मनोरंजन

बॉलीवूड चित्रपटांमध्ये ‘या’ कलाकारांनी साकारली आहे डॉक्टरची भूमिका

Trupti Paradkar  |  Apr 12, 2020
बॉलीवूड चित्रपटांमध्ये ‘या’ कलाकारांनी साकारली आहे डॉक्टरची भूमिका

डॉक्टर म्हटलं की समोर येतो तो सफेद कोट, स्टेथोस्कोप आणि भल्या मोठ्या सुईचं इंजेक्शन हातात असलेली एक व्यक्ती. पण आज हेच डॉक्टर्स स्वतःचा जीव धोक्यात टाकून देशसेवेसाठी झटत आहे. कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातला आहे आणि आज जगातील वैद्यकीय क्षेत्रातील सर्व मंडळी या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज आहेत. ज्यामुळे आज या डॉक्टर्स आणि नर्समध्येच जनमानसाला देव दिसत आहे. लहानपणी तर सर्वांनाच डॉक्टर होण्याचं फार आकर्षण असतं. खेळताना खोटा खोटा स्टेथोस्कोप आणि इंजेक्शन घेऊन अनेकांनी भविष्यात डॉक्टर होण्याची स्वप्न रंगवली असतील. एवढंच नाही तर आपल्या बॉलीवूड कलाकारांनाही डॉक्टर होण्याचा मोह आवरता आलेला नाही. म्हणून या सुपरहिट चित्रपटांमधून कलाकारांनी डॉक्टरच्या भूमिका साकारल्या होता. अर्थात या भूमिकांमधील डॉक्टरांच्या कथा वास्तवाशी मिळत्याजुळत्या असतीलच असं मुळीच नाही.

करिना कपूर (उडता पंजाब आणि थ्री इडिएट्स)

करिना कपूरने उडता पंजाब या चित्रपटात डॉक्टरची भूमिका साकारली होती. या चित्रपटातून पंजाबमधील हजारो तरूणांच्या नशेच्या आहारी जाण्यावर प्रकाश टाकण्यात आला होता. या तरूणांवर नशामुक्ती केंद्रात उपचार करणारी डॉक्टरची भूमिका करिना साकारली होती. या दारूण सत्याला सामोरं जात जनसेवा करणाऱ्या या डॉक्टरचा दुर्दैवी अंत तिच्या एका किशोरवयीन पेशंट कडून होताना यात दाखवण्यात आला आहे. थोडक्यात डॉक्टर आपल्या पेशंटसाठी जीवदेखील धोक्यात टाकतात हे या चित्रपटातून सिद्ध होतं. करिना कपूरने थ्री इडिएट या चित्रपटातदेखील डॉक्टरची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात ती मेडिकल कॉलेजची विद्यार्थी असते. या चित्रपटाचे कथानक निराळं असल्यामुळे उडता पंडाबपेक्षा यातील तिचा अंदाज नक्कीच निराळा आहे. मात्र या चित्रपटातही गरज पडल्यास एखाद्या रूग्णाला त्वरित हॉस्पिटलमध्ये  दाखल करणं असो अथवा इंटरनेटवरून बहीणीची डिलिव्हरी करणं अशा गोष्टीं डॉक्टरांच्या कार्याचा सन्मान करणाऱ्या दाखवण्यात आलेल्या आहेत. 

शाहिद कपूर (कबिर सिंग)

मागच्या वर्षी ज्या बॉलीवूड चित्रपटाने बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला होता तो म्हणजे कबिर सिंग. या चित्रपटात कबिर नावाच्या डॉक्टरची भूमिका अभिनेता शाहिद खान याने साकारली होती. या चित्रपटातील डॉक्टर खऱ्या आयुष्यात नसेल तरच बरं असं तुम्हाला नक्कीच वाटेल. कारण जर असा डॉक्टर असेल तर त्याच्या पेशंटचं काहीच खरं नाही. मात्र कथेच्या गरजेनुसार यात डॉक्टरचं एक वेगळंच रूप शाहिदने साकारलं होतं. 

instagram

सलमान खान (मैने प्यार क्यू किया)

सलमानचा मैने प्यार क्यू किया हा खरं तर विनोदी चित्रपट आहे. ज्यात कॉमेडीची फोडणी देण्यासाठी काही खास प्रसंग तयार करण्यात आले आहे. सलमानने यात एका डॉक्टरची भूमिका साकारली आहे. ज्याची असिस्टंट त्याच्यावर मनापासून प्रेम करत असते. असा डॉक्टर सलमानलादेखील साकारताना नक्कीच नाकीनऊ आले असतील. असो त्यानिमित्ताने सलमान डॉक्टरची भूमिका कशी साकारू शकतो हे प्रेक्षकांना समजलं.

instagram

सोनाली बेंद्रे (कल हो ना हो)

कल हो ना हो या चित्रपटात शाहरूख खान, सैफ अली खान आणि प्रिती झिंटा यांच्या प्रमुख भूमिका होत्या. मात्र यात शाहरूख एका गंभीर आजाराने ग्रस्त असतो आणि त्याला यातून त्याची डॉक्टर वाचवण्याचा प्रयत्न करत असते असं दाखवलं आहे. या डॉक्टरची भूमिका सोनाली बेंद्रे हिने साकारली होती. एखाद्या डॉक्टरसाठी असे प्रसंग किती त्रासदायक असतात हे तिने यातून नक्कीच उत्तम रित्या साकारलं होतं. 

instagram

परेश रावल (वेलकम)

वेलकम या  चित्रपटातील परेश रावल यांनी साकारलेली डॉक्टर घुंगरूची भूमिका कोण कसं विसरू शकेल. हा चित्रपटात अनेक कलाकारांच्या भूमिका होत्या. अक्षय कुमार, कैतरिना कैफ, नाना पाटेकर, अनिल कपूर यांनी लोकांना हसवून पुरतं बेजार केलं होतं. मात्र आजही हा चित्रपट आठवला की डॉक्टर घुंगरू नक्कीच आठवतो. 

instagram

संजय दत्त (मुन्नाभाई एमबीबीएस)

विनोदी चित्रपटांमध्ये मुन्नाभाई एमबीबीएस चं नाव नसेल तर कसं चालेल. या चित्रपटात संजय दत्त ने एका खोट्या डॉक्टरची भूमिका साकारली होती. जादू ची छप्पी देणारा हा डॉक्टर खोटा असला तरी सर्वांना हवा हवासा झाला होता. या चित्रपटाला एवढी लोकप्रियता मिळाली पुढे या चित्रपटाचा सीक्वल लगे रहो मुन्नाभाई देखील करण्यात आला. 

instagram

अमिताभ बच्चन (आनंद)

सत्तरच्या दशकातील चित्रपटांची आठवण आली की त्या यादीत आनंद चित्रपट असतोच. कारण या चित्रपटाचा प्रभाव अनेकांच्या मनावर नक्कीच झाला होता. या चित्रपटात अभिताभ आणि राजेश खन्ना यांच्या प्रमुख भूमिका होत्या. राजेश खन्नावर उपचार करणारा डॉक्टर आणि त्याचा जीवलग मित्र अशी दुहेरी भूमिका अमिताभ यांनी साकारली होती. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

फराह खानच्या मुलीने स्केच काढून मिळवले 70 हजार, भटक्या प्राण्यांना करणार मदत

“कोरोनाच्या संकटातून मनुष्यजातीला वाचव आई…”

अभिनेता आयुषमान खुरानाने मानले मुंबई पोलिसांचे मराठी भाषेत आभार

Read More From मनोरंजन