तुम्हाला माहीत आहे का की, आयुष्यभराचा आनंद देण्याचं वचन देणारा प्लास्टिक पैसा अर्थात तुमचं क्रेडिट कार्ड हे कधी कधी आयुष्यभराचं दुःख होतं. आता तुम्ही विचार कराल, नक्की कसं? तर आम्ही तुम्हाला या लेखातून अशा 10 गोष्टी सांगणार आहोत, ज्यामधून तुम्ही या उधारच्या मायाजालामध्ये कसे फसले जाता हे दर्शवतील. तर या जाळ्यातून कसं सुरक्षित राहायचं आणि कशा प्रकारे याचा योग्य वापर करायचा आणि नक्की काय आहे क्रेडिट कार्ड हे जाणून घ्या. नक्की क्रेडिट कार्ड म्हणजे काय? याचा कसा उपयोग होतो आणि त्याचा कसा उपयोग केला गेला पाहिजे हे आम्ही तुम्हाला यातून सांगणार आहोत.
1. पैसे येण्यापूर्वी होतात खर्च
क्रेडिट कार्ड ही अशी सुविधा आहे की, तुमचे पैसे तुमच्या हातात येण्यापूर्वी खर्च होतात. अर्थात पैसे हातात नसले तरीही तुम्ही खर्च करू शकाल अशी प्रेरणा तुम्हाला क्रेडिट कार्डामधून मिळते. तुमच्या बँकेत कमी पैसे असतील, पण जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल तर, तुम्ही अगदी पैशांची चांगलीच उधळपट्टी करू शकता. आपल्याकडे पैसे आहेत की, नाही हा विचार न करता तुम्ही आरामात क्रेडिट कार्डाच्या जीवावर एखादी वस्तू खरेदी करू शकता आणि करताही. त्यामुळे मग पगार येतो तेव्हा अर्ध्यापेक्षा अधिक पगार हा क्रेडिट कार्डावर खर्च करून घेतलेल्या वस्तूंचा इएमआय फेडण्यात जातो. त्यामुळे हातात पैसे नसतानाही पैशाची उधळपट्टी क्रेडिट कार्डामुळे होत असते हे मुळात लक्षात घ्यायला हवं.
वाचा – ट्रॅव्हलिंगमध्ये कसे वाचवावेत पैसे, पर्याय आणि टीप्स
2. पेनल्टी भरण्यास राहा तयार
क्रेडिट कार्ड घेतलं असेल तर लक्षात ठेवा याचं पेमेंट वेळच्या वेळेवर करा. कारण जर तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डाचं बिल वेळेवर भरलं नाही तर, येणाऱ्या कालावधीत तुम्हाला भारीभरकम पेनल्टी भरावी लागेल. त्याशिवाय तुमच्या क्रेडिट कार्डाचा स्कोअरदेखील नेगेटिव्ह होतो. क्रेडिट स्कोअर कधी बघितला जातो हे जर तुम्हाला माहीत नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो. तुम्हाला एखादं घर अथवा कार विकत घ्यायची असल्यास, कर्ज काढायचं असेल तेव्हा तुमचा क्रेडिट स्कोअर महत्त्वाचा असतो. खराब क्रेडिट स्कोअर असणाऱ्या व्यक्तींना कर्ज मिळण्यामध्ये खूपच अडचणींना सामोरं जावं लागतं हे लक्षात ठेवा. तुम्ही तर कामामध्ये अतिशय व्यस्त असाल आणि वेळेवर बिल भरण्याची तुम्हाला आठवण राहात नसेल तर, तुम्ही बँकेकडून डायरेक्ट डेबिट सुविधा घेऊ शकता आणि त्यानंतर आपल्या फोनवर बिल अॅलर्ट सेट करू शकता.
3. कधीही मिनिमम पेमेंट करू नका
क्रेडिट कार्डाच्या बिलावर नेहमी तुमची पूर्ण रक्कम अथवा तुमच्या बिलाची जी काही मिनिमम पेमेंट असते त्याबद्दल लिहिलेले असते. पण अशावेळी ज्या व्यक्तीला आपले पैसे कोणत्याही इतर गोष्टींवर खर्च करायचे आहेत अथवा कुठेतरी उधळायचे असतील असे लोक मिनिमम रक्कम भरतात. पण ही सर्वात मोठी चूक आहे. कारण मग उरलेल्या पैशावर बँक भलंमोठं व्याज लावत असते याचा तुम्हाला अंदाज येत नाही. त्यामुळे तुमचं पुढचं बिल हे जास्त रकमेचं येतं. ही रक्कम हळूहळू वाढत जाते आणि त्यामुळे तुम्हालाच त्याचा पुढे त्रास होतो. त्यामुळे तुम्ही अजून कर्जामध्ये बुडत जाता. यातून बाहेर पडणं सहसा शक्य नाही. त्यामुळे तुम्ही असेल ती रक्कम एकाच वेळी बँकेत भरणं योग्य आहे.
वाचा – श्रीमंत व्हायचं असेल तर टाळा ‘या’ 5 चुका, करा बचत
4. भरपूर क्रेडिट कार्ड ठेऊ नका
बऱ्याचदा बऱ्याच ऑफर्स आणि एका कार्डावरून दुसरं पेमेंट अशा सर्व एकमेकांमध्ये गुंतलेल्या गोष्टींमुळे बऱ्याच लोकांना भरपूर क्रेडिट कार्ड ठेवायला आवडतं. असं केल्यामुळे बँक्सचा फायदा नक्कीच होतो. पण त्यामुळे आपलं नुकसान होतं हे लक्षात घ्या. कारण तुम्ही स्वतःजवळ जास्त कार्ड्स ठेवल्यामुळे जास्त खर्च होतो आणि कार्ड्स हरवल्यास, ऑनलाईन फोर्जरीचा धोकाही संभवतो. त्यामुळे तुम्ही जास्ती कार्ड्स न ठेवता केवळ एक क्रेडिट कार्ड स्वतःजवळ ठेवा. लक्षात ठेवा की, बँक तुम्हाला जी काही ऑफर देते, त्याचा फायदा तुम्हाला नाही तर त्यांना स्वतःला असतो. बँक्स जितक्या ऑफर्स देत असतात, त्यातून त्यांना होणाऱ्या फायद्यामधून थोडासा हिस्सा हा बँकेकडून तुम्हाला दिला जातो.
5. क्रेडिट कार्डाचा योग्य वापर करा
क्रेडिट कार्ड असेल तर त्याचा योग्य वापर करायला शिका. याचा उपयोग तुम्ही रोजच्या वस्तूंसाठी नक्कीच करू शकता. पण तुम्हाला ज्या गोष्टींची जास्त आवश्यकता असेल अशा वस्तूंसाठीच तुम्ही क्रेडिट कार्डाचा वापर करा. शिवाय तुमच्या खात्यात तुमच्या बँकेमध्ये किती पैसे आहेत याचा योग्य अंदाज ठेऊनच मग खर्च करण्याचा विचार करा. कारण बिल आल्यानंतर हा खर्च तुम्हालाच भरावा लागणार आहे हे लक्षात ठेवा. तसंच, क्रेडिट कार्ड आहे म्हणून हे विसरू नका की, तुम्ही ज्या वस्तूंची खरेदी करत आहात, त्याची किंमत योग्य आहे ना आणि तुम्ही त्याचा योग्य मोबदला देत आहात ना? क्रेडिट कार्ड आहे म्हणून एखाद्या वस्तूंची तुम्ही दुप्पट तर किंमत मोजत नाही ना याची नक्की काळजी घ्या आणि त्याचा विचार करा.
6. नियमांकडे कानाडोळा करू नका
तुम्ही ज्या कंपनीचं क्रेडिट कार्ड वापरत आहात, ते वापरण्यापूर्वी तुम्ही त्याचे नियम आणि अटी नीट वाचून घ्यायला हव्यात. त्याची सर्व योग्य माहिती तुम्हाला माहीत करून घ्यायला हवी. तुम्हाला जर तुमच्या क्रेडिट कार्डाच्या नियमांसंबंधी माहिती नसेल तर ती तुमची सर्वात मोठी चूक असेल आणि त्यामुळे तुम्हाला खूप मोठं नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्ड वापरायला सुरुवात कराल तेव्हा तुम्ही तुमच्या कार्ड कंपनी आणि बँकेबद्दल पूर्ण माहिती जाणून घ्या.
वाचा – घराला कसं बनवावं ‘स्मार्ट होम’, काय आहे ‘स्मार्ट होम’
7. क्रेडिट लिमिट वाढवणं पडू शकतं महागात
जेव्हा तुम्ही एखादं क्रेडिट कार्ड घेता, तेव्हाच त्याचवेळी तुम्हाला तुमच्या उत्पन्नानुसार लिमिटेड क्रेडिट लिमिट आखून देण्यात येतं. तुम्ही क्रेडिट कार्ड नीट वापरत असाल तर काही कालावधी गेल्यानंतर तुम्हाला क्रेडिट लिमिट वाढवण्यासाठी बँकेचे मेसेज आणि फोन यायला सुरुवात होते. वाढवण्यात येणारं लिमिट हे खूप जास्त अर्थात लाखांमध्ये असतं. आमचा तुम्हाला सल्ला आहे की, तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डाची लिमिट तोपर्यंत वाढवू नका, जोपर्यंत तुम्हाला त्याची अगदीच गरज नसेल. याचं कारण असं आहे की, बँक जितकं तुम्हाला क्रेडिट लिमिट देते, त्यावर तितकं जास्त व्याजदर लावते आणि शिवाय सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजकाल ऑनलाईन फ्रॉड्सचं प्रमाणही वाढलं आहे. जास्त क्रेडिट लिमिट असल्यास, फ्रॉड होण्याचा धोकाही असतो. यापासून वाचायचं असल्यास, तुम्ही तुमचं क्रेडिट लिमिट कमी ठेवलेलं जास्त चांगलं.
8. स्टेटमेंट नीट वाचणं आवश्यक आहे
आपलं मासिक स्टेटमेंट येतं ते नीट वाचायला हवं. त्यामुळे तुम्हाला तुम्ही किती नको त्या ठिकाणी खर्च केले आहेत याचा व्यवस्थित अंदाज येतो. तसंच कोणत्याही चुकीच्या वस्तूसाठी तुमचे पैसे तर नाही ना गेले याचीही तुम्हाला खात्री करून घेता येते. कधीतरी एखाद्या गोष्टीसाठी जास्त व्याज लावण्यात येतं, त्यामुळे तुम्ही तुमचं स्टेटमेंट योग्य आहे की, नाही हे नीट वाचून घेणं गरजेचं आहे.
9. क्रेडिट कार्डावरून कॅश कधीही काढू नका
काही लोक आपल्या क्रेडिट कार्डाचा डेबिट कार्डाप्रमाणे वापर करून एटीएममधून कॅश काढतात. पण एक लक्षात घ्या क्रेडिट कार्डावरून असे काढलेले पैसे हे एक प्रकारचं कर्ज आहे. जे तुम्ही पटकन घेता पण त्यावर अधिक प्रमाणात व्याज लागतं. त्यामुळे तुम्ही सहजासहजी क्रेडिट कार्डाने पैसे काढलेत तर ते कर्ज तुम्हाला बँकेला चुकवताना दुप्पट रक्कम भरावी लागण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे क्रेडिट कार्डाने तुम्ही कॅश न काढणं जास्त चांगलं आहे.
10. क्रेडिट कार्डातील पाँईंट्सकडे लक्ष द्या
बऱ्याचदा बँकांच्या या क्रेडिट कार्ड्ने केलेल्या खरेदीवर तुम्हाला काही पाँईंट्स दिले जातात. जे तुम्हाला नंतर खरेदी करताना उपयोगी पडतात. कार्ड्स घेतल्यानंतर त्यातील ऑफर्सच्या बाबतीत नक्की आणि नीट चौकशी करा आणि तुमच्या कार्डावर एखादी चांगली ऑफर असेल तर, तुमच्या क्रेडिट कार्डावर किती पाँईंंट्स झाले आहे आणि त्याचा फायदा तुम्ही कसा घेऊ शकता याची नेहमी काळजी घ्या. तुम्हाला नीट समजत नसल्यास, कस्टमर केअरकडून यासंबंधी माहिती घ्या. हे पाँईंट्स फुकट घालवू नका. त्याचा तुम्हाला तुमच्या पुढच्या खरेदीत फायदा होतो हे लक्षात घ्या.
Read More From लाईफस्टाईल
Diwali Padwa Wishes, Quotes, Messages In Marathi 2022 | दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा
Dipali Naphade