भारतात मासिक पाळी हा असा विषय आहे, ज्यावर प्रत्येक जण वेगवेगळे मत देत असतो. वास्तविक अजूनही बऱ्याच ठिकाणी मासिक पाळीविषयी बिनधास्त बोलण्यास अनेक जण घाबरतात अथवा या विषयावर खुलून बोलत नाहीत. मासिक पाळीचे दिवस हे प्रत्येक महिलेसाठी वेगळे असतात. कारण या दरम्यान अनेक महिलांच्या शरीरामध्ये वेगवेगळे बदल होत असतात. आजही अनेक ठिकाणी मासिक पाळीत महिलांना चार दिवस वेगळे बसविण्यात येते आणि त्यांना हात लावणेदेखील पाप आहे असं मानण्यात येते. पण तुम्हाला माहीत आहे का भारतात मासिक पाळीशी संबंधित अनेक रितीरिवाज आहेत आणि आजही अनेक ठिकाणी हे नियम पाळण्यात येतात.
मासिक पाळी येणे मानले जाते शुभ
पूर्वीच्या काळी मासिक पाळी येणे हे अत्यंत शुभ मानले जात होते. इतिहासकार नरेंद्रनाथ भट्टाचार्य यांच्यानुसार, पूर्वीच्या काळी मासिक पाळीचे रक्त हे देवाला चढविण्यात येत असे. कारण महिलांना देवीच्या स्वरूपात पाहिले जात होते. भारतातील आसाम आणि ओडिसा राज्यात आजही मासिक पाळी साजरी करण्यात येते. त्यांच्या म्हणण्यानुसार, या दिवसात महिलांना आराम, सन्मान देण्यात यावे आणि त्याशिवाय त्यांना अधिक आनंदी ठेवण्याची गरज असते.
मासिक पाळीचे कपडे गाडले जातात
मासिक पाळीच्या दिवसात एक रीत अशीही होती की, महिला मासिक पाळीत वापरणारे कपडे हे गाडतात. कारण अनेक ठिकाणी असे मानले जाते की, मासिक पाळीत वापरला जाणारा कपडा हा नकारात्मक ऊर्जा आणि वाईट आत्मा आपल्याकडे आकर्षित करून घेतो. प्लेस ऑफ मॅस्चुरेशन इन द रिप्रॉडक्टिव्ह लिव्ह्ज ऑफ वूमन ऑफ रूलर नॉर्थ इंडियानुसार, ग्रामीण क्षेत्रातील महिला जादू करण्यासाठी रस्त्यावर असे वापरण्यात आलेले कापड अथवा पॅड वापरत असत. ज्याच्यावर करणी करायची आहे अशा व्यक्तीने त्यावर पाय दिल्यास, त्याच्यावर वाईट परिणाम होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे मासिक पाळीचे कपडे आजही काही ठिकाणी गाडले जातात.
महिलांना वेगळे करणे
प्राचीन काळी मासिक पाळीच्या दरम्यान महिलांना वेगळे करण्यात येत असे अर्थात वेगळ्या खोलीत बसविण्यात येत असे. पण त्या अछूत आहेत म्हणून त्यांना बसविण्यात येत होते असे नाही तर त्यावेळी लोकांचे म्हणणे होते की, महिलांना अशावेळी अनेक पद्धतीच्या त्रासांचा सामना करावा लागतो, ज्यामुळे त्यांच्यामध्ये शारीरिक शक्ती कमी असते आणि योग्य पद्धतीने काम करणे त्यांना शक्य नसते. पण वेळेनुसार याचा अर्थ वेगळा घेतला गेला आणि याची परिभाषा बदलली. तर काही ठिकाणी मासिक पाळीच्या वेळी महिलांना अछूत संबोधले जाऊ लागले. आजही काही गावच्या भागांमध्ये ही पद्धत आहे. मात्र अछूत म्हणून नाही तर चार दिवस महिलांना आराम मिळावा म्हणून ही पद्धत पाळली जाते.
आंबट पदार्थ खाण्यास मनाई
असं म्हटलं जातं की मासिक पाळीच्या दरम्यान महिला कोणत्याही महिलेने गायीला स्पर्श केल्यास, गाय गरोदर राहू शकत नाही. पण याचे कोणतेही लॉजिक अजूनपर्यंत सिद्ध झालेले नाही. तसंच या दिवसात महिलांना लोणचं आणि दही अशा आंबट पदार्थांना हात लावण्यास आणि खाण्यसही मनाई करण्यात आली होती. मात्र याचे कारण अजूनपर्यंत कोणालाही समजू शकलेले नाही. अनेक ठिकाणी लोणच्याला हात लावल्यास, ते खराब होते असे सांगण्यात येते. मात्र यात काहीही तथ्य नाही. मात्र अनेक गावांमध्ये ही प्रथा अजूनही पाळली जाते.
या राज्यात मासिक पाळीसंबंधात सण साजरा करण्यात येतो
तुम्हाला माहीत आहे का भारतातील अनेक राज्यात मासिक पाळीदरम्यान सण साजरा करण्यात येतो –
- कर्नाटकमध्ये मासिक पाळीच्या दिवसात सण साजरा करण्यात येतो आणि या सणाला ‘ऋतुशुद्धि’ अथवा ‘ऋतू कला संस्कार’ असे म्हटले जाते
- तर आसाममध्ये मासिक पाळीच्या संबंधित ‘तुलोनिया बिया’ हा सण साजरा करण्यात येतो. या दरम्यान मुलीला सात दिवस वेगळे ठेवण्यात येते
- तामिळनाडूमध्ये मासिक पाळीच्या या सणाला ‘मंजल निरातु विजा’ असे म्हटले जाते. हा साजरा करताना आपल्या नातेवाईकांनादेखील बोलाविण्यात येते. या दरम्यान मुलीसाठी वेगळी झोपडी बनविण्यात येते. तसंच मुलीला हळदीच्या पाण्याने आंघोळ घातली जाते.
मासिक पाळी हा कोणताही रोग नसून प्रत्येक महिलेच्या आयुष्यात घडणारी महत्त्वाची घटना आहे. त्यामुळे याकडे वाईट दृष्टीने न पाहता मासिक पाळीच्या दिवसात महिलांना अधिकाधिक स्वच्छता पाळणं कसं शक्य आहे आणि कसा त्रास होऊ नये हे पाहणं अधिक महत्त्वाचं आहे.