हिंदू कॅलेंडरप्रमाणे दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्ष चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. तर अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाचं विसर्जन केलं जातं. यंदा अनंत चतुर्दशी 19 सप्टेंबरला आली आहे. ज्या दिवशी 10 दिवसाच्या आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतींचे मोठ्या प्रमाणावर विसर्जन केले जाते. साहजिकच बाप्पाच्या विसर्जनाने तुम्ही दुःखी झाल्यास बाप्पा विसर्जन कोट्स सोशल मीडियावर शेअर केले जातातच. कारण सलग 10 दिवस बाप्पांच्या भक्तीरसात भक्त रंगून गेल्याचं चित्र देशभरातच नाहीतर परदेशातही पाहायला मिळतं. कोरोनामुळे मागच्या वर्षी आणि या वर्षीही काही प्रमाणात गणेशोत्सवाच्या साजरा करण्यावर झालेला परिणाम पाहायला मिळाला. पण तरीही घरोघरी आणि गल्लोगल्ली बाप्पाचं आगमन झालं. देशभरात कोरोना नियमाचं पालन करून हा सण भक्तांनी साजरा केला. आता श्री गणेश मूर्तीचं अनंत चतुर्दशीला पाण्यामध्ये विसर्जन करण्यात येईल.
बाप्पाचं विसर्जन का करण्यात येतं?
जाणकाराचं म्हणणं आहे की, विसर्जन या शब्दाचा संस्कृत अर्थ असा आहे की, पाण्यात विलीन होणं आणि ही सन्मान-सूचक प्रक्रिया आहे. जेव्हा आपण घरात कोणत्याही देवाच्या मूर्तीची पूजा करतो आणि त्यानंतर तिचं विसर्जन करून सन्मान दिला जातो. गणपती बाप्पाचं विसर्जनही अगदीच तसंच केलं जातं जसं त्यांचं आपल्या घरी वाजतगाजत आगमन होतं. छानपैकी मिरवणूक काढून लोकं बाप्पाला घरी किंवा मंडळांमध्ये आणून त्याची पूजा करतात. त्याचप्रमाणे बाप्पाचं विसर्जनही धूमधडाक्यात केलं जातं.
गणपती बाप्पाला जल तत्त्वाचा अधिपती म्हटलं जातं. अशावेळी अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान गणपतीची पूजा केल्यानंतर परत त्यांना पाण्यातच विसर्जित केलं जातं. याचाच अर्थ असा की, ते ज्याचे अधिपती आहेत तिथेच त्यांना पुन्हा पोचवण्यात येतं.
यावेळी आम्ही तुमच्यासाठी खास गणेश प्रतिमा विसर्जनाचा सोपा विधी याबाबत सांगणार आहोत.
गणेश विसर्जनाचा सोपा विधी –
- या विधीसाठी सर्वात आधी अनंत चतुर्दशीच्या दिवशी श्री गणेशाची विधीवत पूजा करून मग हवन करावा आणि नंतर श्री गणेशाचा स्वस्तिवाचन पाठ करावा. त्यानंतर एका लाकडाच्या स्वच्छ पाटावर स्वस्तिक चिन्ह काढावं. यानंतर त्यावर अक्षत वाहून पिवळ्या किंवा गुलाबी रंगाचं वस्त्र घालावं. पूजेची सुपारी यावर ठेवावी. बाप्पाला पुनरागमनायच म्हणावं. यानंतर ज्या ठिकाणी बाप्पाची मूर्ती ठेवली होती ती बाप्पाच्या जयघोषात उचलून या पाटावर ठेवावी.
- आता बाप्पासमोर फुलं, फळ, वस्त्र आणि मोदक ठेवावे. मग पुन्हा एकदा बाप्पाची आरती करावी, नेवैद्य दाखवावा आणि नवीन वस्त्र घालावी. सोबतच रेशमी वस्त्रांमध्ये फळ, फुल, मोदक, सुपारी यांची शिदोरी बांधून बाप्पासोबत ठेवावी.
- आता दोन्ही हात जोडून श्री गणेशाची प्रार्थना करावी. सोबतच 10 दिवसांच्या पूजेदरम्यान अजाणतेपणी काही चूक झाली असल्यास त्यासाठी क्षमा मागावी. डोक्यावर टोपी घालावी. बाप्पालाही कुंची घालावी. शक्य असल्यास विसर्जनाचा बाप्पा ज्याच्या हातात असतो त्याने अनवाणी निघावं. यानंतर पुन्हा जयजयकाराच्या घोषात बाप्पा मोरया म्हणत बाप्पाला पाटासह उचलून डोक्यावर किंवा हातात घेऊन विसर्जनासाठी निघावं.
शक्य असल्यास वाहत्या आणि स्वच्छ पाण्यात बाप्पांच्या मूर्तीच विसर्जन करावं.
- लक्षात घ्या विसर्जनादरम्यान या गोष्टींची काळजी घ्या की, प्रत्येक गोष्टीचं सन्मानपूर्वक विसर्जन करा म्हणजेच कोणतीही गोष्ट फेकू नका. तसंच विसर्जनावेळी कापूर आरती नक्की करा. यानंतर गणपती बाप्पाला निरोप देताना त्याच्यापुढे दोन्ही हात जोडून क्षमा मागा आणि पुढच्या वर्षी यायचं निवेदन करा आणि घरी या.
- जर तुम्ही घरच्याघरी टब किंवा कृत्रिम तलावात मूर्तीचं विसर्जन करणार असाल तरीही ही पूर्ण प्रक्रिया करा आणि निर्माल्य एका जागी एकत्रित करून योग्य जागी विसर्जन करा. घरामध्ये मूर्ती विसर्जन केल्यावर ते पाणी आणि माती घरच्या कुड्यांमध्ये किंवा बागेत टाका.
मग वर सांगितल्याप्रमाणे बाप्पाचं विधीपूर्वक विसर्जन नक्की करा. पण बाप्पाला जास्त मिस करू नका. कारण गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या.
फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम