आरोग्य

शिळ्या पनीरने होऊ शकते नुकसान, असे ओळखा शिळे पनीर

Leenal Gawade  |  Jun 3, 2022
पनीर शिळे तर नाही ना

लुसलुशीत पनीर (Paneer) कोणाला आवडत नाही? जर काहीतरी वेगळे खायची इच्छा झाली तर अनेक जण घरात मस्त पनीरची भाजी करतात. प्रोटीन आणि अनेक गुणांनी युक्त असे प्रोटीन व्हेजिटेरिअन लोकांसाठी पूर्णान्न आहे. दुधापासून बनवले जाणारे पनीर घरीही तयार करता येते. पण बाजारात अगदी सहज मिळते. त्यामुळे खूप जण बाहेरुन पनीर विकत आणतात. पण बाहेरुन आणलेले पनीर ताजे आहे का? हे अनेकदा कळत नाही. जर पनीर ताजे नसेल तर असे पनीर आरोग्यास हानिकारक ठरु शकते. शिळे पनीर कसे ओळखायचे हे आज आपण जाणून घेऊया.

असे तयार होते पनीर 

दुधापासून पनीर तयार केले जाते. यासाठी दूध फाडले जाते. दूधात लिंबू किंवा सायट्रिक ॲसिड घातले जाते. त्यामुळे दूध फाटते. दूध फाटले की, एक पातळ फडताळ घेऊन त्यामध्ये दूध निथळत ठेवले जाते. त्यातून संपूर्ण पाणी काढले जाते. त्यानंतर ते चांगले नळाखाली धुवून मग ते घट्ट बांधून त्याचे पनीर तयार केले जाते. पनीर तयार करण्याची ही पद्धत सर्वसाधारणपणे सारखीच आहे. जे नॉनव्हेज खात नाही. त्यांच्यासाठी पनीर म्हणजे वरदान आहे. पनीरमध्ये शाकाहारी लोकांना चांगले प्रोटीन मिळते. पनीरपासून वेगवेगळ्या रेसिपी बनवल्या जातात. ज्या चविष्ट असतात.

असे ओळखा शिळे पनीर

शिळे पनीर चुकून आले असेल तर ते ओळखणे तसे सोपे आहे. तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने शिळे पनीर ओळखता येते. 

  1. पनीर खूपच शिळे झाले असेल तर त्याचा रंग बदलून जातो. त्याचा रंग हा पिवळसर होतो.
  2.  पनीर हे लुसलुशीत असायला हवे पण जर ते टणक झाले असेल तर असे पनीर शिळे आहे. (खूप जण असे पनीर कडक झाले असेल तर काही काळासाठी लुसलुशीत वाटावे म्हणून ते गरम पाण्यात घालून ठेवतात. तेवढ्या काही काळासाठी हे पनीर लुसलुशीत होते सुद्धा पण ते कशात घातल्यानंतर ते परत कडक होते. त्यामुळे जर तुम्ही असे पनीर विकत घेत असाल तर जपून राहा. 
  3. पनीर विकत घेताना तुम्ही थोडेसे पनीर खाऊन बघा. पनीरला तशी काही वेगळी चव नसते. पण साधारणपणे दुधासारखी चव यात यायला हवी. जर पनीर आंबट झाले असेल तर असे पनीर शक्यतो घेऊ नका. 
  4. घरात पनीर आणल्यानंतर जर पनीर तुम्ही लगेच वापरणार असाल तर ठीक अन्यथा एका डब्यात पाणी घेऊन पनीरचा तुकडा ठेवा पण तो एक ते दोन दिवसापर्यंत ठीक आहे तो जास्त काळासाठी ठेऊ नका. 
  5. पनीर शिळे झाले असेल तर त्याचा चुरा पडू लागतो. पनीर एकसंध राहात नाही. शिळे पनीर ओळखण्याची ही एक सोपी पद्धत आहे. 

शिळ्या पनीरने होऊ शकते नुकसान

शिळ्या पनीरचे सेवन केले तर ज्यांचे पोट किंवा पोटाचे आरोग्य अगदी संवेदनशील आहे. अशांना त्याचा त्रास लगेच होऊ शकतो. 

  1. शिळ्या पनीरचे सेवन केले तर पोट दुखी आणि शौचाला होण्याचा त्रास होऊ शकतो. 
  2. शिळ्या पनीरच्या सेवनामुळे पनीर न खाण्याची इच्छा निर्माण होऊ शकते. 
  3. शिळ्या पनीरच्या सेवनामुळे तोंडाची चव जाऊ शकते. 
  4. शिळ्या पनीरमुळे फुड पॉईजनिंग होण्याची शक्यता असते. उलटी, मळमळ असा त्रास त्यामुळे होऊ शकतो. 

आता शिळे पनीर घेताना आणि त्यापासून काहीही बनवताना आरोग्याचा विचार करा. 

Read More From आरोग्य