लग्नसराई

‘फुलराणी’ सायना नेहवाल पारूपल्ली कश्यपशी विवाहबद्ध

Dipali Naphade  |  Dec 14, 2018
‘फुलराणी’ सायना नेहवाल पारूपल्ली कश्यपशी विवाहबद्ध

लग्नाचा हंगाम संपता संपत नाहीये आणि आता ‘फुलराणी’ सायना नेहवालचंही नाव यात जोडलं गेलं आहे. बॅडमिंटनपटू पारूपल्ली कश्यपशी सायना नेहवालने कोणताही गाजावाजा न करता हैदराबादमध्ये लग्न केलं आहे. सायना आणि पारूपल्ली दोघंही लग्न करणार असं वृत्त याआधीही आलं होतं. मात्र त्यांच्या लग्नाची तारीख घोषित करण्यात आली नव्हती. आता सायना आणि पारूपल्ली दोघांनीही ‘बेस्ट मॅच ऑफ माय लाईफ’ अशी कॅप्शन लिहित आपल्या लग्नाचा फोटो शेअर केला आहे. हे दोन्ही बॅडमिंटन खेळाडू 2005 पासून गोपीचंद यांच्याकडे प्रशिक्षण घेत असून मागील 10 वर्ष एेकमेकांना डेट करत आहेत आणि आता आपल्या प्रेमाचं दोघांनीही लग्नात रुपांतर करून आपल्या चाहत्यांना ही गोड बातमी स्वतः फोटो शेअर करून सांगितली आहे.

लग्नांचा हंगाम

सध्या लग्नाचा हंगामच सुरु आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. दीपिका – रणवीर, प्रियांका – निक, ईशा – आनंद आणि आता सायना – पारूपल्लि सगळेच लागोपाठ विवाहबद्ध झाले आहेत. इतकंच नाही तर कॉमेडियन कपिल शर्मा आणि गिन्नी छतरथ यांनीदेखील नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. आपल्या लग्नाचं आमंत्रण देत असताना सायना आणि पारूपल्लि या दोघांनीही फोटो आपल्या इन्स्टाग्रामवरून शेअर केले होते. मात्र हे लग्न जास्त गाजावाजा न करता पार पाडलं. हैदराबादमध्ये झालेल्या या लग्नामध्ये साऊथमधील बऱ्याच लोकांना आमंत्रित करण्यात आलं होतं. आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करून दोघांनीही 10 वर्षांच्या नात्यानंतर आता लग्न केलं आहे.

सायना आणि कश्यप दोघेही यशाच्या शिखरावर

सायना नेहवालने नुकतंच 2018 मध्ये कॉमनवेल्थ गेममध्ये सिंगल्समध्ये सुवर्णपदक मिळवलं. तसंच तिच्या नावे 20 महत्त्वाची टायटल्स आहेत, ज्यामध्ये ऑल्पिम्पिकमध्ये कांस्यपदक आणि वर्ल्ड चॅम्पयनशिपमध्ये रजतपदक आपल्या नावे केलेलं आहे. तर कश्यप सध्या जागतिक क्रमवारीमध्ये 6 व्या क्रमांकावर आहे. सायना आणि कश्यप यांचं नातं हे सर्वांसाठीच धक्का होता. कारण इतके वर्ष नात्यात असूनही दोघांनीही कधीही आपल्या नात्याबद्दल कोणालाही कळू दिलेलं नाही आणि आपल्याला आयुष्यात नक्की काय मिळवायचं आहे या ध्येयाकडे लक्ष देत भारतासाठी अनेक पदकं आणली.

फोटो सौजन्य – Instagram

Read More From लग्नसराई