आपल्या वैविध्यपूर्ण सशक्त स्त्री भूमिकांनी आजवर सिनेसृष्टीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलेली अभिनेत्री स्मिता तांबे तिच्या आगामी सिनेमात पहिल्यांदाच एका पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे.
या पहिल्यावहिल्या पोलिसाच्या भूमिकेसाठी स्मिता तांबेने खूप तयारी केली आहे. सौरभ सिन्हा दिग्दर्शित सावट चित्रपटांमध्ये अभिनेत्री स्मिता तांबे एका इन्व्हेस्टीगेटीव्ह ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे.
आपल्या भूमिकेविषयी सांगताना अभिनेत्री स्मिता तांबे म्हणाली की, “आजवर मराठी-हिंदी सिनेमांमधून अनेक अभिनेत्रींनी पोलिसी खाक्याच्या भूमिका साकारल्या. त्यामुळे अशा भूमिका आपल्याला नवीन नाहीत. म्हणूनच माझ्या आगामी आदिती देशमुखच्या भूमिकेत काहीतरी नाविन्य आणण्याची जबाबदारी माझ्यावर होती. भूमिकेचा अभ्यास करताना मला लक्षात आलं. आदितीची निरीक्षण क्षमता खूप चांगली आहे. ती शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करून गुन्हे सोडवणारी ऑफिसर आहे. आपल्या गतकाळातल्या अनुभवांनंतर ती थोडीशी रागीट आणि आक्रमक आहे. मग तिच्या शारीरीक अभिनयावर काम करणं जरूरी होतं.
एवढंच नाहीतर तिने या भूमिकेसाठी आपल्या केसांनाही कात्री लावलीयं. याबाबत तिने सांगितलं की, ‘ती साध्या वेशातली पोलिस आहे. त्यामुळे मग ती वेस्टर्न कपडे घालताना पँट कोणत्या आकाराच्या वापरेल. तिचा बसण्या-उठण्यात, चालण्यात-बोलण्यात कसा अॅटिट्यूड असेल यावर मी संशोधन केलं. तिचे शूज कसे असतील यावरही विचार केला. कामात व्यग्र असलेल्या आदितीला तयार व्हायला कमीत कमी वेळ लागेल, मग कपडेही तसेच असायला हवे होते. तसेच तिला केस विंचरायलाही जास्त वेळ लागायला नको. म्हणून मग मी हेअरकट केला. केस-स्टडी चालू असताना तिची हातावर लिहायची स्टाइल डेव्हलप केली. तिचं वागणे मॅस्क्युलीन असेल, यावर भर दिला.”
सावट हा सिनेमा सुपरनॅचरल थ्रिलर आहे. श्रावण महिन्यातल्या एका ठराविक रात्री एका गावात दरवर्षी एक आत्महत्या होते. सात वर्षात सात आत्महत्या झालेल्या या गावात इन्व्हेस्टीगेटीव्ह ऑफिसर आदिती देशमुख आत्महत्यांचा तपास करायला येते आणि मग काय घडतं ते सिनेमात पाहायला मिळतं.
‘निरक्ष फिल्म्स’च्या सहयोगाने ‘लेटरल वर्क्स प्रा.लि.’ आणि ‘रिंगीग रेन फिल्म्स’च्या सावट चित्रपटाचे दिग्दर्शन सौरभ सिन्हा यांनी केलं आहे. हितेशा देशपांडे, स्मिता तांबे आणि शोभिता मांगलिक यांची निर्मिती असलेल्या ‘सावट’ चित्रपटात श्वेतांबरी, मिलिंद शिरोळे, संजीवनी जाधव आणि स्मिता तांबे मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट २२ मार्च २०१९ ला संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे.
हेही वाचा –
‘सावट’ चित्रपटाचं चित्तथरारक टीझर प्रदर्शित
Read More From लाईफस्टाईल
Diwali Padwa Wishes, Quotes, Messages In Marathi 2022 | दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा
Dipali Naphade