या भक्ती संप्रदायाचा पाया हा संत ज्ञानेश्वरांनी रचला आहे. ज्ञानदेव ते ज्ञानेश्वर माऊली हा प्रवास सोनी मराठीवरच्या नव्या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘ज्ञानेश्वर माउली’ ही नवी मालिका सोनी मराठी वाहिनीवर 27 सप्टेंबरपासून संध्याकाळी 7 वा. प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्ञानेश्वर माउलींची चरित्रगाथा या मालिकेतून उलगडणार आहे. ज्ञानेश्वर हे महाराष्ट्रातील आवडत्या संतांपैकी एक आहेत. त्यांचा इतिहास नेहमीच गोष्टी स्वरूपातही आपल्याकडे लहान मुलांना सांगण्यात येतो. अशा थोर संतांची महती मालिकेतून आता सर्वांनाच पाहायला मिळणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांनाही या मालिकेची नक्कीच आतुरता लागून राहिली असणार यात शंका नाही.

अधिक वाचा – 10 वर्ष बाप्पाच्या एकाच मूर्तीची पूजा, विराग मधुमालतीचा नवा मानस

भगवद् गीतेतील विचार सर्वसामान्यांना कळायला हवा

भगवद् गीतेतला विचार सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिणारे आणि पसायदानासारखी कलाकृती जगाला देणारे संत ज्ञानेश्वर यांची चरित्रगाथा या मालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरांत पोचणार आहे.

दिगपाल लांजेकर आणि चिन्मय मांडलेकर यांनी या मालिकेची निर्मिती केली असून दिगपालच मालिकेचं दिग्दर्शनही  करणार आहेत. चिन्मय आणि दिगपाल या द्वयीनी आत्तापर्यंत अनेक ऐतिहासिक कलाकृती घडवल्या आहेत. हे दोघंही एखादी कलाकृती अतिशय अभ्यासपूर्वक प्रेक्षकांसमोर आणतात. या मालिकेसाठी ज्ञानेश्वर माउलींच्या रचना, ओव्या संगीतबद्ध केल्या जाणार आहेत आणि त्यामुळे प्रेक्षकांना एक सुरेल अनुभवही मिळणार आहे. ज्ञानेश्वर माउलींच्या चरित्रगाथेतील चमत्कार ग्राफिक्सद्वारे चित्रित होणार आहे. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या आयुष्यात अनेक अडअडणींचा सामना केला मात्र खरेपणा कधीही सोडला नाही. तर सर्वसामान्यांशी कसे वागावे याचा एक सुंदर पायंडाही त्यांनी घालून दिला. 

अधिक वाचा – ‘परशा’ अर्थात आकाश ठोसरचा नवा लुक करतोय चाहत्यांना घायाळ, फोटो व्हायरल

संत ज्ञानेश्वरांची परंपरा 

संत ज्ञानेश्वर 13 व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवी म्हणून ओळखले जातात. भागवत संप्रदायाचे प्रवर्तक, योगी व तत्त्वज्ञ अशीही ज्ञानेश्वरांची कीर्ती आहे. भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी), अमृतानुभव, चांगदेवपाष्टी व हरिपाठाचे अभंग ह्या त्यांच्या काव्यरचना आहेत आणि आजही याचा अभ्यास करण्यात येतो. अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाविषयक विचार मराठीतूनही व्यक्त करता येतात असा विश्वास संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथकर्तृत्वातून निर्माण केला. त्यामुळे समाजातील सर्व थरांतील लोकांना आध्यात्मिक प्रेरणा मिळाली आणि नक्की देव म्हणजे काय आणि आपण काय करायला हवे याचे योग्य मार्गदर्शनही मिळाले. ज्ञानेश्वरांनी आपल्या काव्यरचना करताना बाप विठ्ठलसुत, बाप रखुमाईवर, ज्ञाना, ज्ञानाबाई, आणि ज्ञानदेव ही नावेही वापरली आहेत. हरिपाठ या ग्रंथाच्या अखेरीस ज्ञानेश्वरांनी स्वतःची नाथसंप्रदायाची गुरुपरंपरा सांगितली आहे. संतवर्य ज्ञानदेवांनी वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी, आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठी संजीवन समाधी घेतली (कार्तिक वद्य त्रयोदशी, शके १२१८, दुर्मुखनाम संवत्सर, इ.स.१२९६, गुरुवार). हा ‘ज्ञानसूर्य’ मावळल्यानंतर अवघ्या वर्षभरात निवृत्ती, सोपान व मुक्ताबाई या त्यांच्या भावंडांनी आपआपली इहलोकीची यात्रा संपवली. इंद्रायणीच्या तीरावर आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा कार्तिक वद्य षष्ठी ते अमावस्येपर्यंत साजरा केला जातो. यातील प्रत्येक दिवसाला आगळेवेगळे महत्व आहे. अशा या महान आणि थोर संतांविषयी या मालिकेतून प्रेक्षकांना माहिती मिळणार आहे आणि ही नक्कीच त्यांच्यासाठी पर्वणी ठरणार आहे. 

अधिक वाचा – लवकरच आई होणार आहे काजल अग्रवाल, चित्रपटाचे शूटिंग केले बंद

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From मनोरंजन