Shoes

लहान मुलांसाठी चप्पल /बूट खरेदी करताना या गोष्टींची काळजी घ्या

Vaidehi Raje  |  Feb 24, 2022
footwear for kids

घरात लहान बाळ असले की त्या बाळापेक्षा इतरांनाच त्याच्यासाठी खरेदी करण्याची हौस असते. बाळाचे कपडे, खेळणी, त्याच्यासाठी खास पाळणा अगदी वॉर्डरोब वगैरे सुद्धा हौसेने खरेदी केले जातात. बाळाला मोजे घालणे तर आवश्यकच असते पण आपण खरेदी करत असताना आपली नजर त्या छोट्याश्या क्युट बूट व चपलांकडे जाते आणि मग आपले बाळ अजून बसायला शिकले नसले तरी आपण त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मॅचिंग बूट घेऊन येतो. 

आपल्याला माहित असते की एक किंवा दोनच महिन्यांत हे बूट बाळाला लहान होतील तरी बाळाच्या कोडकौतुकासाठी आपण ती खरेदी करतोच. एकदा बाळ उभे राहायला लागले की ते चालायलाही पटकन शिकते. मग मात्र बाळासाठी शूज घ्यावे लागतात कारण बाळ एकदा चालायला शिकले की त्याला कडेवर बसायला आवडत नाही. मग मात्र थोडी तयारी आवश्यक असते.  काही पालक त्यांच्या बाळासाठी लवकर बूट खरेदी करतात तर काही जेव्हा गरज लागेल तेव्हा करतात. पण केव्हाही लहान मुलांसाठी पादत्राणे खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. 

केवळ दिसायला आकर्षक नव्हे तर योग्य बूट निवडा 

बाजारातली दुकाने आणि ऑनलाईन मार्केट सुद्धा लहान मुलांसाठी मोहक आणि गोंडस शूजने ओसंडून वाहत आहेत. परंतु पालकांनी त्यांच्या लहान मुलांसाठी योग्य असे शूज  निवडणे महत्त्वाचे आहे. तुमच्या आवडत्या स्टोअरच्या किड्स सेक्शनमध्ये ठेवलेल्या आकर्षक फॅशनच्या सजवलेल्या बुटांच्या देखाव्याने हरखून जाऊ नका. कारण बाळासाठी जे सोयीस्कर असेल त्याचीच निवड केली पाहिजे.  आपण मोठी माणसे जशी आपल्यासाठी योग्य आकाराच्या शूजची निवड करतो तशीच लहान मुलांसाठीही योग्य आकाराचेच बूट निवडा.  लगेच लहान होतील म्हणून मोठ्या आकाराचे बूट घेतले तर ते घालून पळताना लहान मुलं पडतात. तसेच फार घट्ट शूज असले तर त्यानेही मुलांना त्रास होतो. म्हणूनच बूट घेताना ते मुलांसाठी  आरामदायक आणि फ्लेक्झिबल असतील याची खात्री करून घ्या. 

ऋतूप्रमाणे पादत्राणांची निवड करा 

लहान मुलांसाठी पादत्राणे खरेदी करताना ती कोणत्या ऋतूमध्ये वापरणार आहात याचाही विचार केला पाहिजे. मुलांना  उन्हाळ्यासाठी बंद शूज घालून उपयोगाचे नाही. त्यामुळे पायांना त्रास होऊ शकतो. उन्हाळ्यात उघड्या सँडल, स्लिप-ऑन अशी पादत्राणे घ्यायला हवी ज्यात तुमच्या बाळाच्या पायांना मोकळी हवा लागते आणि घाम येत नाही. तसेच पावसाळ्यात कापडी बूट किंवा सँडल्स घेऊ नयेत जे ओले होतील व मुलांच्या पायांच्या त्वचेला त्रास होईल. हिवाळ्यात थंडीपासून बचावासाठी तुम्ही बंद शूज घेऊ शकता. पण बुटांचे सोल निसरडे नसावेत आणि फार जाडही नसावेत कारण लहान मुले काही आपल्यासारखी जास्त चालत नाहीत. 

वॉशेबल बूट घ्या 

काही बाळांच्या पायांतून अगदी मोठ्या माणसांपेक्षाही जास्त दुर्गंधी येऊ शकते. म्हणूनच बूट स्वच्छ ठेवण्यासाठी ते धुण्यायोग्य असतील असेच घ्या. तसेच सॅण्ड बाईट आणि पायाच्या त्वचेचे इन्फेक्शन टाळण्यासाठी शूज किंवा सॅन्डलच्या आत जर वाळू किंवा चिखल लागला असेल तर बूट स्वच्छ धुवून घ्या. लेस असणारे बूट घेण्यापेक्षा वेल्क्रो असलेले बूट घ्या कारण खेळता खेळता लेस सुटून, त्यात पाय अडकून मुले पडू शकतात. 

पुढच्या वेळेला लहान मुलांसाठी चप्पल /बूट खरेदी करताना या गोष्टींची काळजी घ्या. 

अधिक वाचा – चप्पल ,शूज ऑनलाईन खरेदी करताय? मग ह्या गोष्टींची काळजी घ्या

Read More From Shoes