मनोरंजन

Film Review : महाराष्ट्राच्या इतिहासातील सुवर्ण पान सादर करणारी ‘हिरकणी’

Aaditi Datar  |  Oct 24, 2019
Film Review : महाराष्ट्राच्या इतिहासातील सुवर्ण पान सादर करणारी ‘हिरकणी’

दिवाळीला नेहमीच बॉलीवूड कलाकारांचे मोठमोठ्या बॅनरचे चित्रपट रिलीज होतात. पण यंदाच्या दिवाळीत आपल्या भेटीस आली आहे हिरकणी. महाराष्ट्राच्या इतिहासातील एका आईची अजरामर कथा म्हणजे हिरकणी. हिरकणीबाबत आपण इतिहासात वाचलं आहे. पण तिच्या या घटनेमागील पार्श्वभूमी, ती नेमकी कोणत्या परिस्थिती पश्चिम कड्यावरून खाली उतरली ते मात्र कोणालाच माहीत नव्हतं. त्यामुळे हे सर्व व्हिज्युअली आणि मोठ्या पडद्यावर पाहणं नक्कीच वेगळा अनुभव ठरतं. त्यातही इतिहासातील या हिरकणीबाबतचे सर्व संदर्भ शोधून ते मोठ्या पडद्यावर मांडणं हे सोपं नव्हतं.

‘हिरकणी’ची अंगावर शहारा आणणारी कथा

रायगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या रायगडवाडीतील गवळण हिरा म्हणजेच हिरकणी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील जिवाजीराव म्हणजे हिरकणीचा नवरा यांचं गोड कुटुंब. हिरकणी आणि जिवाजीला महाराजांबद्दल वाटणार अभिमान आणि कौतुक. आपल्या लहानग्याला सासूकडे ठेवून हिरा गवळण रोज गडावर दूध नेत असते. पण कोजागिरीच्या दिवशी नवरा जंजिरेच्या मोहिमेवर गेला असताना आणि सासूही दुसऱ्या गावात उपचारासाठी गेली असताना हिराला संधी मिळते ती महाराजांच्या मुदपाकखान्यात दूध पोचवण्याची. ही सुवर्णसंधी हिराला गमावयची नसते पण एकीकडे बाळाचीही काळजी असते. तरीही ती सूर्यास्ताआधी आपण घरी पोचू या निश्चयाने गडावर दूध पोचवण्यास जाते. मात्र तिला गडावरून उतरण्यास उशीर होतो आणि ती गडावरच अडकते. आपल्या तान्हुल्याच्या काळजीने तिला काहीच सुचेनासं होतं आणि तिला कळतो पश्चिम कड्यावरून उतरण्याचा अशक्य पर्याय. पण आपल्या बाळासाठी हिरकणी धैर्य एकटवून त्या कड्यावरून उतरण्याचा निर्णय घेते…पुढे काय होतं ते जाणून घेण्यासाठी हा चित्रपट तुम्ही पाहिलाच पाहिजे.

चित्रपटाची जमेची बाजू

दिग्दर्शकाच्या भूमिकेत अभिनेता प्रसाद ओकचा हा पहिला प्रयत्न नक्कीच प्रशंसनीय आहे. हिरकणीच्या छोट्याश्या कथेला दिलेला छत्रपतींच्या काळातला दिलेला संदर्भ असो वा ते मोठ्या पडद्यावर साकारणं असो. चित्रपटाची भट्टी छान जमली आहे. हिरकणी चित्रपटाचं कास्टिंग उत्तम आहे. हिरकणीच्या भूमिकेला अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने चांगला न्याय दिला आहे. पश्चिम कड्यावरून खाली उतरणारी हिरकणी तिने छान निभावली आहे. या सीनमधील सापाचा प्रसंग खरंच अंगावर शहारा आणतो. तसंच हिरकणीच्या नवऱ्याच्या भूमिकेतील जिवाजीराव म्हणजेच अमित खेडेकर यांनी उत्तम अभिनय केला आहे. चित्रपटातील व्हिएफक्ससुद्धा उत्तम झाले आहेत. हिरकणीच्या जमेच्या बाजूमध्ये चित्रपटाच्या संगीताचा महत्त्वाचा वाटा आहे. अमृतराज यांनी संगीतबद्ध केलेली चित्रपटातील सर्व गाणी छान आणि कथेचा भाग म्हणून येतात. मग चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा पोवाडा असो वा रोमँटीक गाणं असो. अगदी कोजागिरी पौर्णिमेसाठी असणारं गाणंही अगदी छान जमून आलं आहे. सर्वात जास्त लक्ष वेधते ती चित्रपटाच्या शेवटी येणारी संगीत लेजंड आशाताई भोसले यांच्या आवाजातली आईची आरती. जी ऐकून तुमच्या डोळ्यात पाणी नक्कीच येईल.

कुठे कमी पडला चित्रपट

चित्रपटाची सुरूवात होताच लागोपाठ दोन गाणी आल्यामुळे मध्यंतरापूर्वीचा चित्रपट पकड घेण्यात कमी पडतो. पण मध्यंतरानंतर मात्र चित्रपटाची कथा वेग घेते. तसंच हिरकणीचा पश्चिम कड्यावरून उतरण्याच्या भागात काही अंगावर काटे आणणारे सीन आहेत. तरी हा भाग काहीसा झटपट पार पडल्यासारखा वाटतो. हिरकणीचा कड्यावरून उतरण्याचा सीन अजून खुलवता आला असता तर चित्रपट वेगळ्याच उंचीवर पोचला असता.

सणाच्या निमित्ताने इतिहासातील या अजरामर कथेला मोठ्या पडद्यावर कुटुंबासोबत अनुभवण्यास हरकत नाही. या निमित्ताने इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या आजच्या पिढीला इतिहासातील हिरकणीचे सोनेरी पानही अनुभवता येईल. मग दिवाळी असो वा महाराष्ट्र दिन शुभेच्छा आणि हिरकणीच्या खडतर प्रवासाचा थरार अनुभवा. 

निर्माते – मागीज पिक्चर्स यांच्या सहकार्याने इरादा एंटरटेनमेंटने या चित्रपटाची निर्मिती केली असून फाल्गुनी पटेल या निर्मात्या आणि लॉरेन्स डिसुझा हे सहनिर्माते आहेत. तर राजेश मापुस्कर हे क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहेत.

दिग्दर्शक – प्रसाद ओक  

कथा – चिन्मय मांडलेकर 

कलाकार – सोनाली कुलकर्णी, अमित खेडेकर, प्रसाद ओक. 

स्टार्स – 3.5

Read More From मनोरंजन