महाराष्ट्रीयन थाळी म्हटली की, त्यामध्ये वेगवेगळे चमचमीत आणि चटपटीत पदार्थ आलेच. पण महाराष्ट्रात थाळी वाढण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. पानाच्या डाव्या बाजूला नेहमी चटकदार चटण्या वाढल्या जातात. चटणी हा असा पदार्थ आहे तो जरी कमी वाढला जात असला तरी अशा चटण्या या पानात हमखास वाढल्या जातात. रोजच्या चटण्यांपेक्षा तुम्हाला थोड्या वेगळ्या चटकदार चटण्या बनवायच्या असतील तर तुम्ही जाणून घ्या या सोप्या चटणी रेसिपी
अशी तयार करा कढीपत्त्याची कुरकुरीत चटणी
शेंगदाणा-लसूण चटणी
शेंगदाण्याची चटणी ही खूप जणांना आवडते. तुम्हालाही शेंगदाणा चटणी आवडत असेल तर तुम्ही मस्त चटपटीत शेंगदाणा चटणी बनवू शकता.
साहित्य:
भाजलेले शेगंदाणे, आवडीनुसार लसणीच्या पाकळ्या, लाल तिखट, मीठ इ.
कृती:
- भाजलेले शेंगदाणे हासडून घ्या. त्याच्या साली काढून घ्या.
- एका मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे, लसणीच्या सोललेल्या पाकळ्या घाला.चवीनुसार लाल तिखट आणि मीठ घालून ते वाटून घ्या.
- जर तुम्हाला चटणी सुकी हवी असेल तर ती जास्त पाणी घालून वाटू नका. जर चटणी तुम्हाला थोडी ओलसर हवी असेल तर त्यात पाणी घाला. ही चटणी जेवणासोबत चांगली लागते.
सकाळच्या नाश्त्यामध्ये असतील अशा चटणी तर आरोग्यही राहील स्वस्थ
ओल्या खोबऱ्याची लाल चटणी
ओल्या खोबऱ्याची चटणी ही महाराष्ट्रीयन थाळीतील सिग्नेचर चटणी आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही. ओल्या नारळाची चटणी वेगवेगळ्या पद्धतीने करता येते. तुम्ही कधी लाल सुक्या मिरच्यांचा वापर करुन कधी ही चटणी करुन पाहिली नसेल तर नक्की करुन पाहा
साहित्य: 1 मोठी वाटी खवलेलं ओलं खोबरं, 2-3 लाल सुक्या मिरच्या, लसणीच्या काही पाकळ्या, सैंधव, डाळं
कृती:
- तव्यावर थोडेसे तेल गरम करुन त्यामध्ये साधारण दोन चमचे डाळं छान भाजून घ्या.
- एका मिक्सरच्या भांड्यात खबलेलं ओलं खोबरं, मिरच्या आणि लसणीच्या पाकळ्या, भाजलेली डाळं घालून छान वाटून घ्या. चवीसाठी सगळ्यात शेवटी सैंधव घालून चटणी सर्व्ह करा.
जवसाची चटणी
जवस हे पोटासाठी खूपच चांगले असते. अनेकांच्या घरात जवसाची चटणी बनवली जाते. तुम्हाला कोणतीही चटणी बनवण्यासाठी फारसा वेळ नसेल तर तुम्ही जवसाची चटणी घरात बनवून ठेवू शकता.
साहित्य : 1 वाटी जवस, ¼ वाटी तिळ, शेंगदाणे, सुकं खोबरं, तेल, लसणीच्या पाकळ्या, मीठ
कृती :
- एका भांड्यात जवस, तिळ, शेंगदाणे, सुकं खोबरं भाजून घ्या
- मिक्सरच्या भांड्यात सगळे साहित्य एकत्र करुन घ्या. लसणीचा स्वाद अधिक चांगला हवा असेल तर तेलात लसूण परतून घ्या. त्यामुळे ती छान कुरकुरीत लागते.
- आता ही चटणी छान वाटून घ्या. ही चटणी एअरटाईट डब्यात भरा ती चांगली टिकू शकते.
चिंच-गुळाची अशी चटणी कराल तर स्वयंपाकात असा होईल तिचा वापर
आंबे डाळ
चैत्र महिन्यात आवर्जून केला जाणारा हा प्रकार आहे. जो कैरी आल्यावर अगदी हमखास केला जातो.
साहित्य: किसलेली कैरी, चणा डाळ, मोहरी, चवीनुसार कडिपत्ता, मोहरी,हिरव्या मिरच्या, हिंग,हळद, कोथिंबीर, साखर, तेल
कृती:
- कैरीच्या गराच्या साधारण दुप्पट चण्याची डाळ आपल्याला यासाठी लागते. त्यामुळे त्या अंदाजानुसार चण्याची डाळ भिजत घाला. चणाडाळ चांगली 8 तास तरी भिजवा. ज्यावेळी तुम्ही ही रेसिपी करण्यासाठी तयार असाल. त्यावेळी भिजलेली चणाडाळ, मिरच्या मिक्सरमध्ये घेऊन ते जाडसर वाटून घ्या.
- (चणाडाळ ही जाड वाटणेच गरजेचे आहे.) वाटलेल्या चणाडाळीच्या मिश्रणात तुम्ही अंदाजानुसार कैरी घाला. कैरी घातल्यानंतर तुम्ही हे मिश्रण खाऊन बघा. जर तुम्हाला अजून आंबट हवे असेल तर तुम्ही त्यामध्ये कैरीचा गर आवश्यकतेनुसार घाला.
- एका फोडणीपात्रात थोडं जास्तीच तेल गरम करुन त्यामध्ये कडिपत्ता, मोहरी, हिंग, वाटलेली कोथिंबीर, हळद घाला.तयार चुरचुरीत फोडणी कैरीच्या मिश्रणात घाला. त्यात तुमच्या आवडीनुसार साखर घाला. आंबेडाळीची चव थोडी आंबट- तिखट- गोड अशी लागायला हवी.
कांदा चटणी
कांदा भाजून त्याची तिखट-गोड चटणी अनेक ठिकाणी केली जाते. ही चटणी इतकी चविष्ट लागते की, इतर कोणतीही चटणी खाण्याची इच्छा होत नाही. ही चटणी भाजीसारखीच खाण्याची इच्छा होते.
साहित्य: 4 कांदे, 1 चमचा बडिशेप,धणे, ½ ;चमचा जीरे, लाल सुक्या मिरच्या आवडीनुसार, चवीनुसार चिंच, ½ चमचा तीळ, कडीपत्ता, मोहरी,तेल, मीठ, लाल तिखट
कृती :
- तवा गरम करुन त्यावर धणे, बडिशेप, जीरे, लाल सुक्या मिरच्या भाजू घ्या.
- कांदे उभे चिरुन घ्या. तेलात ते भाजून घ्या. त्याच तेलात लसूणही छान भाजून घ्या.
- एका मिक्सरच्या भांड्यात तेलात भाजलेले सगळे साहित्य आणि चिंच वाटून घ्या.
- खोलगट भांड्यात तेल गरम करुन कडीपत्ता, मोहरी, जीर, तीळाची फोडणी करा. तयार कांद्याचे वाटप घाला. त्यामध्ये लाल तिखट घालून चांगले परतून घ्या. कांदा शिजला की, त्याला छान तेल सुटेल तुमची कांदा चटणी तयार
आता पानाच्या डाव्या बाजूला वाढण्यासाी अशा मस्त चटकदार चटण्या तयार करा.