बॉलीवूड

रितेश देशमुखचं केंद्रीय मंत्र्यांना सणसणीत उत्तर…वाचा काय म्हणाला रितेश

Dipali Naphade  |  May 13, 2019
रितेश देशमुखचं केंद्रीय मंत्र्यांना सणसणीत उत्तर…वाचा काय म्हणाला रितेश

रितेश देशमुख हा माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांचा मुलगा असला तरीही त्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलीवूडमध्ये एक स्थान निर्माण केलं आहे. नुकतंच रितेशने केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना सणसणीत उत्तर दिलं आहे. नक्की काय झालं असा प्रश्न सर्वांनाच आता आहे. तर केंद्रीय मंत्री पियुष गोयल हे नुकतचे पंजाबमध्ये एका कार्यक्रमात असताना त्यांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे मुंबईवर झालेल्या हल्ल्याच्या वेळी ताज हॉटेलमध्ये बसून आपला मुलगा रितेश देशमुखला बॉलीवूडमध्ये कसा प्रवेश मिळवून द्यायचा यासाठी चिंतेत होते आणि लोकांच्या भेटीगाठी घेत होते असं म्हटलं आहे. त्यावर आता रितेशने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून पियुष गोयल यांना सणसणीत चपराक दिली आहे. पियूष गोयल यांचं नाव न घेता रितेशने याला सडेतोड उत्तर दिलं आहे. ‘हे खरं आहे की, मी माझ्या वडिलांबरोबर ताज/ओबेरॉय हॉटेलमध्ये होतो पण हे मात्र खोटं आहे की, माझ्या वडिलांनी कधीही मला काम मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला.’

विलासराव देशमुख यांचं 7 वर्षांपूर्वी झालं निधन

रितेशने एक पत्र लिहिलं आहे, यामध्ये त्याने नक्की काय झालं याचा पूर्ण उल्लेख केला आहे. ‘हे खरं आहे की, मी माझ्या वडिलांबरोबर ताज/ओबेरॉय हॉटेलमध्ये होतो. पण त्यावेळी नाही, जेव्हा हॉटेलमध्ये गोळ्या चालत होत्या अथवा बॉम्बब्लास्ट होत होते. पण हे मात्र खोटं आहे की, माझ्या वडिलांनी कधीही मला काम मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला. माझ्या वडिलांनी कधीही कोणत्याही चित्रपट निर्मात्याकडे जाऊन माझ्यासाठी शब्द टाकला नाही आणि या गोष्टीचा मला अभिमान आहे. तुम्हाला मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्याचा हक्क नक्कीच आहे. पण त्याक्षणी नाही जेव्हा ती व्यक्ती या जगामध्ये नाही. तुम्ही साधारण 7 वर्ष उशीर केला आहे. ते आता इथे असते तर त्यांनी नक्कीच तुम्हाला योग्य उत्तर दिलं असतं.’ इतकंच बोलून रितेश थांबला नाही तर, पियुष गोयल यांना निवडणुकांच्या निकालांसाठीही शुभेच्छा दिल्या. रितेशचे वडील आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचं सात वर्षांपूर्वी निधन झालं होतं.

रितेशचं केलं होतं 16 वर्षांपूर्वी पदार्पण

नुकतंच एका मुलाखतीमध्ये रितेशने म्हटलं होतं की, त्याला या इंडस्ट्रीमध्ये येऊन 16 वर्ष झाली आहेत आणि इतका काळ आपण इथे टिकून राहू याचं त्याला स्वतःलाही आश्चर्य वाटत आहे. ‘तुझे मेरी कसम’ या रामोजी राव यांच्या चित्रपटातून रितेशने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. आपल्याला आयुष्यात बऱ्याच संधी मिळाल्या आणि इथपर्यंत येऊन पोहचलो असंही रितेशने म्हटलं आहे. आपल्या या प्रवासात अनेक चढउतार आले. पण प्रत्येकवेळी आयुष्याने काही ना काही शिकवलंच आहे असंही म्हटलं आहे. रितेशने आपल्या मेहनतीने आणि अभिनयाच्या जोरावर आतापर्यंत या इंडस्ट्रीमध्ये आपलं स्थान टिकवून ठेवलं आहे. 2003 मध्ये या इंडस्ट्रीत आल्यानंतर रितेशने कॉमेडी चित्रपटांमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. ‘मस्ती’, ‘क्या कूल है हम’, ‘मालामाल विकली’, ‘हे बेबी’ आणि ‘हाऊसफुल’सारख्या चित्रपटांमधून रितेशने प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं आहे. नुकताच ‘टोटल धमाल’मध्येही रितेश दिसला होता.

फोटो सौजन्य – Twitter, Instagram

हेदेखील वाचा 

रितेश-जेनेलिया चार वर्षांनी पुन्हा एकत्र

‘माऊली’ची एन्ट्री आणि सलमानची शिट्टी

रितेशला जेनेलियाच्या हटके शुभेच्छा

Read More From बॉलीवूड