फॅशन

तुमच्या वॉडरोबमध्ये असायलाच हव्यात या गोष्टी!

Leenal Gawade  |  Jan 16, 2019
तुमच्या वॉडरोबमध्ये असायलाच हव्यात या गोष्टी!

मुलींना कितीही कपडे घेतले तरी ते कमीच असतात. माझ्याकडे खूप कपडे आहेत आता मला काही नको असे म्हणणारी मुलगी शंभरात एखादीच असेल (तीही असेल का यात शंकाच आहे.)  पण कपाट नुसते कपड्याने खचाखच भरुन उपयोग नाही तर तुमच्या वॉर्डरोबमध्ये काही गोष्टी या असायलाच हव्यात. जर त्या नसतील तर तुमच्याकडे कितीही स्टायलिश कपडे असले तरी उपयोग नाही. आम्ही एक यादी तयार केली आहे यात अशा १० गोष्टी आहेत. ज्या तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हव्यात अशा आहेत.

 डेनिम पँटस 

डेनिम अर्थात जीन्स हा हल्ली सगळ्याच महिलांचा आवडता पेहराव आहे. कुडता, टिशर्ट, शर्ट, फॅन्सी टॉप्स अशा कशावरही जीन्स घालता येते. शिवाय झटपट तयार होता येते म्हणून अनेक जणी जीन्स विकत घेतात. पण प्रश्न असतो कोणती जीन्स घ्यायची याचा? हो ना याचे कारण असे की, हल्ली इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या पँटस बाजारात आहेत. साध्या जीन्समध्येच हायवेस्ट, लो वेस्ट,रिप्ड, स्ट्रेट फिट, नॅरो फिट, स्ट्रेट फिट, बेलबॉटम असे कित्येक प्रकार आहेत. हे सगळे प्रकार घालून बघण्याची आपल्याला हौस असते. पण या सगळ्या गोष्टी फॅशन इन असे पर्यंत चांगल्या दिसतात. पण कधीच जुन्या न होणाऱ्या आणि चांगल्या वाटणाऱ्या डेनिम म्हणजे साध्या स्ट्रेट फिट किंवा नॅरो बॉटम जीन्स. त्यामुळे तुमच्या वॉडरोबमध्ये या प्रकारातील जीन्स हवी. आता रंगाच्या बाबतीत सांगायचे झाले तर काळा आणि निळया रंगाची जीन्स सर्वसाधारणपणे सगळ्यांकडे हवी. कारण त्या कोणत्याही रंगाच्या टॉपवर शोभून दिसतात.

गोल्डन आणि ब्रॉकेट ब्लाऊज

जर तुम्हाला साडी नेसायला आवडत असेल तर तुमच्याकडे ट्रेंडी दिसण्यासाठी हवा असतो तो म्हणजे ब्लाऊज. कारण साडी कितीही साधी असली तरी चालेल पण त्यावरचा ब्लाऊज एकदम टिपटॉप पाहिजे. आता प्रत्येक साडीवर ब्लाऊज शिवायचे म्हटले तर ते खिशाला परवडेल असे नाही. कारण हल्ली टेलरची शिलाईच ५०० पासून सुरु होते. त्यात जर पॅटर्न द्यायला गेले तर त्याच्या किंमती १००० रुपयाला टेकतात. म्हणून घरात छान रेडिमेड ब्लाऊज आणून ठेवा. गोल्डन आणि ब्रॉकेटमधील ब्लाऊज कोणत्याही साडीवर शोभून दिसतात.

प्लेन कुडती

अनेकदा टिशर्ट आणि शर्ट घालून कंटाळा येतो. अशावेळी कुडता हा चांगला पर्याय आहे. साधारण नी-लेंथ पर्यंतचे कुडते जीन्स आणि लेगिंग्स अशा दोघांवर चांगले दिसतात. प्लेन कुडती असल्यास वेगवेगळे लूक देखील ट्राय करता येतात. त्यामुळे प्लेन कुडती तुमच्या वॉर्डरोबमध्ये हव्याच.

लेगिंग्स

हल्ली पंजाबी ड्रेसखाली सलवार घालणारे हाताच्या बोटावर मोजण्याइतके आहेत. कारण त्याला पर्याय असलेले लेगिंग्स.  सलवारसाख्या करकचून नाड्या लेगिंग्समध्ये बांधाव्या लागत नाहीत म्हणून सर्व वयोगटातील महिला लेगिंग्स वापरतात. तुम्ही लेगिंग्स वापरणारे नसाल तरी तुमच्या कपाटात लेगिंग्स असायला हव्यात कारण त्या तुमच्या वॉर्डरोबमधील प्लेन कुडत्यांवर वापरता येतो. जो तुम्हाला ट्रेडिशनल लुक देऊ शकतो. त्यावर एखादी ओढणी घेतली ही तुम्ही कोणत्याही समारंभासाठी तयार.

मल्टीकलर ओढणी

आता कुडती लेंगिग्स घातल्यानंतर ट्रे़डिशनल लुक पूर्ण करण्यासाठी तुम्हाला हवी छान ओढणी. हल्ली इतक्या छान ओढण्या बाजारात मिळतात की, त्या तुमच्या साध्या लेगिंग्स आणि कुडत्यालाही भारी लुक देऊ शकतात. मल्टीकलर बांधणीच्या ओढण्या सध्या बाजारात मिळतात. त्या २०० रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या नाहीत त्यामुळे तुम्ही दोन ओढण्या सहज घेऊ शकता. आणि तुमच्या वेगवेगळया कुडत्यांवर घेऊ शकता.मल्टीकलर दुपट्यातील व्हरायटी हल्ली अनेक ठिकाणी पाहायला मिळते. बांधणी प्रकारातच नाही तर जिओमॅट्रिकल डिझाईन्समध्येही मल्टीकलर ओढण्या मिळतात.ज्या तुमच्या कुडतीची, पंजाबी ड्रेसची शोभा वाढवतात.

लाँग स्कर्टस

जीन्स, लेंगिग्स असं सगळचं घालून तुम्हाला कंटाळा आला असेल तर लुक थोडा चेंज करण्यासाठी लाँग स्कर्ट चांगला पर्याय आहे. इंडो-वेस्टर्न लुक  जर तुम्हाला आवडत असेल तर त्यावर टीट बॅक टॉप आणि गळ्यात छानसा स्कार्फ किंवा स्टोल घेतला की झाले. त्यामुळे एक तरी लाँग स्कर्ट हवा. हा स्कर्ट तुम्ही तुमच्या मासिक पाळीच्या दिवसातही घालू शकता. कारण या दिवसामध्ये तंग पँटस घालणे अनेकांना आवडत नाही. त्या काळात हे लाँग स्कर्ट घालणे नेहमीच बरे

टी बॅक

अनेक मुलींकडे टी बँक प्रकारातील रंगीबेरंगी टॉप असतात. स्कर्टसवर हे टी बॅक टॉप चांगले दिसतात. शिवाय जीन्सवर देखील चांगले दिसतात. यातही रंग घेताना गडद रंग घ्या. काळा,लाल, निळा असे रंग घेतल्यास उत्तम. हे टी बॅक तुम्हाला हल्ली मिळणाऱ्या श्रगच्या आत देखील घालता येतील.शिवाय अनेक पद्धतीने या टी बॅकचा उपयोग होतच असतो. स्वस्तात मस्त असे हे टी बॅक टॉप्स लिकिंग रोड, कुलाबा कॉसवे अशा ठिकाणी सहज मिळतात. पण रेषा.फुले, मल्टीकलर असे टी बॅक घेण्यापेक्षा प्लेन टी बॅक अधिक उठून दिसतात. त्यासोबत जर मल्टीकलरचा स्कर्ट घालणार असाल तर त्यालाही उत्तम न्याय मिळतो. असे टी बॅक जास्त फायद्याचे असतात कारण ते अगदी जीमपासून नाईटवेअर सगळ्यासाठी वापरता येतात. 

 स्टिकऑन ब्रा

बाहेरच्या कपड्यांसोबत आपल्याकडे काही कपड्यांसाठी चांगली आंतरवस्त्रे असणे गरजेचे असते. या कपड्यांच्या आत रेग्युलर ब्रा घालून चालत नाही. कारण काही वनपीस किंवा ड्रेसचे गळे मोठे असतात.  ऑफ शोल्डर, कोल्ड शोल्डर, बॅकलेस अशा सगळ्यांसाठी तुम्हाला एक खास ब्रा असण्याची गरज असते. सध्या सगळ्यात जास्त चलती आहे ती स्टिक
ऑन ब्राची ती तुमच्याकडे असेल तर तुम्ही कोणतेही ड्रेस बिनधास्त घालू शकता.

स्टिक ऑन ब्रा कशी वापरायची माहीत नाही तर जाणून घ्या

जर तुम्हाला स्टिक ऑन ब्रा नको असेल तर तुम्ही स्ट्रॅपलेस ब्रा देखील घेऊ शकता. कारण त्या तुम्हाला प्लास्टिक बेल्ट घालून वापरता येतील.यामध्ये कोणता रंग घ्यायचा असा तुम्ही विचार करत असाल तर स्किन किंवा बेज कलर नेहमीच उत्तम. या ब्रामध्ये अनेक प्रकार मिळतात. वेगवेगळ्या दरात मिळणाऱ्या ब्राची क्वालिटीही अगदी किंमती प्रमाणे असते. त्यामुळे चांगल्या प्रतीची ब्रा या मध्ये निवडा. या ब्रा सध्याचा ट्रेंड असून तुमच्या भरलेल्या वॉडरोबमध्ये ही ब्रा हवीच

सिमलेस पँटी आणि टाईटस

टाईट पँटस आणि टाईट स्कर्टसमध्ये जर तुम्ही रेग्युलर पँटी घातली तर ती चांगली दिसत नाही. कारण तिचा सगळा आकार मागून दिसतो. अशा कपड्यांमध्ये टाईट पँटस आणि सिमलेस पँटी चांगल्या दिसतात. पॉलिस्टर मटेरिअलच्या या पँटी पातळ असतात. पॉलिस्टरने तुमच्या त्वचेवर रॅशेश येण्याची भिती तुम्हाला असेल तर काळजी करण्याचे काही कारण नाही. त्याचा तुमच्या त्वचेवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. याच मटेरिअलमध्ये मिळणाऱ्या टाईटसही तुम्हाला अशा कपड्यांमध्ये वापरता येईल.सिमलेसचा अर्थच कडा विरहीत असल्यामुळे या पँटी तुमच्या बॉडीला चांगल्या बसतात. शिवाय त्या लवकर खराब होत नाही. यामध्येही बरेच रंग मिळतात. पण स्किन कलर नेहमी उत्तम कारण कोणत्याही कपड्यांमध्ये त्या चटकन दिसून येत नाही. शिवाय सिमलेस असल्यामुळे पँटी मागून दिसतही नाही.

 स्टोल

स्टोल हा प्रकार असा आहे जो तुमच्या वॉर्डरोबमध्ये तसा मस्ट आहे याच कारण असं की, एखाद्या फॅन्सी टॉपचा गळा फार मोठा असतो. एखादा टॉप खूपच टाईट असतो. अशावेळी गळ्यात हे स्टोल घातले की एक ट्रेंडी लुकही तुम्हाला मिळतो आणि तुमचे कामही होऊन जाते.

या आम्ही सांगितलेल्या १० महत्वाच्या गोष्टी आहेत. तुम्हाला आणखी कोणत्या गोष्टी वॉर्डरोबमध्ये हव्याच अशा वाटतात ते नक्की सांगा. 

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

 

Read More From फॅशन