त्वचेची काळजी

चेहरा स्वच्छ करताना पाळा हे नियम, त्वचेच्या समस्या होतील दूर

Trupti Paradkar  |  Jun 16, 2021
चेहरा स्वच्छ करताना पाळा हे नियम, त्वचेच्या समस्या होतील दूर

दिवसभरात दोन ते तीन वेळा चेहरा स्वच्छ केल्यामुळे चेहऱ्यावरील धुळ, माती, प्रदूषण, मेकअपचे कण निघून जातात. चेहरा धुणे म्हणजे चेहऱ्याला फेस वॉश लावायचा आणि पाण्याने तो स्वच्छ करायचा इतकंच असं अनेकींना वाटत  असतं. मात्र चेहऱ्याची निगा राखण्यासाठी हे पुरेसं नाही. कारण जर तुम्हाला चेहरा धुताना  काही नियम माहीत नसतील तर तुमची त्वचा स्वच्छ होण्याऐवजी तुम्ही त्वचेचे नुकसानच जास्त करून घ्याल. यासाठी चेहरा स्वच्छ करताना अथवा चेहरा धुताना काही नियम आपण पाळायला हवेत. ज्यामुळे तुमची त्वचा स्वच्छ होईल आणि त्वचेच्या  समस्याही दूर होतील.

चेहरा धुण्याबाबत काही नियम

चेहरा क्लीन करताना अथवा धुताना बेसिक गोष्टी तुम्हाला माहीत असतील तर तुमच्या त्वचेच्या समस्या नक्कीच दूर होतील.

गरम पाण्याचा वापर करू नका

फेस क्लिंझर, फेस वॉश अथवा फेस पॅक लावल्यावर तो स्वच्छ करण्यासाठी बऱ्याचदा गरम पाण्याचा वापर केला जातो. मात्र चेहरा धुण्यासाठी गरम पाणी वापरणं त्वचेसाठी मुळीच योग्य नाही.  कारण शरीरातील इतर भागांपेक्षा तुमच्या चेहऱ्याची त्वचा खूप नाजूक असते. गरम पाण्यामुळे तुमच्या त्वचेचे पोअर्स मोकळे होतात पण त्यानंतर त्वचा कोरडी आणि राठ होते. यासाठीच जरी तुमची त्वचा तेलकट असली तरी चेहऱ्यासाठी गरम पाणी वापरू नका. लक्षात ठेवा साधे पाणी अथवा कोमट पाणी त्वचेसाठी योग्य असते. 

योग्य प्रॉडक्ट वापरा

त्वचा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही क्लिंझर अथवा  फेस वॉश वापरता. बाजारात चेहरा क्लीन करण्यासाठी विविध प्रकारचे प्रॉडक्ट मिळतात. मात्र कोणते प्रॉडक्ट वापरावे हे तुम्हालाच ठरवावे लागते. जर तु्म्ही चुकीचे प्रॉडक्ट वापरले तर त्वचेचे नुकसान होऊ शकते. यासाठी तुमच्या  त्वचेचा प्रकार कोणता आहे, प्रॉडक्टवर काय माहिती दिली आहे, कोणत्या त्वचेसाठी कोणते प्रॉडक्ट वापरावे, प्रॉडक्टमध्ये वापरण्यात येणारे घटक या सर्वांची माहिती तुम्हाला असायला हवी. 

दिवसभरात किती वेळा चेहरा स्वच्छ करावा

चेहरा धुण्याबाबत हा नियम अतिशय महत्त्वाचा आहे. कारण चेहरा कधी आणि कितीवेळा धुवावा यावर तुमची त्वचा किती निरोगी राहणार हे अवलंबून आहे. साधारणपणे रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यावर असं दिवसातून दोन वेळा चेहरा धुणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त गरज लागल्यास एक दोन वेळा तुम्ही चेहरा दिवसभरात धुवू शकता. मात्र सतत चेहरा धुवू नका कारण यामुळे तुमच्या त्वचेत कोरडेपणा वाढेल.

मेकअप काढताना काय काळजी घ्यावी

मेकअप ही आता काळाची गरज झाली आहे. त्यामुळे सणसमारंभ, कार्यक्रमच नाही तर दररोज तुम्ही मेकअप करू शकता. काजळ, आयलायनर, लिपस्टिक, कॉम्पॅक्ट अशा गोष्टी तुम्ही दररोज वापरता. मात्र मेकअप काढताना यासाठी तुम्ही जर चांगलं मेकअप रिमूव्हर वापरलं नाही तर मेकअपचे कण त्वचेत तसेच राहतात आणि त्वचेचं नुकसान करतात. यासाठी तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार मेकअप रिमूव्हर निवडा.

चेहरा धुण्याची पद्धत

चेहरा कितीवेळा आणि कशाने धुता याप्रमाणेच महत्त्वाचं आहे चेहरा तुम्ही कसा धुता. कारण साधारणपणे दहा  ते वीस सेंकदात आपण चेहरा धुतो. मात्र तज्ञ्जांच्या मते चेहरा कमीत कमी एक मिनीट धुणं गरजेचं आहे. कारण असं केलं नाही तर तुम्ही वापरत असलेले प्रॉडक्ट तुमच्या त्वचेमध्ये मुरणार नाहीत आणि तुम्हाला त्याचा हवा तसा परिणाम मिळणार नाही.

आम्ही शेअर केलेल्या या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आणि तुम्हाला त्याचा काय फायदा झाला हे आम्हाला जरूर कळवा. 

फोटोसौजन्य –

अधिक वाचा –

केस धुताना करू नका या ‘7’ चुका

आयब्रोजचा असा मेकअप केला तर चेहरा दिसेल आकर्षक

नारळपाण्याने चेहरा धुवा आणि त्वचेच्या समस्यांपासून मुक्त व्हा

Read More From त्वचेची काळजी