Diet

काय आहे स्पृहा जोशीचा डाएट फंडा

Aaditi Datar  |  Dec 10, 2018
काय आहे स्पृहा जोशीचा डाएट फंडा

मी स्पृहा जोशी तुमचं हार्दीक स्वागत करते.. आपल्या झगमगत्या,खळखळत्या, उत्साहाने सळसळत्या संगीत मैफलीत… असं दर आठवड्याला ‘सूर नवा ध्यास नवा’ च्या प्रत्येक एपिसोडमध्ये आपलं मनापासून स्वागत करणारं घराघरातलं आवडतं व्यक्तीमत्व म्हणजे स्पृहा जोशी. स्पृहा जोशी ही मराठी इंडस्ट्रीतलं प्रसिद्ध व्यक्तीमत्व आहे. पण तरीही ती सेलिब्रिटी न वाटता आपल्या घरातीलच एक सदस्य वाटते. इतक्या सहजपणे तिने प्रेक्षकांचं मन जिंकलंय. मग ते अभिनेत्री म्हणून असो, कवियित्री म्हणून असो वा निवेदिका म्हणून असो. स्पृहाने बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरूवात केली. मराठी सिरियल, नाटक आणि चित्रपटात तिने चांगलाच ठसा उमटवला आहे. यासोबतच ती एक उत्तम कवियित्रीसुद्धा आहे. हे आपल्या सर्वांनाचं माहीत आहे. पण यावेळी कोणत्याही चित्रपटाविषयी, आगामी नाटक किंवा नवीन कवितासंग्रह याबद्दल तिच्याशी गप्पा न मारता, आम्ही तिच्या ऑलवेज फ्रेश दिसणाऱ्या चेहऱ्याबद्दल आणि डाएटबद्दल गप्पा मारल्या.

स्पृहाचं नाव घेताच सर्वात आधी आठवतं ते तिचं गोड हास्य. तिचं सुंदर आणि निरागस व्यक्तीमत्व आपल्याला सहजपणे आपलंस वाटतं.तिच्या चेहऱ्यावरचं हास्य दर आठवड्याला अधिकच छान वाटतं. अगदी कोणताही लुक असो साडी किंवा गाऊन. स्पृहा अगदी सहजपणे तो कॅरी करते. पण हे हास्य आणि सुंदर लुक मेंटेन करणं तेवढं सोप्प नाही. या पाठीमागे आहे भरपूर मेहनत, खास असं डाएट आणि जोडीला वर्कआउटसुद्धा. मग तुम्हालाही स्पृहासारखं छान आणि मेन्टेन राहायचंय का? असं कोणालाही वाटणं साहजिक आहे. म्हणूनच आम्ही खास स्पृहाशी गप्पा मारल्या आणि जाणून घेतलं तिच्या फिट अॅंड फाईन हेल्थचं रहस्य.

कसं आहे स्पृहाचं डाएट (Diet regime of Spruha)

मी कोणतंही स्ट्रीक्ट डाएट फॉलो करता येत नाही. त्यामुळे मला सोपं आणि सहज जमेल असं  डाएट मी फॉलो करते. जेव्हा घरी असते तेव्हा जास्तीत जास्त घरी बनवलेले पदार्थ खाण्याचा प्रयत्न करते. कारण जेव्हा आम्ही शूटवर असतो किंवा बाहेरगावी शूटींगच्या निमित्ताने जातो. तेव्हा बाहेरचं खाण्याशिवाय पर्याय नसतो. त्यात स्वतः खूप मेजर फूडी आहे. त्यामुळे डाएट फॉलो करणं माझ्यासाठी जरा कठीणंच आहे.  

सकाळी उठल्या उठल्या

माझं सकाळी उठल्यावर एक फिक्स रूटीन आहे. सकाळी उठल्या उठल्या मी कपभर पाण्यात आलं आणि दालचिनी घालून ते उकळते आणि चहाऐवजी तेच घेते. चहा घेत नाही. शक्यतो चहा घेणं टाळते. त्यानंतर चिमूटभर हळद आणि मधाचं चाटण घेतं.

स्पृहाचा नाश्ता आणि दिवसभराचं डाएट

खरंतर आपला मराठी नाश्ता हा सर्वप्रकारे परिपूर्ण आहे. त्यामुळे सकाळी घरी बनवलेला कोणताही नाश्ता म्हणजे  वाटीभर उपमा किंवा पोहे, एखादं धीरडं किंवा घावनं असा नाश्ता करते. नंतर एखादं सिझनल फळ खाते. दुपारच्या जेवणात भाकरी किंवा ब्राऊन राईस, एक मोठी वाटी भाजी आणि सॅलड खाते. जेवताना मी गव्हाची पोळी  खात नाही. शक्यतो गव्हापासून बनवलेले पदार्थ टाळते. पण जर शूटवर असेन आणि पर्याय नसेल तर साधी रोटी खाते. साधारण चार वाजता ग्रीन टी घेते.संध्याकाळी सात साडेसातच्या दरम्यान हलकाफुलका नाश्ता जसं ज्वारीच्या लाह्या मखाणा किंवा सुकामेवा त्यातही मनुका, बेदाणे नाही तर दोन बदाम किंवा अक्रोड असं खाते. रात्री शक्यतो सूप किंवा सलाड, व्हाइट एग असा आहार घेते. जितकं शक्य असेल तेवढं कडक डाएट फॉलो करण्याचा माझा प्रयत्न असतो.

स्पृहाचा चीट डे आणि वीकनेस  

आठवडाभर कडक डाएट फॉलो केल्यावर वीकेंडला मात्र स्पृहातला फूडी फॅक्टर जागा होतो.  ‘आठवडाभर डाएट फॉलो केल्यावर वीकेंडला मात्र माझा चीट डे असतो. कारण मी अतिशय फूडी आहे. मला सगळ्या प्रकारचं जंक फूड आवडतं. जे टीपिकल अरबट चरबट असतं ना ते सगळं. समोसा, वडा इ. तरीही समोसा खायची इच्छा झाली की हा विचार मनात येतोच की, एक समोसा खाल्ल्यावर किती वजन वाढेल.

डाएटचा न आवडणारा नियम

जसं मी म्हटलं की, मी खूप फूडी आहे आणि मला बाहेरचं अरबट चरबट खायला फारच आवडतं. ते डाएट असल्यावर खाता येत नाही. हा नियम मला अजिबात आवडत नाही.

स्पृहाच्या फ्रेश चेहऱ्यामागचं रहस्य

मला, मी जे काम करते ते मनापासून आवडतं. त्यामुळे चेहरा ही आनंदी दिसतो. तसंच तुम्ही जर चांगल खाल्लं तर त्याचा ही तुमच्या संपूर्ण व्यक्तीमत्वावर प्रभाव पडतो. मुख्य म्हणजे तुम्ही जर आयुष्याबाबत पॉझिटीव्ह असाल तर ते तुमच्या चेहऱ्यावरून ही झळकतं.

स्पृहाचं वर्कआऊट

मला जास्त वर्कआऊट करायला जमत नाही. त्यामुळे जेव्हा शक्य असेल तेव्हा जिमला जाते. पण बरेचदा शूटमुळे नियमित जाण होत नाही  

स्पृहाचा फिटनेस रोल मॉडेल

नाही मी असं कोणालाही फॉलो किंवा रोल मॉडेल मानत नाही. कारण प्रत्येकाचं बॉडी टाईप आणि टेंम्परामेंट वेगळं असतं. मी माझ्यासाठी काय चांगलं आहे ते शोधलं पाहिजे. माझ्यासाठी जे सूटेबल आहे ते करायचा मी प्रयत्न करते. कोणत्याही बॉलीवूड स्टार्सना किंवा इतर सेलेबला फॉलो करत नाही. कारण प्रत्येकाचा बॉडी टाईप असतो.त्यामुळे सगळं त्यावर अवलंबून आहे.

स्पृहाला ट्राय करायचा आहे हा वर्कआऊट

मी लहानपणी मल्लखांब शिकले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मल्लखांब करायला आवडेल. बरेच दिवसापासून स्वीमिंग ही शिकायचं आहे. पण ते जमून येत नाहीये. मला बॅडमिंटन खेळायलाही खूप आवडतं.

वाचकांसाठी स्पृहाचा खास सल्ला

वाचकांना मी हेच सांगेन की, बारीक होण्यासाठी म्हणून डाएट करू नका. हेल्दी आणि हॅपी राहा. जेवढे तुम्ही आनंदी असाल तेवढी तुम्ही हेल्दी राहाल. मनापासून डाएट करा. आपल्या शरीरावर जास्त अत्याचार करू नका. आपल्या घरात बनणारे पदार्थ हे पूर्णान्न असतं. त्यामुळे जास्तीतजास्त घरचं खायचा प्रयत्न करा. शेवटी कोणतं डाएट करायचं किंवा नाही करायचं हा प्रत्येकाचा चॉईस आहे. वर्कआऊटसाठी जिमला जायलाच हवं असं काही नाही. तुमच्या फीटनेससाठी जे आवश्यक आहे ते करा. ज्यांना जीमला जाणं परवडतं त्यांनी अगदी दंड बैठका किंवा घरच्या घरी योगा करूनही तुम्ही स्वतःला हेल्दी ठेवू शकता. त्यातही आजची जनरेशन जास्त जागरूक आहे.

फोटो सौजन्य : Spruha Joshi Instagram 

तुम्हाला कदाचित या गोष्टी आवडतील:

परफेक्ट फिगरसाठी करा ‘हा’ परफेक्ट डाएट आणि पाहा तुमच्यातील बदल

Read More From Diet