नवीन वर्षाचे संकल्प करण्यात सगळेच पटाईत असतात. अनेकांची नव्या वर्षात काय काय करायचे याची एक यादीच असते. त्यामध्ये जीमला जाणे आणि बारीक होणे हे अगदी पहिल्या क्रमांकावर असते. पण खरं सांगू का? जे अगदी पहिल्या दिवशी नेटाने उठून व्यायाम करतात आणि दुसऱ्या दिवसापासून वर्ष संपेपर्यंत झोपा काढतात असे अधिक असतात. असे का होते? असा विचार करत असाल तर तुम्ही काही गोष्टी करायला हव्यात. नवीन वर्षात जीम लावण्याचा निर्णय घेतला असेल तर त्याची सुरुवात तुम्हाला कशी करायची हे देखील माहीत असायला हवे.
सुरु करा व्यायाम
जीमला जाणे सुरु केले म्हणजे अगदी दुसऱ्याच दिवशी सुडौल किंवा इच्छित बांधा मिळतो असे नाही. त्यासाठी तुम्हाला किमान महिनाभर मेहनत घ्यावी लागते. त्यानंतर कुठेत तुम्हाला बदल जाणवू लागतात. त्यांनतर ही मेहनत सुरु ठेवली तर घेतलेली मेहनत शरीरावर अधिक काळासाठी टिकून राहते. कोणत्याही जीमची फी भरण्याआधी घरीच राहून 10 दिवस व्यायाम सुरु करा. असे कराल तरच तुम्हाला तुम्ही किती प्रयत्नशील आहात ते दिसून येईल. व्यायाम सुरु करताना तुम्हाला रोज सकाळी उठण्यापासून ते काहीकाळ व्यायाम करण्यापर्यंत सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. असे केल्यामुळे तुम्हाला जीमला जाण्याची आणि व्यायाम करण्याची सवय लागेल आणि त्याचा फायदा होईल.
आहारात करा बदल
जीमला जाण्याचा फायदा तेव्हाच होतो ज्यावेळी तुम्ही उत्तम आणि चांगला असा आहार घेता. जीमला जाऊन किंवा व्यायाम करुन त्याचा एकदम फायदा होत नाही. त्यामुळे तुम्ही चांगला आहार घ्यायला सुरुवात करा. आहारात अंडी, भाज्या, डाळी, कडधान्य यांचा समावेश करा. दिवसातून तुम्हाला हवे असलेले अन्नपदार्थ वेगवेगळ्या वेळांमध्ये वाटून घ्या. तळलेले किंवा जंक फूड जितके कमी करता येईल तेवढे कमी करा. जर तुम्ही हा बदल केलात तर तुम्हाला जीमला जाण्याची व्यायाम करण्याची गरज नक्की भासू लागेल.
सकाळी उठण्याची सवय
आता तुम्हाला वाटेल जीम जाण्याचा आणि सकाळी उठण्याचा काय संबंध आहे. पण याचा खूप जास्त संबंध आहे. दिवसाच्या 24 तासात अधिकच्या गोष्टी कऱण्यासाठी तुम्हाला अधिक वेळ हवा असतो. जर तुमचे झोपेचे गणित बिघडलेले असेल तर नक्कीच तुम्हाला तेवढा वेळ मिळणार नाही. ऑफिस, काम असे सगळे सांभाळून जर तुम्हाला जीम करायची असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त वेळ मिळायला हवा. त्यासाठी तुम्ही लवकर उठणेच तुमच्यासाठी चांगले आहे. सकाळी लवकर उठण्याची सवय असेल तर तुमची इतर कामे पटपट होतात आणि तुम्हाला इतर गोष्टींसाठी थोडासा वेळही मिळतो.
चालायला जा
हल्ली खूप जणांना चालायलाही आवडत नाही. एकाच जागी बसून काम करण्याची सवय लागल्यामुळे इच्छाच होत नाही. पण जीमला जायचे म्हणजे तुम्हाला हालचाल करणे आलेच. त्यासाठी पहिली पायरी म्हणून तुम्ही रोजच्या रोज चालायला घ्या. तुम्ही दिवसातून किती चालता यावर तुम्ही किती दिवस व्यायाम करु शकता हे दिसून येते. त्यामुळे तुम्ही आधी एक आठवडा शरीराला सवय लावून घ्या. चालायला जा. त्यानंतरच तुम्ही जीमला जाण्याचा निर्णय घ्या
आता जीमला जाण्यापूर्वी तुम्हाला या गोष्टी करता आल्या तरच तुम्ही जीम लावण्याचा निर्णय घ्या.