उन्हाळा चालू झालाय आणि सर्वात महत्त्वाचा हंगाम आलाय तो म्हणजे कच्ची कैरी खाण्याचा. मे महिना हा साधारणतः पिकलेल्या आंब्याचा आणि एप्रिल महिना हा कच्ची कैरी खाण्याचा महिना समजला जातो. कच्ची कैरी आपण अगदी मीठ आणि तिखटाचा स्वाद घेत खातोच. पण काही जणांना कच्ची कैरी खाण्याचा त्रास होतो. पण पदार्थांमध्ये याचा उपयोग केल्यास त्रास होत नाही. पण आपल्या महाराष्ट्रात आणि इतर ठिकाणीही कच्च्या कैरीचा अनेक पदार्थांमध्ये उपयोग करण्यात येतो. आम्ही तुमच्यासाठी खास कच्च्या कैरीच्या रेसिपी घेऊन आलो आहोत. राजधानीचे कॉर्पोरेट शेफ महाराजा जोधाराम चौधरी आणि आयटीएम आयएचएच, नेरूळच्या वरिष्ठ शेफ सरोज बुडके यांनी खास कच्च्या कैरीच्या रेसिपी दिल्या आहेत. या महिन्यात या रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा.
कैरीचा चणाडाळ ढोकळा
साहित्य – एक कप चणा डाळ, 1 चमचा इनो सॉल्ट, 1 चमचा लिंबाचा रस, 1 चमचा कापलेली हिरवी मिरची, 1 चमचा साख, 1 चमचा पांढरे तीळ, 1 चमचा रिफाईंड तेल, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, 1 चमचा कडीपत्ता, मीठ स्वादानुसार, 1 कप कच्ची कैरी किसलेली, 1 छोटा कप कोथिंबीर कापून
करण्याची पद्धत –
सर्वात पहिले चणाडाळ 2- 3 तास पाण्यात भिजवून ठेवा. नंतर पाणी काढून टाका आणि नीट मिक्सरमधून वाटून घ्या. आता यामध्ये इनो सॉल्ट, लिंबाचा रस, थोडं मीठ आणि तेल घालून नीट मिक्स करून घ्या. त्यानंतर यामध्ये किसलेली कच्ची कैरी घाला आणि पुन्हा मिक्सरमध्ये वाटा. आता एका ताटात तेल लावा आणि हे वरील बॅटर काढा आणि मग हे बॅटर साधारण 10- 15 मिनिट्स तुम्ही मध्यम आचेवर हे मिश्रण शिजवा. हे मिश्रण शिजलं की, नाही हे त्यामध्ये टूथपिक घालून तपासा. टूथपिक लगेच बाहेर आली तर मिश्रण शिजलं आहे समजा. त्यानंतर ढोकळ्याप्रमाणे याचे तुकडे कापून घ्या. आता एका पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करा. त्यात मोहरी आणि जिरं घाला. त्यानंतर तडतडल्यावर त्यामध्ये कडीपत्ता, साखर, लिंबू रस, हिरव्या मिरच्यांचे तुकडे आणि 1 कप पाणी घाला. हे सर्व तडतडल्यावर मिश्रण ढोकळ्यावर घाला आणि मग वाढा. त्यावर तुम्ही कापलेली कोथिंबीर घाला आणि याचा स्वाद चाखा.
आंबा लुंजी (आंब्याची चटणी)
साहित्य – कच्ची कैरी 250 ग्रॅम, ½ चमचा जिरे, ½ चमचा मोहरी, पाव चमचा मेथी दाणे, ½ चमचा बडीशेप, पाव चमचा कलोंजी (कांद्याची बी), पाव चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, ½ चमचा कोथिंबीर पावडर, पाव चमचा जिरेपूड
करण्याची पद्धत –
कच्चा आंबा स्वच्छ धुवून त्याला सोलून घ्या. ते दोन भागांत कापल्यानंतर, आतील कोय काढून टाका आणि लहान- लहान चौकोनी तुकडे करा. पॅनमध्ये मोहरीचे तेल गरम करा. जर तुम्हाला मोहरीचे तेल वापरायचे नसेल तर तुम्ही कोणतेही इतर तेल वापरू शकता. मोहरी, जिरे, मेथीचे दाणे, बडीशेप, कलोंजी घालावे, त्यात हळद लाल मिरची पावडर, कोथिंबीर पावडर, जिरेपूड, मीठ घालावे लगेच आंब्याच्या फोडी घालाव्या आणि दोन मिनिटे चांगले मिक्स करून घ्यावे. त्यामध्ये गूळ आणि पाणी घालावे. चांगले उकळवा, ते मिश्रण झाकून घ्या आणि अधून मधून हलवत राहा, नंतर बाहेर काढून थंड करा आणि पोळीसोबत खायला द्या.
वाचा – घरच्या घरी पाणीपुरी बनवण्याची रेसिपी
खानदानी राजधानी मधील कैरी – कांदा भजी
साहित्य – ½ कप कच्ची कैरी किसलेली, ¼ कप किसलेले बटाटे, 1/4 कप कापलेला कांदा, 1/2 कप बेसन, 2 मोठे चमचे आलं – लसूण- हिरवी मिरची पेस्ट, मीठ स्वादानुसार आणि तळण्यासाठी तेल.
करण्याची पद्धत –
सर्व साहित्य एका बाऊलमध्ये घाला आणि त्यानंतर थोडं पाणी घालून त्याची जाडी पेस्ट बनवून घ्या. आता हे साधारण 10 मिनिटं ठेऊन द्या. त्यानंतर तेल गरम करत ठेवा. त्यानंतर भजी तळा आणि कोथिंबीर आणि पुदिन्याच्या चटणीबरोबर खायला द्या.
कैरी- गाजर मसाला पराठा
साहित्य – 1 कप गहू पीठ (कणीक), 2 मोठे चमचे रिफाईंड तेल, मीठ स्वादानुसार, 1 कप कच्ची कैरी किसलेली, 1 कप किसलेले गाजर, 1 चमचा हळद पावडर, 1 चमचा ओवा, 1 चमचा जिरे, 1 चमचा आलं – लसूण पेस्ट, 1 चमचा कापलेला कांदा, 1 चम्मच कापलेली हिरवी मिरची, 1 चमचा पांढरे तीळ, मीठ स्वादानुसार, 1 कप चिरलेली कोथिंबीर.
करण्याची पद्धत –
एका मिक्सिंग बाऊलमध्ये कणीक आणि तेल सोडून बाकी सर्व साहित्य मिक्स करून घ्या. आता एक परातीमध्ये कणीक, तेल आणि मीठ घालून पाण्याच्या सहाय्याने भिजवून घ्या. ही कणीक थंड कपड्याने साधारणतः 15- 20 मिनिट्स झाकून ठेवा. त्यानंतर त्याचे लहान लहान गोळे करून वरील मिश्रण त्यामध्ये भरून घ्या. हे स्टफ करून झाल्यावर पराठे लाटतो तसे लाटा. पण हलक्या हाताने लाटा, जेणेकरून त्यातील स्टफिंग बाहेर पडणार नाही. त्यानंतर तुम्हाला आवडेल तसं तव्यावर बटर अथवा तेल सोडून पराठे शेकून घ्या. गरम गरम पराठे लोणचं आणि दह्याबरोबर खूपच चांगले लागतात.
कैरी रायता
साहित्य – 1 ½ कप कच्ची कैरी कापलेली, 1 ½ कप कापलेली काकडी, मीठ स्वादानुसार, साखर स्वादानुसार, ¼ कप चिरलेली कोथिंबीर, 1 ½ चम्मच भाजून वाटलेलं जिरे, 3 कप दही व्यवस्थित फेटून घेतलेलं, 2 मोठे चमचे तेल, 2 चमचे मोहरी, 15 – 20 कडीपत्ता, 2 -3 हिरवी मिरची कापून ठेवलेली.
करण्याची पद्धत –
कैरी, काकडी, मीठ, साखर, कोथिंबीर, जिरे आणि दही हे सर्व मिसळून घ्या. आता हे मिश्रण सर्व्हिंग बाऊल मध्ये घालून ठेऊन द्या. त्यानंतर फोडणीच्या भांड्यात तेल घालून त्यामध्ये मोहरी, कडीपत्ता, हिरवी मिरचीचे तुकडे घाला. हिरवी मिरची काढून नंतर ही फोडणी रायत्याला वरून घाला. त्यानंतर थंड होण्यासाठी हे फ्रीजमध्ये ठेऊन द्या. पोळी वा पराठ्याबरोबर खायला द्या.
हेदेखील वाचा –
कारवारी मेजवानी मुंबईमध्ये, कारवारी भोजनाचा अप्रतिम आस्वाद
तुमचा नाश्ता हेल्दी आणि टेस्टी बनवा ‘ह्या’ रेसिपीजने
दररोज काहीतरी नवीन स्वयंपाक करण्यासाठी ट्राय करा या ‘टॉप 25’ भारतीय डिनर रेसिपीज
Read More From लाईफस्टाईल
Diwali Padwa Wishes, Quotes, Messages In Marathi 2022 | दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा
Dipali Naphade