फॅशन

ग्लॅमरस आणि स्टायलिश कॉमेडी क्वीन श्रेया बुगडेचा ‘फॅशन फंडा’

Trupti Paradkar  |  Jan 17, 2019
ग्लॅमरस आणि स्टायलिश कॉमेडी क्वीन श्रेया बुगडेचा ‘फॅशन फंडा’

सतत हसतमुख असलेली आणि इतरांना पोट धरुन हसायला लावणारी अभिनेत्री श्रेया बुगडे ‘कॉमेडी क्वीन’ म्हणून प्रसिद्ध आहे. ‘चला हवा येऊ द्या’ या कॉमेडी शोमधून श्रेयाला एक नवी ओळख मिळाली. अगदी थोड्या कालावधीतच श्रेयाने तिच्या सक्षम अभिनयाने सिनेसृष्टीत स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. चला हवा येऊ द्या मध्ये रंगवलेल्या विविध पात्रातून तिची बहुरुपं आपण नेहमीच पाहतो. मात्र खऱ्या खुऱ्या आयुष्यातदेखील श्रेयाचं व्यक्तिमत्व असंच जिंदादिल आणि हरहुन्नरी आहे. वैविध्यपूर्ण अभिनयासोबतच श्रेयाचा फॅशन सेन्सदेखील सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. अनेक तरुण मुलं-मुली श्रेयाला इन्स्टावरुन फॉलो करतात. तिला सतत बदलत्या ट्रेंडविषयी प्रश्न विचारतात. श्रेया नेहमी अगदी हटके लुकमधून विविध कार्यक्रमात आणि सोशल मीडियावरुन दिसत असते. ‘उज्वल तारा’ या प्रसिद्ध हॅंडलूम ब्रॅंडचीदेखील ती ब्रॅंड अॅंबेसिडरदेखील आहे. नुकतंच या नवीनवीन आणि ट्रेंडी लुकमागचं गुपित श्रेयाने POPxo Marathi सोबत शेअर केलं.

जाणून घ्या श्रेयाच्या ट्रेंडी फॅशन सेन्समागचं गुपित काय

श्रेयाला फॅशन सेन्स तिला तिच्या आईकडून वारसा हक्काने मिळाला आहे. श्रेयाच्या आईचं लहानपण अलिबागमध्ये गेलं. पण छोट्या शहरात रहात असूनही लहानपणापासूनच तिची आई अगदी स्टायलिश रहायची. त्या काळातील हिरॉईनचे फोटो तिची आई तिच्या बहिणीकडे पुण्याला पाठवून अगदी हुबेहुब कपडे शिवून घ्यायची. थोडक्यात श्रेया तिच्या फॅशनेबल आणि ट्रेंडी राहण्याचं सारं श्रेय तिच्या आईला देते. आजही श्रेया तिच्या आईनेच डिझाईन केलेले कपडे घालते. जर काही कारणाने आई जवळ नसेल अथवा बाहेरगावी गेली असेल तर श्रेया आईला फोटो पाठवून आईचा सल्ला घेते. अनेकदा तर ती आईच्या घरातूनच तयारी करुन कार्यक्रमांसाठी जाते.

आईबाबत सांगताना… श्रेयाने एक खास किस्सादेखील शेअर केला. कॉलेजमध्ये असताना श्रेयाच्या एका मैत्रिणीला फॅशन डिझायनिंगसाठी एक प्रोजेक्ट करायचा होता. विविध प्रांतातील साड्यांचं फोटोशूट या प्रोजेक्टसाठी हवं होतं. या प्रोजेक्टवर काम करण्यासाठी श्रेयाच्या आईने चक्क घरातील वॉर्डरोबमधून तीस ते पस्तीस विविध प्रकारच्या साड्या बाहेर काढल्या आणि या साड्यांची माहिती आणि फोटोशूटसाठीचा संंपूर्ण सेटअपच घरीच करुन दिला. श्रेयाची आई श्रेयाच्या बोल्ड आणि ब्युटीफुल लुकमागची खरी गुरू आहे.

Also Read Cover Up Tattoo Design In Marathi

फॅशनमध्ये श्रेयाला नेमकं काय जास्त आवडतं

प्रत्येक स्त्रीचं रुप साडीत अधिक खुलून येतं. श्रेया तर प्रचंड साडी प्रेमी आहे. श्रेयाला निरनिराळ्या पोताच्या साड्या नेसायला खूप आवडतात. एखादा सोशल कार्यक्रम असो किंवा एखादी पार्टी असो श्रेया साडी नेसण्यालाच प्रथम प्राधान्य देते. जर साडीचा लुक सतत होतोय असं वाटलं तरच ती काहीतरी वेगळं करण्यावर भर देते. साड्यांमध्ये ती नैसर्गिक कॉटन आणि प्युअर सिल्क साड्यांची विशेष चाहती आहे. साड्या आणि त्यावरचे ट्रेंडींग ब्लाऊज यामध्ये सतत नवनवीन प्रयोग करायला तिला आवडतात. तिच्या मते पूर्वी पारंपरिक साड्यांसोबत जी फॅशन कॅरी केली जायची ती आता केली जात नाही. सिल्कसोबतच सध्या कॅज्युअल लुकच्या साड्यांची जास्त फॅशन आहे. आजकाल कॉटन आणि लीनन साड्यांवर तुम्ही शूजदेखील कॅरी करू शकता. शिवाय पूर्वीप्रमाणे मॅचिंग ब्लाऊज घालण्यापेक्षा कॉन्ट्रास्ट कलर आणि स्टाईलिश डिझाईनचे ब्लाऊज सध्या फॅशनमध्ये आहेत.

फॅशनेबल कपड्यांसोबतच स्टायलिश अॅक्सेसरीची शॉपिंग ती कुठे करते

श्रेया सतत नवनवीन अॅक्सेसरीज खरेदी करत असते. श्रेयाचे फॅशनेबल ग्लासेस असो अथवा निरनिराळी घड्याळं…या अॅक्सेसरीजची चर्चा तिचे चाहते करत असतात. प्रत्येकवेळी काहीतरी नवीन गोष्ट वापरायला तिला आवडतं. श्रेयाच्या या ट्रेंडिग लुकचं गुपित दिल्लीमध्ये दडलं आहे. कारण श्रेया तिची बरीचशी शॉपिंग दिल्लीमध्ये करते. श्रेयाच्या मते दिल्ली फॅशन कॅपिटल आहे. दिल्लीमध्ये अनेक स्टायलिश गोष्टी मिळतात. एखादी फॅशन सर्वात आधी दिल्लीत येते. शूज, ज्वेलरी आणि इतर शॉपिंगसाठी श्रेयाला दिल्लीत जायला आवडतं. या मागचं आणखी एक कारण म्हणजे श्रेयाची बहीण दिल्लीत राहते. बहिणीकडे जाताना ती एक मोठी रिकामी बॅग शॉपिंगसाठी घेऊन जाते येताना मात्र बॅगेत मावणार नाही इतकी शॉपिंग करुन येते.

श्रेयाचं शॉपिंग वेड

‘चला हवा येऊ द्या’च्या विश्वदौऱ्याच्या शूटिंगदरम्यान परदेशात असताना श्रेयाने इतकी शॉपिंग केली होती की तिच्या बॅगेत त्या वस्तू ठेवण्यासाठी जागाच शिल्लक नव्हती. अशावेळी ती तिच्यासोबत असलेल्या इतर कलाकारांना बॅगेत तिचं सामान ठेवण्यासाठी विनवणी करत फिरते इतकी ती ‘शॉपिंगवेडी’ आहे. श्रेयाला जर कधी कंटाळा आला किंवा थोडं उदास वाटत असेल तर ती विंडो शॉपिंगला जाते. खरंतर विंडो शॉपिगसाठी बाहेर पडल्यावर शेवटी शॉपिंग करुनच घरी येते. कंटाळा आल्यावर काहीजणांना विरंगुळा म्हणून वाचन करायला आवडतं, एखाद्याला घरातच टीव्ही पाहत आराम करायला आवडत असतं पण श्रेया विरंगुळा म्हणूनदेखील फक्त शॉपिंगच करते.

श्रेया सतत शॉपिंग करण्यासाठी बजेटचं नियोजन कसं करते

श्रेयाच्या मते सुंदर दिसण्यासाठी फार खर्च करण्याची मुळीच गरज नाही. कारण अगदी पंधराशे रुपयांची साडीदेखील तुम्हाला पंधरा हजारांच्या साडीचा लुक देऊ शकते. कारण तुम्ही ती कशी कॅरी करता यावर सारं काही अवलंबून आहे. श्रेया सांगते की तुम्ही कमीतकमी पैशांमध्येदेखील अगदी उत्तम शॉपिंग नक्कीच करू शकता.

श्रेया जेव्हा छान तयार होते तेव्हा तिला अख्खं जग खूप सुंदर आहे असं वाटतं. कारण अशा आनंदी भावनेतून काम करण्याचा उत्साहदेखील वाढतो. जेव्हा माणूस चांगल्या मनस्थितीत असतो तेव्हा त्याच्याकडून चांगलंच काम होतं असा तिचा विश्वास आहे. तिच्या मते तुम्ही कसे कपडे घालता यापेक्षा तुमचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा आहे हे फार महत्वाचं आहे. सकारात्मक दृष्टीकोन असेल तर सर्व गोष्टी आपोआप चांगल्या घडतात.

श्रेयाचे टॅटू प्रेम

श्रेया बुगडेचे टॅटूदेखील तिच्या प्रसन्न व्यक्तिमत्वाचं दर्शन घडवतात. काही महिन्यांपूर्वी तिने हातावर गोंदवलेल्या एका टॅटूची तर फार चर्चा झाली होती. श्रेयाने इक्विलिब्रियम टॅटू हातावर गोंदवला आहे. हा टॅटू तिच्या जीवनातील उत्तम समतोल दर्शवतो तर मानेवरील दुर्गा मातेचा टॅटू तिच्यातील सळसळत्या उर्जेचं प्रतिनिधित्व करतो. शिवाय तिच्या बहिणीच्या मुलाचं म्हणजेच भाच्याचं ‘आराध्य’ असं नावही तिने एका हातावर कोरलं आहे. 

उत्तम दिसण्यासाठी नव्या पिढीला श्रेयाचा सल्ला

प्रत्येकाच्या आयुष्यात सतत काहीतरी नवीन घडत असतं. एखादा दिवस चांगला असतो, एखादा दिवस साधारण असतो तर कधीकधी थेट संकटांचा सामनादेखील करावा लागतो. असं काहीही असलं तरी जर दिवसाची सुरुवात आनंदी मनाने आणि उत्साहात केली तर कोणताही दिवस जगण्याची ऊर्मी देणारा ठरतो. मनातून आनंदी असण्यासाठी शॉपिंग करा आणि मस्तपणे जगा असा सल्ला श्रेया देते.

फॅशनबाबत श्रेया ज्यातून तुम्हाला आरामदायक वाटेल अशीच फॅशन कॅरी करा असं सांगते. जर तुम्ही हाय हील्समध्ये कम्फर्टेबल नसाल तर उगाच फॅशन म्हणून हाय हील्स घालू नका. कारण त्यामुळे तुम्ही दिवसभर वैतागलेल्या राहाल. तुम्हाला जे आवडतं आणि ज्यामध्ये तुम्हाला आरामदायक वाटतं अशी कोणतीही फॅशन करा कारण शेवटी त्यातून मन आनंदी असणं हे जास्त महत्वाचं आहे.

श्रेयाला घरदेखील सजवायला फार आवडतं

श्रेयाला घरातही नवनवीन बदल करायला फार आवडतात. एखाद्या हॅंडलूम प्रदर्शनात गेल्यावर ती स्वतःसाठी तर भरपूर खरेदी करतेच शिवाय तिला घर सजवण्यासाठी सतत काहीतरी नवीन विकत घ्यायला आवडतं. घरात सकारात्मक वातावरण निर्माण होण्यासाठी घरात ट्रेंडनुसार बदल करणं आवश्यक आहे असं तिचं मत आहे.

अधिक वाचा:

पहा.. साडी किंवा पार्टी ड्रेससाठी टॉप 10 ट्रेंडी स्टायलिश ब्लाऊज बॅक डिझाईन्स

लग्नात साडीला देऊया डिफरंट लुक, हटके स्टाईल

हे ‘30’ ग्लॅमरस आणि हटके पंजाबी सूट तुम्हाला नक्कीच आवडतील

फोटोसौजन्य- इन्स्टाग्राम

Read More From फॅशन