Festival

शीतल महाजनचं इजिप्तमध्ये ‘जय भवानी, जय शिवाजी’

Dipali Naphade  |  Feb 20, 2019
शीतल महाजनचं इजिप्तमध्ये ‘जय भवानी, जय शिवाजी’

शिवाजी महाराज हा प्रत्येक मराठी माणसाचा अभिमान आहे. हाच अभिमान जपत महाराष्ट्राची कन्या शीतल महाजनने शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी ‘जय भवानी, जय शिवाजी’ म्हणत इजिप्तमधील कैरोमध्ये नऊवारी साडी नेसून स्कायडायव्हिंग केलं आहे. शीतल महाजनने याआधी स्कायडायव्हिंगमध्ये महाराष्ट्राचं नाव केलं आहे. आता पुन्हा एकदा शीतलनं महाराजांच्या जयंतीच्या दिवशी अर्थात मंगळवारी महाराजांना अभिवादन करत मानाचा झेंडा इजिप्तमध्ये फडकवला आहे. त्याआधी आदल्या दिवशी इजिप्तमध्ये तिने सरावही केला होता. शीतलने आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी स्कायडायव्हिंग केलं आहे. दोन्ही ध्रुवावर पॅराशूट जम्पिंग करणाऱ्यांमध्ये शीतल महाजनचं नाव आहे. शीतलने आतापर्यंत साधारण 500 पेक्षा अधिकवेळा पॅराजम्पिंग केलं असून तिला इजिप्तमधील पिरॅमिडजवळ स्कायडायव्हिंग करण्याचा मानही मिळाला आहे.

मंगळवारी शीतलने केले 15 हजार फूटावरून अभिवादन

शीतलने इजिप्तमधील स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 वाजता स्कायडायव्हिंग केले. हे स्कायडायव्हिंग करत असताना शीतलने नऊवारी साडी नेसली होती. नऊवारी साडी ही महाराष्ट्रीयन स्त्री साठी मान आणि शान असते. ही नऊवारी साडी नेसून शीतलने 15 हजार फूटावरून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करत मानाचा झेंडा फडकवला आणि नंतर तिने पिरॅमिडच्या पायथ्याजवळ लँडिंग केलं. तिच्यासोबत यावेळी जगभरातून 35 देशांमधून 156 स्कायडायवरदेखील आले होते आणि त्यांनीदेखील यावेळी स्कायडायव्हिंग केलं. या डायव्हिंगसाठी शीतल गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून मेहनत घेत होती. पहिल्यांदा ही उडी 14 ते 16 फेब्रुवारीदरम्यान घ्यायची असं ठरवण्यात आलं होतं. पण त्यावेळी वातावरण स्कायडायव्हिंगसाठी अनुकूल नव्हतं. तर एक योगायोग जुळून येत महाराजांच्या जयंतीच्या दिवशी तिचं हे स्वप्नं पूर्ण झालं असं शीतल महाजनने सांगितलं आहे.

ताजजवळही करायचं आहे स्कायडायव्हिंग

शीतलने सात आश्चर्यांपैकी एक असणाऱ्या इजिप्तजवळ तर स्कायडायव्हिंगचं स्वप्नं पूर्ण केलं आहे आता तिला भारतातील एक आश्चर्य असणाऱ्या ताजमहालजवळदेखील स्कायडायव्हिंग करायचं आहे. यासाठी ती सध्या सरकारकडून येणाऱ्या परवानगीची वाट पाहत आहे.

शिवरायांना वंदन केल्यावर इजिप्शियन वेषात केलं स्कायडायव्हिंग

शिवरायांना वंदन केल्यानंतर शीतलनं पुन्हा एकदा इजिप्शियन वेषातही आपल्या सहकाऱ्यांबरोबर  स्कायडायव्हिंग केलं. इजिप्तमध्ये पर्यटनाला चालना मिळावी यासाठी या स्कायडायव्हिंगचं आयोजन करण्यात आलं होतं अशी माहिती मिळाली आहे. शिवाय हा स्कायडायव्हिंगचा संपूर्ण कार्यक्रम इजिप्त सरकार आणि लष्कराच्या मदतीने आयोजित करण्यात आला होता. हा महाराष्ट्रासाठीदेखील अविस्मरणीय क्षण आणि मराठीपणा जपण्याचा क्षण असल्याचं सांगण्यात आलं आहे. नऊवारी नेसून इतक्या उंचावरून उडी मारणं हे अतिशय धाडसाचं काम असून शीतल महाजननं ते करून दाखवलं आहे. शीतलचं सध्या सर्वच स्तरातून कौतुकही होत आहे. आता शीतल पुन्हा नव्या कोणत्या स्थळावरून उडी मारून कोणता नवा विक्रम करणार याकडे नक्कीच सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

हेदेखील वाचा –

मोठ्या सुट्टीत फिरायला जायचंय तर मग जाणून घ्या भारतातील ‘अप्रतिम’ 5 ठिकाणं

‘जजमेंट’मध्ये दिसणार चॉकलेट बॉय प्रतीक देशमुखचं वेगळं रूप

‘Wedding चा शिनेमा’ चं टीझर प्रदर्शित

 

Read More From Festival