Budget Trips

Must Visit Destination : कोकणाच्या हृदयात वसलेलं दापोली

Aaditi Datar  |  Apr 27, 2019
Must Visit Destination : कोकणाच्या हृदयात वसलेलं दापोली

एप्रिल-मे महिन्यात कितीही नाही म्हटलं तरी चार दिवसांची सुट्टी घेऊन मुंबईबाहेर जावंसं वाटतं. मुलांच्या शाळांनाही सुट्टी असतेच. त्यातही जर तुम्हाला बीच डेस्टीनेशन्स आवडत असतील तर भारतात अनेक पर्याय आहेत. पण तुम्हाला जर जास्त लांब जायचं नसेल तर महाराष्ट्रातील कोकणातल्या स्वर्गाला म्हणजेच दापोलीला भेट देऊ शकता.

कोकणच्या हृदयात वसलेलं निसर्गरम्य दापोली हे मुंबईपासून फक्त काही तासांच्या अंतरावर आहे. इथली पर्यटकांची गर्दी गेल्या काही वर्षात वाढली असली तरी अजूनही इथे पूर्णपणे व्यावसायिकीकरण झालेलं नाही. नेहमीच्या रूटीनपासून ब्रेक हवा असल्यास दापोलीला नक्कीच भेट देता येईल. याची मुख्य कारण म्हणजे इथले निसर्गाचं वरदान लाभलेले स्वच्छ आणि कमी गर्दी असलेले समुद्रकिनारे आणि सुट्टीमध्ये एन्जॉय करण्यासाठी मिळणारे भरपूर ऑप्शन्स.

इतिहासकालीन दापोली

मुंबईतून कोकणाकडे वळताच उन्हाळ्याच्या दिवसातही गर्द हिरवी झाडी पाहायला मिळते ती दापोलीत. दापोली हे तालुक्याच ठिकाण असल्याने इथे बरीचशी महत्त्वाची कार्यालयेही आहेत. म्हटलं तर शहराचं ठिकाण पण विकासाच्या बाबतीत अजूनही बराच स्कोप असलेलं दापोली शहर आहे.  ब्रिटीशांच्या काळात दापोली हे छावणीचं ठिकाण होतं असं म्हटलं जातं. पण आज मात्र हे शहर पावसाचे काही दिवस सोडल्यास पर्यटकांनाी गजबजलेलंं असतं. मुख्य म्हणजे महाराष्ट्रातील हे एकमेव ठिकाण मी पाहिलं जिथे मला मराठी पर्यटकांपेक्षा अमराठी पर्यटक तेही मोठमोठ्या कुटुंबासह इथे आलेले दिसले आणि इथे येऊन ती इथलं सौंदर्य आणि कोकणी माणसाच्या साध्या स्वभावानेही भारावलेले दिसले. यात विदेशी पर्यटकांचाही समावेश होताच.  

दापोलीमधील पर्यटनाची ठिकाणं

दापोलीच्या आसपासच्या प्रत्येक गावात काही ना काही पाहण्यासारखं आहे. त्यामुळे दापोलीत राहून तुम्ही आजूबाजूचा परिसर मात्र तुम्ही अगदी दोन तीन दिवसात मस्तपैकी कुटुंबासोबत आरामात पाहू शकता. कारण इथल्या प्रत्येक गावाची काही ना काही खासियत आहे. आम्ही दापोलीत तीन दिवस होतो, त्यातील दीड दिवस हा फिरण्यासाठी ठेवला होता. या दीड दिवसात आम्ही अनेक ठिकाणंही बघितली आणि बीचसुद्धा एन्जॉय केला.

दापोली म्हणजे समुद्रकिनारे यात समावेश होतो तो केळशी, दाभोळ, बुरोंडी या किनारपट्टी भागाचा. येथील समुद्रकिनाऱ्यांमध्ये प्रसिध्द असलेले किनारे म्हणजे कर्दे बीच, केळशी बीच, मुरूड बीच, लाडघर बीच, कोळथरे बीच आणि तामस तीर्थ बीच. पर्यटकांची संख्या वाढूनही आजही इथले समुद्रकिनारे स्वच्छ आणि सुंदर आहेत, हे विशेष. एवढंच नाहीतर इथल्या काही बीचवर तुम्हाला डॉल्फीन आणि वॉटर स्पोर्ट्स एन्जॉय करता येतील तर काही किनाऱ्यावर फक्त आणि फक्त तुम्हीच असाल एवढा निवांतपणा अनुभवता येईल.

मुरूड बीच – मी नुकतीच या परिसराला भेट दिली असल्याने वॉटर स्पोर्ट्ससाठी मुरूड बीच हा चांगला पर्याय आहे, असं सांगेन. कारण या बीचवर सर्व गोष्टी अगदी सहज उपलब्ध आहेत आणि दापोलीपासून हे अगदी काही मिनिटांच्या अंतरावर आहे. इथे तुम्हाला जेट स्की, बनाना राईड, पॅरासेलिंग असे आणि अजून बरेच वॉटर स्पोर्ट्स एन्जॉय करता येतील. जर तुम्ही सकाळी 9 च्या आधी या बीचवर आलात तर तुम्हाला समुद्रात जाऊन डॉल्फीन पाहण्याचीही संधी मिळेल. तसंच इथल्या समुद्रकिनाऱ्यावर तुम्हाला अगदी मुंबईच्या जूहू किनाऱ्याएवढी नाही पण छोटीशी खाऊ गल्लीही पाहायला मिळेल. जिथे मुंबईसारखा चाट आणि इतरही खाण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मुरूड बीचला जाताना तुम्हाला जर मुंबईचा वडापाव खावासा वाटला तर तीही इच्छा पूर्ण होईल. कारण इकडे उपलब्ध आहे खास कल्याणचा खिडकी वडा. इथे समुद्रकिनाऱ्याकडे जातानाच दुर्गादेवीचं छान मंदिरही आहे. इथे स्टेसाठी बरेच ऑप्शन्स आहेत.  

लाडघर बीच – लाडघर बीच हा अगदी निवांत आणि काहीसा निर्मनुष्य असा आहे. पण नैसर्गिक सौंदर्याचं अगदी भरभरून वरदान या बीचला आहे. या सागरकिनारीच प्रसिद्ध असं सागर सावली रिसॉर्ट आहे. इथे आम्ही छान असं दत्ताचं देऊळही पाहिलं. जिथल्या पायऱ्या थेट समुद्राकडे जातात. निसर्गात रममाण व्हायचं असल्यास लाडघर बीचसारखा पर्याय नाही. लाडघरपासून काही अंतरावरच बुरोंडी आहे. जिथल्या उंच डोंगरावर परशुरामाचं स्मारक आहे. या स्मारकावरून तुम्ही आसपासचा सर्व भाग न्याहाळू शकता. तसंच रस्त्यातचं लागतं ते तामस तीर्थ. इथला संपूर्ण समुद्रकिनारा तांबड्या रंगाचा भासतो. कारण समुद्रकिनाऱ्यावरील सर्व खडक आणि दगड हे तांबड्या रंगाचे आहेत. दूरवरून समुद्रात डोलणाऱ्या होड्या अगदी मोहून टाकतात.

आसूद बाग – दापोली अगदी हाकेच्या अंतरावर असलेलं ठिकाण म्हणजे आसूद किंवा त्याला आसूद बाग असंही म्हटलं जातं. इथे उन्हाळ्यातही हिरवागार निसर्गाचं दर्शन होतं. मस्तपैकी फणसाने लगडलेली झाड आणि नारळीपोफळीच्या वाड्या इथे आहेत. आसूदचं मुख्य आकर्षण म्हणजे केशवराजाचं मंदिर. जिथे पोचण्यासाठी तुम्हाला आधी डोंगर उतरून पुन्हा तेवढाच डोंगर चढावा लागतो. तब्बल 200 पायऱ्या चढून गेल्यानंतर डोंगराच्या कुशीतील केशवराजाचं देऊळ दृष्टीस पडतं. इथला परिसर पाहून तुमचा पायऱ्या चढतानाचा सर्व थकवा आपोआप निघून जातो. देवळातील गोमुखातून बारा महिने थंड पाणी वाहतं. मात्र इथला देवळाचा परिसर निर्मनुष्य असल्याने इथे दिवसाउजेडीच यावं. तसंच आसूद गावात हॉटेल्स नसून तुमची डोंगऱ्याच्या पायथ्याशी असणाऱ्या दाबकेवाडीत घरगूती जेवणाची उत्तम सोय होईल. जिथे तुम्ही कोकणातील खास मेजवानीचा आस्वाद घेऊ शकता. तसंच इथे तुम्ही क्षणभर विश्रांती घेऊन कोकणातील अनेक उत्पादन जसं आंबा वडी, कोकम, पन्ह्याचा गर इ. वाजवी दरात खरेदीही करू शकता. आत्ता आंब्याच्या सिझनमध्ये गेल्यास कोकणातील हापूसचा आस्वाद घेण्याची संधी मात्र सोडू नका.  

दापोलीच्या इतिहासाची साक्ष असलेले समुद्रातील किल्लेही इथे आहेत. ते म्हणजे सुवर्णदुर्ग, गोवा किल्ला आणि कनकदुर्ग. सुवर्णदुर्ग किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकाळात बांधण्यात आला होता. पण या किल्ल्यांची बरीच पडझड झाली आहे. मराठा आरमाराच्या नौकाबांधणीचे काम येथे होत असे. कनकदुर्ग किल्ल्यावर सर्वात जुने लाईटहाऊसही आहे. जर तुम्ही मत्स्यप्रेमी असाल तर हर्णे बंदरावर मच्छीचा लिलाव पाहण्यासाठीही जाऊ शकता. दापोली कोकण कृषी विद्यापीठात तुम्ही ऑर्गेनिक शेती पाहू शकता. पन्हाळेकाजी गुफाही पाहण्यासारख्या आहेत. तसंच उन्हेरे येथील गरम पाण्याची कुंडही पाहू शकता. आंजर्ले येथील कड्यावरच्या गणपतीला तुम्ही जाऊ शकता. 

राहणं, खाणं आणि शॉपिंग

दापोली आणि आसपासच्या परिसरातील लोकांचा मुख्य व्यवसाय म्हणजे मासेमारी आणि बागायती. त्यामुळे जर तुम्ही मत्स्यप्रेमी असाल तर इथे तुमच्या खाण्याची चंगळच आहे. पण शाकाहारींनीही निराश होण्याची गरज नाही. कारण त्यांच्यासाठी शाकाहारी कोकणी पद्धतीच्या जेवणाची इकडे सोय आहे. दापोलीमध्ये तर खाण्यापिण्यासाठी तुमच्या आवडी आणि बजेटप्रमाणे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

तुम्हाला दापोलीत काजूची फॅक्टरीही पाहता येईल. जिथे तुम्हाला काजूचा ढीगच्या ढीग पाहायला मिळेल आणि काजू सोलण्यापासून पॅकिंगपर्यंतची सर्व प्रकियाही पाहता येईल. सोबतच दापोलीत मिळणारा कोकण मेवाही घेता येईल. ओले काजू, पोह्याचे पापड, बटाटा पापड, गावढी पोहे, कोकम, कांद्याची माळ इ.

राहण्यासाठी विविध पर्याय

दापोली आणि आसपासच्या गावांमध्ये थोडंफार व्यावसायिकीकरण झाल्यामुळे राहण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. जसं लक्झरी रिसॉर्ट्सपासून अगदी खाजगी बंगल्यापर्यंत तुमची राहण्याची सोय आहे. त्यामुळे तुमच्या बजेटनुसार तुम्ही कुठे राहायचं ते ठरवू शकता. कनेक्टीव्हीटीच्या सोयीसाठी आम्ही दापोलीतील फर्न समाली या रिसोर्टमध्ये राहिलो होतो. जे फारच छान आणि सर्व सोयींयुक्त आहे.   

दापोलीला भेट देण्याचा बेस्ट सिझन म्हणजे उन्हाळा आणि हिवाळा. पावसाळ्यातही इथे येण्यास हरकत नाही. पण पावसात इथले समुद्रकिनारे तुम्हाला हवे तसे एन्जॉय करता येणार नाहीत.  

दापोलीला जाण्याचे पर्याय

खाजगी वाहन – तुम्ही जर स्वतःच्या कारने दापोलीला जाणार असाल तर हा सर्वात उत्तम पर्याय आहे. कारण तुम्ही स्वतःच्या कारने दापोलीत हवं त्या ठिकाणी फिरू शकता आणि थांबून अनेक ठिकाणं पाहूही शकता. पण शक्य असल्यास इथे स्थानिक ड्रायव्हर किंवा फिरताना मॅप्सची मदत नक्की घ्या.

बस – सरकारी आणि खाजगी बसेस असे दोन्ही पर्याय दापोलीला जाण्यासाठी उपलब्ध आहेत.

ट्रेन – ट्रेनचा पर्याय तसा सोयीस्कर नाही कारण ट्रेन फक्त खेडपर्यंतच जाते.

मग या उन्हाळ्यात नक्की भेट द्या कोकणातल्या स्वर्गाला दापोलीला.

हेही वाचा – 

Weekend Gateway : शांत आणि नयनरम्य हरिहरेश्वर

कमी बजेटमध्ये भारतात फिरण्यासाठी ’25’ पर्यटन स्थळं

प्रवासाला जाताना सोबत न्या ‘हे’ घरगुती खाद्यपदार्थ

Read More From Budget Trips