तुमचं एखादं स्वप्न आहे का.. जे तुम्ही आता विसरला आहात. कारण तुम्हाला वाटतं की, आता वयामुळे तुम्हाला पूर्ण नाही करता येणार किंवा तुम्हाला वेळ नाहीये किंवा ते कधीच शक्य नाही. तुम्हाला कोणाचा आधार नाही मिळणार. मग हा विचार आत्ताच थांबवा. जर तुम्हाला असं वाटतं असेल तर तुम्ही खान्देश कन्या अनिमा पाटील-साबळे यांच्याबद्दल वाचलंच पाहिजे.
नासा या अंतराळ संशोधन संस्थेत ओरायन स्पेसक्राफ्ट सिम्युलेशन्स लॅब मॅनेजर म्हणून कार्यरत,सायंटीस्ट-अॅस्ट्रोनॉट (कमिर्शिअल स्पेस प्रोजेक्ट्स), सॉफ्टवेअर आणि एअरोस्पेस इंजीनिअर, नासा या अंतराळ संशोधन संस्थेत कार्यरत, पायलट, स्कूबा डायव्हर, नासा स्पीकर, नासा गर्ल्स मेंटोर, बॉय स्काऊट्स असिस्टंट स्काऊट मास्टर, STEM अॅडव्होकेट, नासा अॅस्ट्रोनॉट अस्पायरंट, कलाकार, गायक, डान्सर, परफॉर्मर, मॉडेल आणि बरंच काही. ही आहे खान्देश कन्या अनिमा पाटील-साबळे यांची ओळख आणि त्या एकाच वेळी पार पाडत असलेल्या भूमिका. या खान्देश कन्येची भरारी आणि कार्य असामान्य आहे. एवढं सगळं मिळवूनही ती थांबली नाहीये. आजही तिचं कार्य अविरत सुरू आहे. अनिमा पाटील-साबळे या उत्साही आणि स्फूर्ती देणाऱ्या व्यक्तिमत्वाशी आम्हीही गप्पा मारल्या महिलादिनाच्या निमित्ताने.
एका स्वप्नाची सुरूवात…
खान्देशात जन्मलेली या कन्येने कठीण परिस्थितीतही न डगमगता आपल्या स्वप्नांची कास धरून ठेवली. आज ती ध्रुवताऱ्यांप्रमाणे युवापिढीला मार्गदर्शन करत आहे. आपल्या करिअरसोबतच ती घरातीलही सर्व जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडत आहे.
अनिमा पाटील-साबळे सांगतात की, वयाच्या 7 व्या वर्षी शाळेतल्या पुस्तक प्रदर्शनात अनिमा यांनी युएस आणि रशियन स्पेसक्राफ्ट्सची चित्रं असलेलं पुस्तक पाहिलं. त्याच दिवशी त्यांनी मनात ठरवलं की, मला अंतराळवीर व्हायचं आहे. लहानपणी माझी प्रेरणा होता एकमेव भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा. मी ठरवलं की, आपणही त्याच्यासारखं फायटर पायलट व्हायचं आणि मग आपल्याला ही अंतराळवीर होता येईल. मी एक चांगली विद्यार्थिनी होते आणि शाळेतील इतर गोष्टीतही भाग घेत असे. जसं समूह गायन, डान्स आणि वक्तृत्व स्पर्धा. त्यावेळचं भारतातील वातावरण हे महिला फायटर पायलटला मान्य करणारं नव्हतं. पण तरीही मला विश्वास होता की, माझं शिक्षण होईपर्यंत परिस्थिती बदलेल. माझ्या बाबांनी सांगितलं होतं की, तुला जे शिक्षण घ्यायचं आहे ते इथेच म्हणजे जळगावमध्येच घ्यायचं. त्यामुळे फायटर पायलटसाठी गरजेच्या असणाऱ्या फिजीक्स विषयात अॅडमिशन घेतलं आणि त्यात डिस्टीक्शने पासही झाले. मी फायटर पायलटचं अॅप्लिकेशन आणलं, पण त्यावर फक्त पुरुषांसाठी असं लिहीलं होतं. तरीही मी अप्लाय करायचं ठरवलं. पण परफेक्ट व्हीजनच्या रिक्वायरमेंटचा दुसरा क्रायटेरिया बघितल्यावर माझी निराशा झाली. मला हलक्याशा नंबरचा चश्मा होता. परफेक्ट व्हीजन नव्हतं म्हणून मी अप्लाय करू शकले नाही. त्या क्षणी मला सगळं संपल्यासारखं वाटलं. आतापुढे शिक्षण तर घ्यायचं होतं, वडिलांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात नवीनच असलेल्या MCA डिग्रीविषयी सुचवलं. त्याची एट्रंस क्लिअर करून त्यात अॅडमिशन मिळवलं. पण वडिलांनी दटावलं की, डिग्री पूर्ण होईल याची खात्री नाही, तुला स्थळं येत आहेत लग्न ठरलं तर शिक्षण अर्धवट राहणार. अशा वेळेस आईने साथ दिली. लग्न ठरलं तर आपण होणाऱ्या नवऱ्याच्या घरच्यांना शिक्षण पूर्ण करू द्यावं अशी विनंती करू. MCA करत असताना सीनिअर असलेल्या दिनेश यांनी मागणी घातली. लग्न झालं आणि दोघांनी मुंबईत दोन वर्ष सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून नोकरी केली. दोघांना एकाच कंपनीतर्फे अमेरिकेत जाण्याची संधी मिळाली. अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे त्या स्थायिक झाल्या. त्यावेळेस स्पेस शटल्सचे नियमित लाँचेस त्या बघत होत्या. जवळच नासा सेंटर असल्याची त्यांना माहीती झाली आणि पुन्हा एकदा त्यांच्या अंतराळवीर होण्याच्या स्वप्नाने त्यांना खुणावलं.
आज त्या दोन मुलांची आई असून नासा संस्थेत कार्यरत आहेत. नासाच्या अनेक महत्त्वपूर्ण अभियानामध्ये कामगिरी बजावत आहेत. एवढ्यावरच न थांबता लोकांनाही मार्गदर्शन करत आहेत. #InspireMotivateGuide हे त्यांचं ध्येय वाक्य आहे.
रॉकेटवुमन अनिमा यांचं कार्य
– 2012 मध्ये त्यांची निवड नासाच्या केप्लर मिशनसाठी झाली.
– त्यानंतर हवाईमधल्या सिम्युलेटेड मार्स मिशनसाठीही त्यांची निवड झाली. पण दुर्देवाने अनिमा यांना त्यात सहभागी नाही होता आलं. पण मिशन सपोर्ट स्पेशलिस्ट म्हणून त्या या मिशन्समध्ये काम करत आल्या आहेत.
– ह्युमन एक्सप्लोरेशन अँड रिसर्च अॅनलॉग म्हणजेच हेरा (Human exploration and Research analogue/ HERA) हाही अनिमा यांच्या प्राप्तीपैकी एक आहे. यामध्ये त्यांची कमांडर म्हणून नियुक्ती झाली. यामध्ये त्या 14 दिवस त्यांच्या टीमसोबत जिओग्राफस नावाचा अॅस्ट्रोईड मिशन सिम्युलेशनमध्ये होत्या.
– त्यांची निवड पॉस्सम प्रोजेक्ट – पोलर सबऑर्बिटल सायन्स इन द अप्पर मेसोस्फियर झाली. ज्याला नासा सपोर्ट करतं.
– ही लिस्ट इथेच संपत नाही, त्यांचं नाव फिनोम प्रोजेक्ट – सायकोलॉजिकल, हेल्थ आणि एन्व्हार्यमेंटल ऑब्जर्व्हेशनमध्येही झाली. एप्रिल 2018 मध्ये मार्स डेझर्ट रिसर्च स्टेशन येथे मार्स अॅनलॉग मिशनच्या त्या कमांडर होत्या. मार्सवर अॅस्ट्रनॉट्स कशा पद्धतीने राहतात, कशा पद्धतीने काम करतात याचा अभ्यास करण्यासाठी हे मिशन होतं.
सगळ्यांसाठी प्रेरणादायी असलेल्या अनिमा साबळे-पाटील यांनी आम्ही विचारलेल्या प्रश्नांना वेळातवेळ काढून उत्तर दिली.
तुमचं पुढील स्वप्नं किंवा ध्येय काय आहे?
माझं स्वप्नं किंवा ड्रीम जॉब अजूनही सत्यात आला नाहीयं. माझी आजही नासा अॅस्ट्रनॉट होण्याची इच्छा कायम आहे. मला विश्वास आहे की, एकदिवस नासाच्या मंगळ अभियानाच्या टीममध्ये माझा समावेश नक्की असेल. ही आहे माझं प्रोफेशनल ध्येय. तर खाजगी आयुष्यात एक आई म्हणून आपल्या दोघी मुलांना व्यवस्थित घडवून त्यांना त्यांच्या आयुष्यात आनंदी, जबाबदार आणि सुखी समाधानी झालेले बघायचे आहे. तसंच माझा उद्देश आहे की, तरूण पिढ्यांना आणि खरंतर सर्व वयोगटातील व्यक्तींना #InspireMotivateGuide करत राहणं.
ज्या भारतीय युवांना अंतराळवीर व्हायचं आहे, त्यांना तुम्ही काय सांगाल?
अंतराळवीर होण्याचं स्वप्न पाहणं हेच सर्वात कठीण स्वप्न आहे. या ग्रहावर साध्य करण्यासाठी हे सर्वात अवघड ध्येय आहे. त्यामुळे भरपूर मेहनत करण्यासाठी तयार राहा, चिकाटी कायम राखा आणि सकारात्मक राहा. हे स्वप्न पूर्ण करतानाच तुमच्याकडे बॅकअप प्लॅनही तयार असला पाहिजे. तुमचं करिअर असं प्लॅन करा जेणेकरून अंतराळवीर होण्याचं स्वप्न पूर्ण करताना तुमच्या हातात एक फुलटाईम जॉबही असेल. दैनंदिन आयुष्यात तो जॉबही करायला तुम्हाला आवडेल. मी माझं अंतराळवीर होण्याचं ध्येयं पूर्ण करत असतातना माझ्या दोन मुलांचंही संगोपन करतेय, घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळतेय, माझ्या पर्सनल स्कील्सवर काम करतेय, पूर्णवेळ नोकरी करत आहे, शिकत्येय आणि माझे अनुभवसुद्धा लोकांबरोबर शेअर करत आहे. त्यामुळे तुम्हीही एकाच वेळी अनेक जवाबदाऱ्या पार पाडण्यासाठी आणि न थकता काम करण्यासाठी तयार असायला हवं. पण हे करताना तुमचं आयुष्यही छानपणे एन्जॉय करायला विसरू नका.
आयुष्यात तुम्ही कोणत्याही यशाच्या शिखरावर पोचलात तरी तुमचे पाय मात्र जमिनीवरच असायला हवेत. ज्या लोकांनी तुम्हाला मदत केली, मार्गदर्शन केलं त्यांचे आभारी राहा. नेहमी नम्र आणि जे तुमच्याकडे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा. मी अशी लोकं पाहिली आहेत, जी यश मिळाल्यावर लोकांशी उद्धटपणे वागतात, लोकांचा अपमान करतात. पण लक्षात ठेवा की, असा स्वभाव तुम्हाला फार पुढे नेणार नाही. हा गुणधर्म तुम्हाला आजच्या कोणत्याही अंतराळवीरांमध्ये दिसणार नाही. अंतराळवीर म्हणून तुम्ही तुमच्या आसपासच्या लोकांचं आणि ज्या गोष्टी तुमच्यासाठी उपलब्ध आहेत, त्यासाठी कृतज्ञ असलं पाहिजे. हे तेव्हाच शक्य आहे, जेव्हा तुमच्यामध्ये नम्रता आणि कृतज्ञता असेल.
महिलादिनानिमित्त POPxoमराठी वाचकांसाठी अनिमा यांचा खास संदेश
माझ्या सर्व मैत्रिणींना मी सांगू ईच्छिते की, स्वतःवर विश्वास ठेवा, कारण जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तेव्हा तुम्ही अनस्टॉपेबल होता. तुमच्या सर्व जवाबदाऱ्या पार पाडतानाच सर्वांना सोबत घेऊन चला आणि तुमची स्वप्नंही पूर्ण करा. तुमच्याकडे सौंदर्य आणि ग्रेस तर आहेच त्यासोबतच तुमच्याकडे प्रचंड क्षमता आहे. तुम्हीही विचारही करू शकणार नाही इतक्या तुम्ही शक्तीशाली आहात. तुमच्या सर्व उर्जैचा वापर सकारात्मक करा आणि स्वतःवर विश्वास ठेवणं कधीच थांबवू नका. मग पाहा तुम्हाला कोणीही अडवू शकणार नाही. तुम्हा सगळ्यांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. चला एकमेंकीना आधार देऊया, घडवूया आणि आनंद साजरा करूया. सर्वत्र प्रेमाचा आणि शांततेचा संदेश पसरवूया.
आम्हाला आशा आहे की, अनिमा यांच्यासारख्या अनेक रॉकेटवुमन आपल्या महाराष्ट्रात आणि देशात निर्माण होवोत. कारण आज आपल्याकडे मार्गदर्शनासाठी अनिमा यांच्यारुपाने कायमस्वरुपी उर्जास्त्रोत आहे. मग स्वप्न फक्त पाहू नका ती जिद्दीने पूर्णही करा आणि उंच भरारी घ्या.
सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
हेही वाचा –
महिलांविषयी आदर हा कायमस्वरुपी असायला हवा – वैदेही परशुरामी
नंदिता पालशेतकरांच्या ‘या’ हेल्थ टीप्सने प्रत्येक स्त्री होईल निरोगी
रेडिओलॉजिस्ट शिल्पा लाड सांगत आहेत निरोगी जीवनाचा ‘आरोग्यमंत्र’
Read More From लाईफस्टाईल
Diwali Padwa Wishes, Quotes, Messages In Marathi 2022 | दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा
Dipali Naphade