गर्भधारणेदरम्यान अस्थमाचे व्यवस्थापन करणे आव्हानात्मक ठरते. शिवाय दम्याचे वेळीच व्यवस्थापन न केल्यास आई आणि बाळ दोघांसाठीही घातक ठरु शकते. या लेखाच्या माध्यमातून दम्यामुळे गरोदरपणात येणाऱ्या समस्यांविषयी माहिती दिली जाणार आहे. डॉ. अदिती सिंघी, स्त्रीरोग तज्ञ, अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटल, मुंबई यांच्याकडून आम्ही अधिक जाणून घेतले.
गरोदर स्त्रियांना गर्भावस्थेतील मधुमेह, उच्च रक्तदाब आणि दमा यांसारख्या आरोग्यविषयक समस्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येते. दमा ही एक जीवघेणी फुफ्फुसाची स्थिती आहे ज्यामुळे एखाद्याच्या श्वसनमार्गात अडथळा निर्माण होऊ शकतो. या स्थितीमुळे गर्भवती महिलेच्या श्वसन प्रणालीवर परिणाम होतो. यामुळे एखाद्याच्या जीवनाची गुणवत्ता कमी होऊ शकते आणि कामावर लक्ष केंद्रित करणे अशक्य होते. गर्भावस्थेच्या तिसर्या टप्प्यात, गर्भवती महिलेच्या आधीच अस्तित्वात असलेल्या आजारामध्येबरेच बदल दिसून येतात. अस्थमा असलेल्या गर्भवती महिलांपैकी एक तृतीयांश महिलांमध्ये, गर्भधारणेदरम्यान दम्याची लक्षणे तीव्र होताना दिसून येतात. त्याकरिता दमा नियंत्रित करणे ही गरजेचे आहे.
दमा असलेल्या गर्भवती महिलांना कोणत्या समस्या येऊ शकतात?
प्रीक्लॅम्पसिया ही एक सामान्य समस्या आहे ज्यामुळे उच्च रक्तदाब होतो आणि मूत्रपिंड आणि यकृत यांसारखे अवयवांवर दुष्परिणामहोतात. या अवस्थेची चिन्हे म्हणजे लघवीमध्ये प्रथिनांचे उच्च प्रमाण, दृष्टी दोष आणि तीव्र डोकेदुखी. दमा नियंत्रित न केल्याने बाळाला ऑक्सिजनचा पुरवठा कमी होऊ शकतो. तुम्हाला हे जाणून धक्का बसेल की अकाली जन्म, बाळाची वाढ आणि विकास मर्यादितहोण्याची शक्यता जास्त असते आणि जन्मावेळी वजनही कमी असते. अकाली जन्मलेल्या बाळांना आयुष्यभर आरोग्यविषयक गुंतागुंत किंवा अपंगत्व असू शकते. अशा बाळांमध्ये मृत्यूचे प्रमाण आणि विकृतीचे प्रमाण जास्त असते.
दम्याची कारणे
दम्याची अनेक कारणे आहेत ज्यामुळे तुमचा धोका वाढू शकतो. हवेतील परागकण, बुरशी, पाळीव प्राण्यांचा कोंडा, धुळीचे कण आणिझुरळे यांसारख्या ऍलर्जीमुळे छातीत घरघर आणि खोकल्यासारखी त्रासदायक लक्षणे वाढू शकतात. वायू प्रदूषण, रसायने, सायनुसायटिस, सर्दी, धूम्रपान आणि परफ्यूमच्या वासामुळे फुफ्फुसाची जळजळ होऊ शकते. अशा प्रकारे, तुम्हाला दम्याचा सामना करणे कठीण जाईल. फ्लू, न्यूमोनिया, धुम्रपान, रेस्पिरेटरी सिन्सिशिअल व्हायरस इन्फेक्शन (RSV), आनुवंशिकता, तणाव, विशिष्ट औषधांचे सेवन आणि दुष्परिणाम आणि पाळीव प्राण्यांचा कोंडा हे देखील दम्यास कारणीभूत ठरतात.
दम्याची लक्षणे
झोपेत असतानाही खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे, व्यायाम करताना थकवा जाणवणे, शिंका येणे, सर्दी, नाक वाहणे, घरघर होणे, छाती जड वाटणे, नाक चोंदणे, घसा खवखवणे, वजन कमी होणे, डोकेदुखी आणि चालण्यास असमर्थता दिसून येते
अनेकदा चक्कर येणे, गुदमरणे अशीही लक्षणे पहावयास मिळतात. जेव्हा तुम्हाला वरील लक्षणे दिसून येतात तेव्हा तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल. पल्मोनरी फंक्शन टेस्ट (PFTs) याकरिता फायदेशीर ठरु शकते. तुमच्या फुफ्फुसात आणि बाहेरील हवेचा प्रवाह मोजण्यातही मदत करते. ही चाचणी दमा असलेल्या रुग्णांसाठी उपयुक्त ठरू शकते.
दम्याचे व्यवस्थापन कसे करावे?
धुळीपासून लांब रहा, आपले घर स्वच्छ ठेवा. घरी पाळीव प्राणी ठेवणे टाळा कारण ते तुमचा त्रास वाढवू शकतात. आपले हात नियमितपणे धुऊन वैयक्तिक स्वच्छता राखा. कोणतेही केमिकलयुक्त क्लीनर, स्प्रे, पावडर, परफ्यूम किंवा तीव्र सुगंध असलेली उत्पादने वापरू नका. घरी ह्युमिडिफायर वापरण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्ही मोकळेपणाने श्वास घेऊ शकाल.
तुमच्या डॉक्टरांना भेटा जे लक्षणांच्या तीव्रतेनुसार ब्रॉन्कोडायलेटर, इनहेलर, अँटी-अॅलर्जिक गोळ्या आणि काही वेळा स्टिरॉइड्सयांसारखी औषधे लिहून देऊ शकतात. डॉक्टरांच्या उपचाराशिवाय स्वतःच्या मनाने औषध घेणे टाळा. दम्यामुळे गर्भ आणि आईला होणाऱ्या धोक्याचे मूल्यांकन डॉक्टरांमार्फत करुन घ्या.
गर्भवती महिलेने गर्भधारणेपूर्वी तिच्या आरोग्याची तपासणी करुन घेणे आणि सर्व गुंतागुंतीचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. अस्थमा नियंत्रित करण्यासाठी आणि निरोगी जीवन जगण्यासाठी संतुलित आहाराचे पालन करण्याचा प्रयत्न करा, दररोज व्यायाम करा, तणावमुक्त रहा, इष्टतम वजन राखा.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक