जेव्हा आपण परदेशात जातो तेव्हा एका टाइम झोनमधून दुसऱ्या टाइम झोन मध्ये वेगाने प्रवास करतो आणि आपल्या शरीराची नेहमीची लय सिंक होत नाही तेव्हा जेट लॅगचा त्रास होतो. हा त्रास एखादा दिवस टिकतो आणि आपले शरीर अखेरीस नवीन टाइम झोनशी जुळवून घेते. परंतु असे काही मार्ग आहेत ज्याने तुम्ही स्वतःला नवीन टाइम झोनमध्ये अधिक लवकर ऍडजेस्ट करण्याचा प्रयत्न करू शकता आणि जेट लॅगची लक्षणे कमी करू शकता. विविध टाइम झोनमध्ये प्रवास केल्यामुळे सूर्यप्रकाश, शरीराचे कार्य चालण्यासाठी स्रवले जाणारे हॉर्मोन्स आणि शरीराचे तापमान यात बदल होतो. हे घटक आपल्या शरीरातील इंटर्नल क्लॉक व्यवस्थापित करण्यासाठी वापरले जातात. या घटकांमध्ये बदल झाल्याने आपल्या शरीरातील इंटर्नल क्लॉकचे कार्य देखील बिनसते आणि जेट लॅगचा त्रास होतो.
जेट लॅग झाल्यास डोकेदुखी, थकवा, निद्रानाश, लक्ष केंद्रित करण्यास त्रास होणे, भूक न लागणे, बद्धकोष्ठता आणि अतिसाराचा त्रास होणे ही लक्षणे जाणवतात. आपण जेव्हा पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रवास करतो तेव्हा जेट लॅगचा अधिक त्रास होतो तसेच तो अधिक काळ टिकतो. जर तुम्ही वारंवार प्रवास करत असाल आणि तुमचे वय जास्त असेल तर तुम्हाला जेट लॅग होण्याची अधिक शक्यता असते. वैद्यकीय भाषेत या त्रासाला डिसिंक्रोनोसिस असे म्हणतात.
जेट लॅगचा त्रास कमी करण्यासाठी उपाय
- झोपेचे वेळापत्रक आपण प्रवास करत असलेल्या टाइम झोननुसार ऍडजेस्ट करणे आवश्यक आहे. तुम्ही जाणार आहेत त्या ठिकाणच्या वेळेप्रमाणे तुमची झोपण्याची वेळ ऍडजेस्ट करा.
- प्रवासाच्या एक दिवस आधीपासूनच जड जेवण, कॅफिन किंवा अल्कोहोल टाळा. तसेच प्रवासात देखील हलका आहार घ्या. कारण संपूर्ण प्रवास आपल्याला बसून किंवा झोपूनच करायचा असतो. अशा वेळेला जड आहार घेतल्याने त्रास होऊ शकतो.
- कॅफिन आणि अल्कोहोलचे सेवन केल्याने सेन्स्ट्रल नर्व्हस सिस्टीम उद्दीपित होते. आणि त्यामुळे झोपेच्या वेळेत बदल होऊ शकतो आणि त्यामुळे या दोन्हींचेही सेवन प्रवासात किंवा प्रवासाला निघण्याच्या थोड्या आधीपासूनच टाळले पाहिजे.
- लांबच्या प्रवासादरम्यान विमानातच झोपण्याचा सल्ला दिला जातो. विमानात प्रवास करताना बऱ्याच लोकांना झोप येत नाही. तरीही झोपण्याचा प्रयत्न करावा. विमानाच्या आवाजाचा आणि लाईट्सचा त्रास होऊ नये म्हणून इअरप्लग आणि डोळ्यांवर पट्टी वापरावी. चांगली झोप येण्यासाठी आरामदायक छोटी उशी बरोबर ठेवा म्हणजे मानेला त्रास होणार नाही.
- शक्यतोवर तुम्ही तुमच्या इच्छित स्थळी पोहोचल्यानंतर पहिल्या दिवशी आराम करता येईल असेच वेळापत्रक ठरवा. दीर्घ विमान प्रवासानंतर पहिल्या दिवशी आराम मिळणे आणि शरीराला नवीन वातावरणाची सवय होऊ देणे महत्वाचे आहे. लांबच्या प्रवासानंतर पहिल्याच दिवशी दणक्यात कामाला सुरुवात केल्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो.
- लाईट थेरपीचा एक भाग म्हणून सूर्यप्रकाशात वेळ घालवणे आवश्यक आहे. तसेच जेट लॅग कमी होण्यासाठी शक्यतोवर स्थानिक वेळेनुसार झोपण्याचा प्रयत्न करा.
- प्रवासात आपण नकळत कमी पाणी पितो आणि आपल्याला डिहायड्रेशनचा त्रास होतो. आधीच नव्या टाइम झोन आणि नव्या वातावरणाशी ऍडजेस्ट करताना त्रास होतो त्यात जर डिहायड्रेशन झाले तर त्याने त्रासात भर पडते. म्हणूनच प्रवासातही भरपूर पाणी प्यायला हवे.
- नव्या ठिकाणी गेल्यावर पहिल्या दिवशी शक्यतोवर दिवसा झोपू नये नाहीतर रात्री परत जबरदस्तीने जागरण होते. थोडा वेळ सूर्यप्रकाशात घालवावा. दिवसभर झोपून राहू नये. जर तुम्हाला खूप झोप येत असेल तर 15-30 मिनिटांची छोटी डुलकी घेतली जाऊ शकते. असे केले तरच तुमचे बॉडी क्लॉक नव्या टाइम झोन प्रमाणे लवकर ऍडजेस्ट होऊ शकेल.
हे उपाय केलेत तर जेट लॅगचा त्रास कमी होऊ शकतो.
Photo Credit- istockphoto, freepik
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक
.
Read More From International Travel
जगातील अशी पर्यटन स्थळं जिथे होत नाही सूर्यास्त
Trupti Paradkar
दुबईची टूर प्लॅन करताय,मग या ठिकाणांना अवश्य भेट द्या
Trupti Paradkar